मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

ताम्रमुखी टिटवी / Red-wattled Lapwing


















नावे: -
मराठी: -             ताम्रमुखी टिटवी
संस्कृत नाव: -     ताम्रमुखी टिट्टिभ
इंग्लिश: -           Red-wattled Lapwing
हिंदी:-               टिटहरी
शास्त्रीय नाव: -    Vanellus indicus
कुळ: -               टिट्टिभाद्य (Charadriidae)

वर्णन: -
ताम्रमुखी टिटवी हा पक्षी सुमारे ३३ सें. मी. आकाराचा असून याची चोच लाल, डोके, गळा, छाती काळ्या रंगाची, त्या खाली पोटाकडे पांढरा रंग तर पाठीकडून पंखांपर्यंतचा भाग तपकिरी रंगाचा, पाय लांबट पिवळ्या रंगाचे असतात आणि यांची मुख्य ओळख म्हणजे दोन्ही डोळ्यांजवळ लाल रंगाचे कल्ले. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

वास्तव्य/आढळस्थान: -
ताम्रमुखी टिटवी पक्षी हिमालयाच्या १८०० मी. उंचीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळणारा सर्वसामान्य पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, इराण, इराक वगैरे देशांमध्येही आढळतो. शेतीचे प्रदेश, मोकळे माळरान प्रदेश, उंच जंगलांच्या किनाऱ्यांजवळ, पाण्याच्याजवळ विशेषतः नदी, तलावांच्या किनाऱ्यांजवळ ताम्रमुखी टिटवी पक्षी हमखास दिसून येतो.

खाद्य: -
लहान-मोठे कीटक शंख-शिंपल्यातील जीव हे ताम्रमुखी टिटवी पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.

प्रजनन काळ: -
या पक्ष्यांच्या वीणीचा काळ साधारणपणे मार्च ते ऑगस्ट असा असून मादी एकावेळी ३ ते ४ राखाडी किंवा राखाडी-तपकिरी रंगाची त्यावर काळे ठिपके असलेली अंडी देते. ही अंडी तलावांच्या, नदीच्या किनाऱ्याजवळील मोकळ्या मैदानात असतात. यांचे मुद्दाम बांधलेले घरटे नसते. अंड्यांजवळचा भाग सहसा खोलगट असतो आणि तेथे गारगोटी सारखे दगड असतात. यामुळे अंडी आणि दगडातील फरक चटकन ओळखता येत नाही. अंडी असतील त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केल्यास नर-मादी मोठ्याने आवाज करीत त्या विरुद्ध दिशेने उडून लक्ष दुसरीकडे वेधून घेतात.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा