मंगळवार, २३ जून, २०१५

वैराग्य, आध्यात्म आणि समर्पण



वैराग्य, आध्यात्म आणि समर्पण विश्लेषणांच्या अनेक छटा पहायचा योग देहूला आला, गाऱ्हाणे म्हणून उदरभरण करणाऱ्या "वासुदेव" रुपी ह्या अवलियाची भेट पर्वणीच ठरली इंद्रायणीच्या काठावर त्यांच्या हातात वडापाव देताच माझे नाव विचारून काही गाऱ्हाणे म्हणायला सुरवात केली आणि मी त्यांना मधेच प्रश्न केला हे तुकाराम महाराजांचे गावात पण काही मंदिर आहे का? खरे तर ते असे गाऱ्हाणे म्हणणे प्रकार मला आवडत नाही. मी संतांना देव मानत नाही कारण देव आहे कि नाही हे माहीतच नाही पण संत होते, आहेत, अजूनही होतील (पैसा घेऊन प्रवचन करणारे वेगळे) त्यांच्या विचारांचा भंडारा अवघ्या महाराष्ट्र भर पसरला आहे. आहो "संतांची भूमी" हि, त्यांच्या विचारांचे आचरण केले तरी खूप ………… हातातल्या खाण्याचा एक घास गिळंकृत करून एका वेगळ्या टोन मध्ये थोडासा घोगरा आवाज आला.
होय हेच तुकाराम महाराजांचे गाव देहू, वाण्याच पोर विठ्ठलाच्या भक्तीत असं गुंगल कि भक्तीची परिभाषाच बदलली. पार ज्ञानेश्वर महाराजांच्या पठडीत जाऊन बसल. "पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगदगुरु तुकाराम महाराज की जय" असा जयघोष करतो ना आपण. तस पाहता वडिलोपार्जित सावकारी होती पण दुष्काळ आला आणि तुकोबांनी वैराग्याला आलिंगन देत आपलं समाजाचा देण चुकता केल. "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं" (त्यांनी उच्चारलेले हे शब्द माझ्या लक्षात राहण्या सारखे नव्हते म्हणून मोबाईल मध्ये लिहून ठेवले होते.) शब्दांनाच आपले धन आणि शस्त्र मानत त्यांनी समाजाला बरेच मार्गदर्शन केले, जातीभेदावर परखड काव्ये केली, आध्यात्म आणि विठ्ठल अभंग रुपात असा काही गायला कि वाङ्‌मय रुपी लेखनाला मंत्रांचे पावित्र्य लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात हा गोड काव्य वारसा असा काही भिनला कि भाषेची रसाळता अतुलनीय झाली.
पाण्याची बाटली पुढे केली तसे दोन घोट घेत आमच्या संभाषणाला पुन्हा सुरवात झाली. विठ्ठलाचे थोर भक्त होते म्हणून त्यांचे मंदिर नाही बांधले …… हालअपेष्टांचे उतार चढाव त्यांना तरी कुठे चुकले आहेत. लहान वयात आई-वडिलांच्या मायेला पारखे झाले, मोठा भाऊ संन्यासी झाला, दुष्काळाने मोठा मुलगा हिरावून घेतला. महाजनकी बुडाली, गुर-ढोर गेली, संसारातील उदासीन मनाने विठ्ठलाच्या भक्तीत मात्र भरच टाकली भंडारा डोंगरावर चिरंतनाचा सक्षात्कार शोधायला गेले असता साक्षात विठ्ठलानेच दर्शन दिले असे मानतात. विठ्ठल भक्तीचा वारसा पार विश्वंभरबुवांपासूनच चालत आला आहे ह्याच्या घराण्यात.
विश्वंभरबुवा म्हणजे? माझा प्रश्न. विश्वंभरबुवा म्हणजे तुकोबांच्या वंशावळीचे प्रथम व्यक्ती, अगदी सुरवातीचा माणूस "मूळपुरुष". वंशावळी म्हणजे आपल्या ………होय महाराज ते माहित आहे मला “आपल्या जन्माचा वृक्ष ज्याच्या पासून सुरु होतो ती व्यक्ती.” चेहऱ्याची सुरकुती सुद्धा न हलवता त्यांनी उरलेला घास संपवला थोडे पाणी पिउन झाले. अनंत, अथांग विठ्ठलभक्ती वाणीतच नव्हती तर अन्तःकरणात वास करून होती. वैराग्याच्या कसोटीला अत्मानुभावाचा शाब्दिक रंग आहेच पण त्यांचा ज्ञानेश्र्वरी, वेद, पुराणांचा अभ्यास देखील होता. तुकोबांची भक्ती अंधश्रद्धाळू नव्हती हे त्यांच्या कर्मठपणा व अंधश्रद्धेवर प्रहार; दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका; विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक अभंगांतून स्पष्ट होते.
“जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।। तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।“
बुआ तुकोबांचे आत्मचरित्र कथन करता करता थोडे थांबले. आज सुर्य नारायणाने माझ्यावर जरा मेहरबानीच केली होती, सकाळी घरातून बाहेर पडल्या पासून आता पर्यंत अधेमधेच ढगा अडून डोकावत होता. दुपारच्या प्रहरी इंद्रायणीकाठी गार वाऱ्याची झुळूक शरीराला आणि बुवांचे बोल मनाला सुखावातच होते. तसा अध्यात्म हा माझा विषय नाहीचं पण नाविन्यचा लवलेश असलेला कोणताही क्षण किंवा प्रसंग काही शिकावूनच जातो हा माझा आत्मानुभव आहे.
परवा कुन्दंनचा फोन आला "भावड्या ३१ ला लग्न करतो आहे आणि तू येतोस आहे!" नाही म्हणायचा तर प्रश्नच नव्हता आधी HR ला जाऊन शनिवारच्या सुट्टीचे सांगितले कधी कधी क्षणाच विलंब घातकी ठरू शकतो, ह्याने फोन केला आणि बॉस म्हणाला "Book your ticket for Baroda and you are leaving tonight."  "Not today sir, i will go on Monday as i am going Pune for some personal work" त्या नंतरची २० मिनिटे मी एक सेल्समन असल्या सारखी गेली, जो कोणत्या तरी नवीन उत्पादनाचे मार्केटिंग करायला एका श्रीमंत व्यक्ती समोर उभा आहे ज्याला त्या उत्पादनात काहीच रस नाही तरी सुद्धा त्याने ते उत्पादन विकत घेतल्यावर सेल्समन च्या संमिश्र आनंदाला जो उधाण येतो तो घेऊन मी जागेवर येउन बसलो. शनिवारीच निघून पुण्यात दाखल व्हायचे होते काही काम होती ती निपटवून ह्याच्या मामाच्या घरी पिंपरीला सायंकाळी पोहोचायचे होते पुण्याचा खासा दांडगा अनुभव असल्याने (म्हणजे ते खालच्या अंगाला वळा, वरच्या अंगाला झाडाखाली वगेरे ….) बाईकनेच जाणे सोयीचे होते, सकाळी १० ला घरातून निघालो ठाण्यात होणारी एक भेट हुकली, पनवेलला मस्तानीचा छान बेत झाला आणि मी पुण्याच्या मार्गावर असताना देहूरस्ता ………देहू ……… सारखे समोर येत होते शेवटी महामार्गा वरील प्रवेशद्वार नजरेसमोरून गेले आणि बाईकला ब्रेक मारला पुन्हा U टर्न घेतला तो थेट इंद्रायणी काठी थांबायलाच, डोक्यावरचे हेल्मेट काढले तसा कानाला स्पर्शून गेलेला गार वारा आणि बुवांच्या टाळेचा नाद "श्रवणीय" ह्या शब्दाला पुरून उरणारा होता.
मी प्रश्न केला बुवां मगाशी आपण म्हणाल्या प्रमाणे तुकोबांनी वैराग्य धारण केले. वैराग्य म्हणजे काय नक्की? भुवई किंचित वर सरकली नजर माझ्यावर रोखीत त्यांनी सवाल केला……… कसल्या शोधत आहेस नक्की? आज पर्यंत लोकांनी दान म्हणून पैसे दिले, कधी खायला दिले पण गाऱ्हाणे झाले कि लोक आपल्या मार्गाने निघून जातात. कधी कोणी थांबून बोलत नाही. आवाजाचा स्तर थोडासा मंदावला होता पण काही बोलायचे मी टाळले, कधी कधी मौनाला जास्त महत्व असते असेही ह्या कळवलीला माझ्या जवळ काहीच उत्तर नव्हते. आता काय ऐकायला मिळणार ह्याच विचारात होतो पण माझे तर्क सुरु होण्या आधीच त्यांनी सुरवात केली.
ह्याचे प्रकार तर खूप आहेत सारे काही मला माहित नाहीत पण माझ्या मते “साधू बनून योग साधना करण्यापेक्षा समाजात राहून साऱ्या मोहपाशातून स्वतःला मुक्त करून भक्ती आणि ज्ञानाच प्रसार करणारे "संत" केव्हाही श्रेष्ठच. "त्याग" एवढासा शब्द पण आचरणात आणायला मानसिक पातळीवर फारच कठीण काम.” खरे तर कसे आहे ना भक्ती करणाऱ्याला समोर देव आहे कि दानव ह्याची चिंताच नसते अर्थात आपण देवाला मानतो कारण त्याचा आधार आहे असे आपण मानतो पण दानवाचे काय त्याची भक्ती केली तरी तो देखील प्रसन्ना होईलच कि! पण देवांचे विचार मानवाला परमार्थ साधायला मदत करतात आणि दानवी विचार मनुष्याला पाशात ओढून नेतात......... 
 कोणीतरी मागून त्यांच्या खांद्याला हात लावल्याचे मी पाहिले कोणीतरी दान देऊ करत होते बुवां उठून उभे राहिले  स्वीकारून स्वतःचे दोन्ही हात जोडून प्रर्थानाबद्ध झालेल्या व्यक्तिमत्वाला पुन्हा माझ्या माझ्या वेडपट प्रश्नांन मध्ये गुंतवणे योग्य न वाटल्याने मी पुढच्या प्रवासाला निघालो. इंद्रायणी काठच्या मंदिरात तुकोबांचे दर्शन तर झाले पण मंदिरात असणाऱ्या भागड माणसांची कीव देखील आली. एक लहान पोरगा मोबाईल मध्ये गाभाऱ्याचा फोटो पाहत होता माझ्या ही गळ्यात कॅमेरा होता, त्या मुलाला तसे करताना पाहून सावकाराने आपले कर्ज न फेडणाऱ्या माणसावर जशी झडप घालावी तसे त्यांनी केले करताना तोंडी छान शब्द होते "भडव्या फोटू काढाया पाहतु काय!" आता ह्या महान माणसांना समजावण्याचे सामर्थ्य माझ्या मनगटातचं आहे पण इथे त्याचा वापर न करण्या इतपत समाज देखील आहे माझ्यात. देवांचे फोटो का काढू नयेत? आणि जर नाही म्हणता तर देवळा बाहेरच्या सगळ्या दुकानांन मध्ये तसे फोटो उपलब्ध का असतात? वारीला जाणारा प्रत्येक वारकरी विठ्ठलाची असीम भक्ती अंतकरणात साठवून दर वेळेस येतो तितक्याच भक्ती भावाने गाभाऱ्यातला भटजी भक्ती करतो का? म्हणजे आधुनिकीकरण नक्की कसले झाले आहे! भक्तीचे कि भक्तांचे सकाळी जेव्हा निघालो तेव्हा खंडाळ्याच्या घाटात एक मजेशीर दृश्य पहिले.
घाटात लागणारे मंदिर
घाटात मधेच एक मंदिर लागते मी थांबवून फोटो काढत होतो सारखा चिल्लर पडल्याचा आवाज येत होता मग समजले गाडीने जाणारी माणस देवाला दक्षिणा फेकत होते …का तर प्रवास सुखाचा होवो म्हणजे बघा ना पैशाने सगळा विकत घेत येत अगदी देव पण? एक तर देव लाचखोर झाला आहे किंवा मग आपली भक्ती अन्धश्रधेच्या डोहात पार तळाला गेली आहे. कोणी कोणी तर नुसते होर्न वाजवून जात होते हे लोक देवाचे खास असणार आपण मित्रांना करतो न तसे "हाय देवा येताना भेटतो" 
मला वाटते "भक्ती हायटेक" झाली असणार …… 
इकडचा गाशा गुंडाळला आणि पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो समोर बोर्ड होता आळंदी १६ किलोमीटर ह्या फलकाला हुलकावणी देणे नाही जमले, आता इतक्या छान विचारांचे सूर कानात घुमत होतेच. पुन्हा इंद्रायणी काठीच आलो शेंदूर, बांगड्या, गंध काय वेगळीच चहल-पहल होती. गर्दी तशी कमीच होती. तसा वारीला अजून दीड महिना बाकी आहे. नवीनच बांधलेल्या लगीन गाठी, मस्तकी गंध लावणारी काही वयस्कर मंडळी गंध लावल्यावर मिळालेल्या दक्षिणेवर त्यांची गृहस्थी चालत असावी, दर्शनाच्या रांगेचा पहारेकरी समजूतदार दटावणी करत होता, माझी पावले काही आता जायला धजत नव्हती कारण माहित नाही आणि मनात नसेल तर मी देवळात जात नाही. निघायच्या बेतात होतो आणि पार अतः कारणाचा  वेध घेणारी हि व्यक्ती दिसली.  

ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन पडताना घेतलेले हे छायाचित्र. 
वयक्तिक लिखाणात कोणाच्या दुःखाचा अनादर होत असल्यास क्षमस्व……
माझ्या सारख्या मूर्खाचे विचार कुठे आणि ह्यांची श्रद्धा कुठे मी म्हणतो देव दाखवा तर विश्वास ठेवीन आणि ह्यांच्या भक्तीचे वर्णन करायला माझ्या जवळ शब्द देखील नाहीत. दाटून आलेला कंठ पाण्याच्या घोटाने ओला केला म्हणून पापण्या ओलावल्या नाहीत आता इथे थांबणे मला शक्यच नव्हते तसाच गाडी ठेवलेल्या ठिकाणी आलो खांद्यावरची बाग तशीच ठेवली गळ्यात कॅमेरापण तसाच होता हातातली पाण्याची बाटली पायाच्या घडीत ठेवत आधी तिथून बाहेर पडलो साधारण १० किलोमीटर आलो असेन तेव्हा पाण्याची बाटली पडायला आली तसा विचारातून बाहेर आलो गाडी थांबवली आणि सगळ नीट सावरून पिंपरी चिंचवडचा रस्ता धरला. 

काय काय इच्छा घेऊन मनुष्य जन्माला येतो आणि नशिबाची पायवाट कुठवर नेते ह्याहून इच्छाशक्ती किती प्रखर आहे ह्यावर त्याचा परमार्थ टिकून असतो. आता तर वारीचे वेध अजून प्रबळ झाले आहेत संपूर्ण २१ दिवस काही जमायचे नाही पण शेवटचे ३ दिवस तरी ………. पाहूया जमते काय ते!!


तुकाचीये ठायी पांडुरंग पाहिला 
आसमंत गजराला टाळ वर्णी,
ज्ञानोबा माउलीचा गजर जाहला
दिंडी सोहळा पायी चालला,
दर्शनास विठूच्या जीव अधिरला
ध्वज पताकांचा साज रंगला,
अश्वमेध रिंगणी बेभान दौडला
जणू प्रपंचाचा पाश मोडला,
आत्म्याचा पाठीराखा विठू पंढरी
चालतो अखंड वाट मी वारकरी.  





गुरुवार, २१ मे, २०१५

सातारा रेंज भाग २



कोणी तरी म्हणाले होते “तेरा सब उलटा हि रहेता है” लोक पौर्णिमेला ट्रेक करतात आणि मी अमावस्येला ….. लिंगाणा, तैलबैला, अजून देखील आहेत आठवत नाहीत, आज देखील अमावस्या आहेच कि! म्हणजे काय तर अमावस्या आणि ट्रेक समीकरण जुळून येते आहे. ऑफिसची काम संपवून निघे पर्यंत ८.४८ ची खोपोली लोकल गेली. आता शेवटची १०ची ती मला खोपोलीला १२.३० ला पोहोचवणार होती. एवढ्या रात्री अनिकेतला यावे लागले असते म्हणून त्याला फोन करून सांगितले त्याच्या एका होकरावर माझा ट्रेक तग धरून होता. प्रणवच्या आईला बरे नसल्यामुळे त्याला येणे शक्य नव्हते. कल्पेश नाही, कुंदन, अनिकेतला वेळ नव्हता. प्रशु ने पुढचा विकएंड बुक करून ठेवला होता त्यामुळे तोहि नाही. (सोलो ट्रेकला जा असे मी ही कोणालाच सुचवणार नाही) पण गेल्या ५ महिन्याचा ट्रेकचा उपवास ऑफिसची डोकेदुखी ह्या सगळ्याला नजरेत घेता एवढा केलाला प्लान रद्द करणे नाही जमले. ऑफिसमधून निघालो तेव्हा ९.२७ झाले होते आता जेवायला देखील वेळ नव्हता म्हणून अक्षयला म्हंटले मला सी.एस.टी. ला सोड. त्याने सोडल्यावर तिकीट घेऊन आधी खायला शोधले. ऑम्लेटपाव खाल्ला आणि ट्रेनमध्ये मस्त ताणून दिली. कल्याण आले तेव्हा जाग आली १२.३० ला पोहोचणारी गाडी साधारण १ च्या थोडे आधी खोपोली स्टेशनला लागली. अनिकेतला फोन केला तसा तो ही दोनच मिनिटात आला. लोणावळा हायवेचा रस्ता त्याच्या कडून समजून घेतला आणि निघालो. खोपोलीमार्गे लोणावळ्याला आलो आणि छान थंडी पडली होती, म्हणून एके ठिकाणी गाडी थांबवून चहा घेतला आणि अंगात स्वेटर चढवले. आता मात्र मध्ये न थांबता निघालो सातारा येण्या आधी भुईंजला गाडी थांबवली ट्रेकच्या प्लान प्रमाणे आधी कल्याणगड - वर्धनगड - महिमानगड - भूषणगड - सज्जनगड – अजिंक्यतारा असा गडांचा क्रम आखला होता. गावांच्या नावांप्रमाणे म्हणायचे तर कोरेगाव - वडूज - औंध – रहिमतपूर असा सगळा पल्ला फिरत सातारा. पहाटेचे ४.३० झाले होते भुईंज फाट्या जवळचे चहाचे दुकान उघडे दिसले म्हणून थांबलो पत्ता विचारला तर कल्याणगड कोणालाच माहित नव्हता. गुगलवर रस्ता चेक केला तर काही अंतरावर एक फाटा दिसत होता मग चहा घेतला आणि पुढे निघालो साखर कारखान्याचा मोठाला बोर्ड दिसला तिथे दोघे जण उभे होते त्यांना कल्याणगड विचारले तर आजोबा चटकन म्हणाले "नांदगिरीचा किल्ला होय" मनाला हायसे वाटले कि कोणाला तरी माहित आहे म्हणजे आता रस्ता सापडणार. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने गाडी पुढे घेतली निर्जन्य असलेल्या मोकळ्या रस्त्यावर वाऱ्यावर बतावणी करत गाडीची चाकं फिरत होती. गाडीच्या हेडलाईट मध्ये रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे आता भयाण दिसत होती. अंगाला भिनणारा गारगार वारा, समोर दिसणाऱ्या वाडाच्या झाडाच्या पारंब्या, अन गाडीच्या चाकांचा होणारा लयबद्ध आवाज पुढे काय अश्या स्वतःच्या विचारत होतो आणि अचानक थोडे दूरवर कोणी तरी चालताना दिसले जवळजवळ रस्त्याच्या मधो-मधच ती सावली चालत होती, गाडीच्या ब्रेक्सवर नकळतच पायाचा भार पडला तसा गाडीचा वेग मंदावला. शंका अशी कि ह्यावेळी आजूबाजूला कोणतेच गाव नसताना असे रस्त्यात कोणी का चालेल. होर्न वाजवला तर ती सावली बाजूला झाली म्हणजे माणूसच असावा पुन्हा वेग वाढवला आणि पुढे आलो तेव्हा समजले गावातील कोणी बाई होती तोंडा वर “भ” ची बाराखडी उमटून गेलीच. नंतर जस-जसा पुढे आलो बरेच जण रस्त्यावर चालताना दिसले. आता एक रेल्वे फाटक पार करून मी वडूथला आलो होतो (वडूज आणि वडूथ दोन्ही वेगळेवेगळे आहेत) तिथून डाव्या हाताला रस्ता सरळ कल्याणगडाकडे नेतो. कल्याणगड धाबा एवढ्या पहाटे बंदच होता थोडेसेच पुढे एक डोंगरात कोरलेली वाट गडाच्या दिशेने जाते. गाडी कच्च्या रस्त्यावरून वरवर जाऊ लागली आणि मी थेट गगनचुंबी पवन चक्कीजवळ येउन थांबलो त्या पवनचक्कीचा होणारा आवाज अर्धवट पहाटेच्या शांततेला चिरून जात होता. इकडे-तिकडे पहिले रस्ता चुकलो हे नक्की करून पुन्हा मागे आलो तसा मुख्य रस्त्याला लागून एक वाटवर च्या दिशेला जात होती पण तिकडे गाडी नेणे थोडे कठीण होते म्हणून गाडी बाजूला पार्क केली आणि पायीच निघालो.

उत्तरमुखी प्रवेशद्वार
पक्षांच्या किलबिलाट कानी येऊ लागला तसा, उत्तरमुखी प्रवेशद्वारावर पाडव्याच्या मंगलमयी सूर्य किरणांचा अभिषेक होऊ पाहत होता. उगाचच बांधलेल्या चक्राकार दरवाज्या ने माझी वाट अडवली खांद्यावरच्या बॅग मुळे मधेच अडकलो तसा तुटलेल्या दारा च्या कर्णकर्कश्य आवाजाने सगळी शांताता भंग केली. त्यातून सुटून कसा बसा आता गेलो आणि ह्या शिल्पकाराच्या कौशल्या पुढे नतमस्तक झालो. काय सुंदर कमान बनवली आहे.  घुमवदार आकाराची एकमेकांवर रचलेली आरास काय सुरेख मेळ घालून आणला आहे आज इतक्या वर्षांनीसुद्धा जशीच्या तशी आहे.  
शिल्पकाराच्या कौशल्याचा अप्रतिम नमुना
दारातून आत आलो तश्या दोन वाटा दिसल्या एक उजवीकडे एक पत्र्याच्या शेड मधून बुरुजाला लागून पार खाली उतरत होती कल्याणगडावर आलो आणि गुहेत नाही गेलो मग काय पाहिलं!!!! 
गुहेकडे उतरत जाणाऱ्या पायऱ्या
कोणाचाच मागमूस लागत नव्हता, मग बॅग खाली ठेवली आणि हळू हळू पायऱ्या उतरू लागलो, समोरच गुहेच्या तोंडावरती मधमाश्यांची मोठाली पोळी दिसली. दोन पोळ्यातले मधमाश्यांचे श्रम कोणा मानवाने लंपास केले होते आणि त्याचा निस्वार्थी पणा म्हणू कि स्वार्थी पणा अर्धवट पोळे तिथेच होते जेणे करून तिथेच त्यांनी आपल्या घराचे नक्षीदार काम पुन्हा सुरु करावे.  
मधमाश्यांचे पोळे
गुहेचे प्रवेशद्वार
गुहेत प्रवेश केल्यावर
गुहेत प्रवेश करायला जवळजवळ बसूनच जावे लागते डाव्या बाजूला एक वाट आतील बाजूस जाते. वाटेच्या दोन्ही बाजूस पाण्याचे टाके आहेत म्हणून दुतर्फा रेलिंग लावल्या आहेत. मी विजेरीच्या प्रकाश झोतात हळू हळू पुढे सरकलो एका विशिष्ठ ठिकाणी आल्यावर पूर्ण पणे उभा राहीन ह्याची खात्री केली आणि उभा राहिलो, गुहेत मंदिर असल्याने शूज वरतीच काढून ठेवले होते अनवाणी पायांना झालेल्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने अंगात शिरशिरी भरली, डोक्याला लावलेली विजेरी माझ्या पुढ्यातला अंधार तर दूर करत होती पण गुहेतील ती थंड शांतात नसानसात भिनत होती, मी सोडलेल्या श्वास बरोबर धुक्यात बनणारी वलय आक्राळ-विक्राळ आकार घेत माझ्या डोळयांन देखत नाचत होती. संपूर्ण गुहेत एक नजर फिरवली मी एकटाच असल्याची खात्री करून घेतली आणि पुढे सरकलो दोन्ही बाजूला पाण्याची टाकी आहेत त्यात मोठाले विचित्र आकाराचे खडक जसेच्या तसे आहेत. अगदी आतल्या बाजूला मंदिर बनवलेले आहे फोटो काढायचे म्हणून खाली बसून कॅमेरा सेट करत होतो इतक्यात पाण्यात एकाच वेळी चार ते पाच ओघळ पडले पण त्याच्यातले अंतर सेकंदाच्या अगदी बारीक हिश्या एवढे होते आधीच मी निर्जन्य अश्या ठिकाणी एकटाच होतो गुहेतल्या भयाण शांततेत एकाच लाईन मध्ये पाण्याच्या झालेल्या टपप्प्प्प्प आवाजाने मला गरकन गिरकी घेऊन मागे वळायला भाग पडले. मनातल्या इतर शंका मनातच दाबल्या आणि पटकन दोन फोटो काढून बाहेरचा मार्ग धरला. गुहेच्या आत सूर्यकिरणे येत नाहीत पण प्रवेशद्वारा वरच्या त्या तेजोमय अस्तित्वाला पाहून मनाला हायसेच वाटले. बाहेर आलो आणि मग पुन्हा आत वळून पहिले आता इतक्या वेळ ओठांवर नसलेले स्मित परत आले होते समोरच्या खडकावर मंदिराकडे असे लिहले होते. उभ्या आयुष्यात तो पाण्याचा आवाज मी विसरणार नाही. आता बाकीचा गड पाहून लवकरात लवकर पुढच्या गडाच्या मोहिमेवर निघाचे होते. प्रत्येक गडावर मारुतीरायांचे दर्शन नक्कीच घडते, बलशाली प्रतीकच ते, डाव्या बाजूला वळालो (मूर्ख) सरकारच्या दुर्ग संवर्धन ह्या उपक्रम अंतर्गत बनवलेल्या सिमेंटच्या रस्त्याने पुढे काही अंतरावर असणाऱ्या मशीदीच्या उरलेसुरलेल्या अवशेषांच्या दिशेने चालताना झाडाच्या मधून अचानक कोणी तरी डोकावताना दिसले, 
पिर आणि साधूबाबा
आता अजून किती धक्के पचवायचे होते काय माहित थोडा अजून पुढे आलो आणि पाहिले एक साधू बाबा आपल्याच्य तोऱ्यात होते. माझे येणे त्यांना तितकेसे आवडले नव्हते हे निश्चित. गडाचे उरलेसुरलेले अवशेष कॅमेऱ्यात बंदिस्त करून परतीची वाट धरली.
गुहेच्या वरच्या बाजूची तटबंदी
हनुमानाचे मंदिर 
जय श्रीराम
 चुन्याच्या घाण्याचा दगड (तो साधूबाबा कपडे धुवतो आहे ह्यावर)
कल्याणस्वामींची समाधी
पाण्याचे तळे
दगडात कोरलेले तलवारीचे चित्र
कल्याणगड: -

नंदगीरीचा हा किल्ला शिलाहार दुसरा राजा भोज ह्याने इ.स ११७८ ते इ.स१२०९ या कालावधीत बांधला असावा असे सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार समजते. महाराजांनी १६७३ मध्ये सातारा मोहिमेत गड ताब्यात घेतला असावा. पुढे पेशव्यांकडे आणि ततपश्चात १८१८ मध्ये जनरल प्रिझलरने हा किल्ला ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नेला. गडावरचे सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे गुहा जवळजवळ ३० मीटर, रूंदी ४ मीटर व ३ मीटर असणाऱ्या भुयारात १२ महिने पाणी असते. वाटेच्या आजुबाजूला लोखंडी कथडे आहेत. भुयाराच्या शेवटी नवव्या शतकात घडवलेली पाश्वर्नाथांची मूर्ती, पद्मावती देवीची मूर्ती आणि श्री दत्तात्रेयाची मूर्ती अशा ३ मूर्त्या आहेत. 


दत्तात्र्यांची मूर्ती
पार्श्वनाथांची मूर्ती
कल्याणगडा वरून साधारण दक्षिणेला जरंडा, अजिंक्यतारा, यवतेश्वर, चंदनवंदन, मोर्‍या, वैराटगड ही ठिकाणे दिसतात.

किल्ल्याची ऊंची:-        ३५००                            किल्ल्याचा प्रकार:-                   गिरीदुर्ग
डोंगररांग:-                    सातारा                            श्रेणी:-                                      मध्यम
जिल्हा:-                       सातारा                            गाव:-                                       वर्धनगड
पाण्याची सोय:-            आहे.                              जाण्यासाठी लागणारा वेळ:-       ३० मिनिटे
राहाण्याची सोय:-         तितकीशी सोयीस्कर नाही.    जेवणाची सोय:-                        स्वतः करावी.

मुंबई ते कल्याणगड: - मुंबई वरून साताऱ्या अगोदर लागणाऱ्या भुईंज गावा जवळच्या साखर कारखान्याच्या रस्त्यावरून वडूथला येउन डाव्या हाताकडील रस्ता सरळ किल्याकडेच जातो. कल्याणगड ढाब्याच्या बाजूने एक कच्चा रस्ता लागतो, त्या रस्त्याने वर जाताना मधेच दोन वाटा फुटतात एक रस्ता अजून वर जातो. त्यानेच गडावर जाता येते

 गाडी उभी केलेल्या ठिकाणी आलो तेव्हा सकाळचे नऊ वाजत आले होते, भूक तर तडकून लागली होती. आता वर्धनगडाकडे मोर्चा वळवला आणि रस्तात काही खायला मिळेल ह्याच अर्थाने. कोरगावला आलो तर सगळीकडे गुढी उभारण्याची लगबग चालली होती. मुख्य रस्त्यावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वर्धनगड आहे इतकी माहिती होती. पोटात कावळे "मिसळ मिसळ" असे जोरात ओरडत होते, म्हणून तंबू वजा हॉटेलमध्ये थांबलो, पोराने विचारले "काय देऊ साहेब?" पुन्हा कावळ्यांचा आवाज आला "मिसळ मिसळ" मग त्याला सुद्धा तेच आणायला सांगितले. चांगले चार पाव आणि झणझणीत मिसळ झाली तसा गाडीच्या चाकांना पुन्हा वेग आला. वर्धनगड गावाच्या वळणावरील चौथऱ्यावर दोन छोटे खानी तोफा स्वागतला आहेत.
गावात शिरताना स्वागताला असणाऱ्या तोफा

गावातल्या काकांना गडावर जाणारी वाट विचारली तर म्हणाले "गाडी इकडे लावा, आणि इथूनच वर जा" मग मी तसेच केले गाडी त्यांच्याच घरा समोर पार्क केली तसे काका म्हणाले "जर काही सामान ठेवायचे असेल तर ठेवा, उगाच कशाला वजन उचलून नेता." नकळत मिळालेला पाहुणचार मनाला सुखावूनच जातो, मी पण लगेचच बॅग त्यांच्या हातात दिली. अधुनिक पद्धतीने बांधलेल्या पायऱ्या चढू लागलो मधेच एका झाडाखाली शेंदूर फाशीत देव विराजमान आहेत. 
शेंदूर फाशीत देव
गडावरच्या मार्गात तशी झाडे कमीच आहेत त्यात मार्च महिना कोणी तरी खाली उतरताना दिसले दोघे मध्यम वयाचे होते, काकी जराश्या दमल्या सारख्याच वाटत होत्या म्हणून माझ्या जवळ असलेली पाण्याची बाटली पुढे केली तर काका म्हणणे "पोरा आहे आमच्याकडे पाणी, तू ठेव तुला लागेल ऊन खूपच आहे." मग कुठून आला वगेरे चौकशी आणि त्यांना माझी समाधान कारक उत्तर मिळाल्या नंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. १५ मिनीटाच गोमुखी प्रवेशद्वारा पाशी आलो. 
प्रवेशद्वाराची सुरवात
दारा जवळूनच तटबंदी चालू होते ती संपूर्ण गडाला वळसा मारून पूर्ण होते अजूनही शाबूत अवस्थेत असणारी हि तटबंदी चालत चालत फिरताना बांधलेले १४ बुरुज पाहायला मिळाले. 


बुरुज आणि तटबंदी
पुन्हा दारापाशी आलो होतो आता गडाच्या मुख्य रस्त्यावरून वर जाताना मारुती रायाचे मंदिर आणि पुढे महादेव विराजमान असलेले दिसतात. 
मंदिर
उध्वस्त शिवलिंग
तलावाच्या बाजूने वरच्या बाजूला कच्च्या पायऱ्यांची वाट आहे त्याने वर आल्यावर गडाच्या अधिष्ठात्री वर्धनीमातेचे मंदिर लागले, 
कच्च्या पायऱ्यांची वाट
अधिष्ठात्री वर्धनीमातेचे मंदिर
पुजारी बुआ गुडी उभाराच्या तयारीत होते. देवी नवसाला पावते असे म्हणतात मी काही आत गेलो नाही. मंदिराच्या मागे दगडाचा आकर्षक असा दीपस्तंभ आहे. 


नेहमीच्या दीपमाळे पेक्षा वेगळा 
गड फिरून झालाच होता मग खाली उतरायला लागलो आता उन्हाचा ताप चांगलाच वाढला होता. गावात परत काकांच्या घराजवळ आलो बॅग मागितली तर त्यांनी घरात येण्यास आमंत्रण दिले पाणी दिले आणि म्हणाले जेवूनजा थोड आता मात्र मला थोडे अवघडल्या सारखे झाले म्हंटले काका जेवण नको मला पुढचा प्रवास करायचा आहे. "पोर सणासुदी पाव्हणा म्हणून आलास आहे एवढ्या लांबवर दोन घास खाउन जा बरा वाटेल गरिबाला". मायेच्या विनवणी पुढे माझ्या नाकारानें तग नाही धरला, मटकीची उसळ, भाकरी, कांदा असे ताट पुढ्यात आले, पाडवा होता त्या दिवशी घरात गोड नाही बनणार!!!!!!! पुरणाची पोळी अह्ह्ह दिवसच सार्थकी लागला माझा. आता दिवसभर काही पोटाला खुराक लागणार नव्हता. नवीन वर्षाची सुरवात मोठ्यांच्या आशीर्वादाने व्हावी पण घरात नसल्याने आई बाबा समोर नव्हते मग आज माझे उदरभरण करणाऱ्या निंबाळकर काकांनांच नमस्कार करून महिमानगडाचा रस्ता धरला. 

वर्धनगड: -

१२ अक्टोबर ते ११ नव्हेंबर १६६१ महाराज वर्धनगडावर मुक्कामास होते. १७०१ मध्ये मुघलांनी पन्हाळा जिंकून आपले लक्ष्य साताऱ्याकडे वळवले. मोगल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला की ‘‘बादशहांनी खटावला छावणी करावी, म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील’’. औंरगजेबाने या योजनेला मंजुरी दिली. दि. ८ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभव झाला. नंतर ९ जून १७०१ रोजी वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखाना जवळ पाठवला. त्याने याला सांगितले की ‘‘किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे’’. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केली. खरतर फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळाकाढूपणा होता.मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फतेउल्लाखान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पाहात राहीला, पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकला सुध्दा नाही. फतेउल्लाखानाला मराठयांचा डाव लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला.त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले, पण यात अनेक मराठे मारले गेले. अनेकजण जखमी झाले. मोगलानी मराठ्यांच्या चाळीस लोंकाना कैद केले. मग मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाडया जाळून टाकल्या. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. दि. १९ जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी ‘मीर ए सामान’ या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य, चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू, सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून ‘सादिकगड’ असे ठेवले. वर्धनगड तीन वर्ष मोगलांच्या ताब्यात होता. सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्लेदार किशोरसिंगला कैद केले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोगलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. इ.स.१७०७ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. हा गड स्वतः महाराजांनी अफझलखानाच्या वधा नंतर बांधून घेतला.

किल्ल्याची ऊंची:-        १५००                   किल्ल्याचा प्रकार:-                   गिरीदुर्ग
डोंगररांग:-                    म्हसोबा, सातारा       श्रेणी:-                                      मध्यम
जिल्हा:-                       सातारा                    गाव:-                                       महिमानगड
पाण्याची सोय:-           आहे.                      जाण्यासाठी लागणारा वेळ:-       २० ते ३० मिनिटे
राहाण्याची सोय:-        नाही.                       जेवणाची सोय:-                        स्वतः करावी.

कल्याणगड ते वर्धनगड: - कल्याणगड वरून कोरेगावला यावे मुख्य रस्त्यावरून सातारा - पंढरपूर महामार्गावर वर्धनगड गाव लागते. 

व्यापारी मार्गाच्या रक्षणाकरिता बांधलेल्या ह्या गडाची पडझड झालीच आहे म्हणा पण तरीही लांबूनच आपले अस्तित्व दाखवतोच. 
गावाच्या वळणावरून वर्धनगड
गावात आलो, माझा एकूण अवतार पाहून लोकांच्या मनात चुकीच्या वाटेने आलेला कोणी तरी अशी जी काही समजूत होती ती माझ्या प्रश्नाने थोडी दूर झाली. "इथे गडावर कुठून जायचे?" मी विचारले. एक मुलगा म्हणाला "ह्या मंदिराच्या बाजूने वर जा पायवाट सापडेल." गाडी ठेवली आणि मोबाईल वाजला ऑफिस वाले काही मला सुखासुखी सुट्टी घालवून देणार नाहीतच. जवळजवळ तीस ते चाळीस मिनिटांनी फोन बंद झाला, समोर एक काकी बसल्या होत्या त्यांना पाण्यासाठी विचारले आणि ठेव्याला त्यांचा होकार मिळवून. पाण्याची बाटली कमरेला बांधली, मंदिराच्या बाजूच्या पायवाटेने वर चढू लागलो मुळात पायवाट हा प्रकार इकडे नाहीच आहे गुरांच्या चलण्यामुळे बरेच मार्ग बनले आहेत रखरखीत उन्हात समोरच पाहायला होत होते जर नजर वर घेतली कि डोळ्यांना त्रास होत होता, एकदा, दोनदा, तीनदा वेगळे वेगळे मार्ग आजमावून देखील वाट काही केल्या सापडत नव्हती जणू काही चकवाच लागला आहे. थोडा वेळ बसून पाण्याचे दोन घोट घेतले भिरभिरणारे डोके शांत केले आणि पुन्हा नव्याने सुरवात केली आता पायवाट सोडून स्वतःचा असा मार्ग बनवत वरच्या दिशेने जिकडे भगवा दिसत होता त्या दिशेने चढू लागलो, संपूर्ण मी घामाने डबडबलो होतो आणि समोर दगडानमध्ये तुटलेल्या पायऱ्यांचे अवशेष दिसले त्या क्षणी जो आनंद अनुभवला आहे ना तो काही औरच आहे. 
तुटलेल्या पायऱ्या
पायांचा वेग वाढला आणि झपाझप पावले टाकत मी गडाच्या दारापाशी येऊनच थांबलो. पुन्हा पाण्याचे दोन घोट घेतले. एवढ्याश्या दिसणाऱ्या ह्या गाडाने माझा चांगलाच घाम गाळला होता. आत शिरताना डाव्या आणि उजव्या बाजूला दगडात हत्तीचे मुख कोरले आहेत.  
गजमुखाचे शिल्प
कमानीचा एक मोठाला दगड जवळच पडलेला दिसतो. तटबंदीच्या बुरुजावर भगवा फडकत होता. थोडे पुढे आलो तर मंदिर लागले एका गोष्टीचे मला नेहमी आश्चर्य वाटते देवाला पण कडीकुलुपात का ठेवता? नक्की कोणाला कोणाची धास्ती आहे? कदाचित देवच आजकाल मनुष्याला घाबरत असावा. दगडांनमध्ये देव कि देवाचा दगड _/\_.  
मराठ्यांचे मनाचे चिन्ह घेऊन उभा असणारा बुरुज 
कैदेतला मारुती
पाण्याचा जलाशय
मोठाला पाण्याचा जलाशय आहे पण स्वच्छता नसल्याने शेवाळे जमले आहे. ईशान्येला असलेल्या गडाच्या विस्तारित भागाकडे जाताना एक चोरदरवाजा लागतो. 
ईशान्येकडील बुरुज आणि त्यातला चोर दरवाजा
वातावरणाचा ताप खूपच वाढला होता तसा गड देखील पाहून झालाच होता म्हणून खाली उतरू लागलो. समान पुन्हा गाडीवर लादले आणि भूषणगडाच्या शोधत निघालो. 

महिमानगड: -    

मुख्य डोंगर रांगेपासून वेगळा असला तरी ह्यावरील कातळानमुळे लक्ष वेधी आहे. आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर - पंढरपूर - सातारा - वाई - महाड असा व्यापारी मार्ग होता. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले, त्यापैकीच एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते.

किल्ल्याची ऊंची:-        ३२००              किल्ल्याचा प्रकार:-                   गिरीदुर्ग
डोंगररांग:-                    सातारा              श्रेणी:-                                      मध्यम
जिल्हा:-                       सातारा              गाव:-                                       महिमानगड
पाण्याची सोय:-            आहे.                जाण्यासाठी लागणारा वेळ:-       २० ते ३० मिनिटे
राहाण्याची सोय:-          नाही.                जेवणाची सोय:-                        स्वतः करावी.

वर्धनगड ते महिमानगड: - सातारा पंढरपूर मार्गावर स्थित आहे.

अवघ्या ९८ किलोमीटरवर विठूराया विराजमान होता मनात आणले असते तर दोनच तासात पोहोचलो असतो पण योग वारीचाच हवा म्हणून तिकडे नाही जाण्याचेच निश्चित केले.







बुधवार, २२ एप्रिल, २०१५

रक्तदान


नोंदणी का करावी?

             ह्याचा अनुभव मला काही दिवसांन पूर्वी आला. नोंदणी केली की इवेन्टसचे अपडेट पाठवणे हा कोणत्याही ग्रुपचा पहिला भाग असणारच त्याला मार्केटिंग म्हणता यॆइल. पण आपण दिलेल्या माहिती मधील रक्तगटाची नोंद फार महत्वाची ठरते. ऑफिस मध्ये असताना अचानक फोन खणखणला समोरून विचारणा झाली “आप प्रितम बोल रहे है क्या?” मी हो म्हणताच, पुन्हा प्रश्न “आप का ब्लड ग्रुप B- है क्या?” माझा होकार मिळताचं पुन्हा काळजीने केलेला प्रश्न! क्या आप ब्लड डोनेट करनें आ सकते है? ऑफिस मध्ये होतो म्हणून कुठे आणि कधी यायचं विचारलं. पलीकडला काळजीचा सूर चिंतेत बदलला होता. त्यांनी लीलावती हॉस्पिटल सांगितले आणि जमल्यास आज यायला जमेल का? असेही विचारले म्हणून विचारले, होकार देऊ कि नकार हे ऑफिस मध्ये असल्यावर समजत नाही, पण तोंडाने मनाचा होकार दिलाच होता. फोन ठेवला आणि मग लक्षात आले एच. आर. ला काय सांगू!!!!!!!!!!

            आय. टी. वाल्यांचे ते एक बरे असते आम्हाला काम खूप असते आणि त्यातले कोणाला काही समजत नाही. मग लगेचच एक काल्पनिक काम माझ्या लक्षात आले. बांद्राला आलो आणि तिकडून हॉस्पिटलच्या खाली उभे असताना त्यांना फोन केला. त्यांनी तिसऱ्या माळ्यावर या असे सांगितले. इकडे आल्यावर मला हॉस्पिटल पेक्षा हॉटेल मध्ये आल्याचा अनुभव जास्त आला. तिसऱ्या माळ्यावर हॉस्पिटलची ब्लड बँक आहे. मी त्यांना ओळखत नसल्याने पुन्हा फोन केला तर साधारण पस्तीस-चाळीशितील व्यक्ती समोर आली. आप प्रितम हो? मी हो म्हंटले. त्यांच्या चेहऱ्यावर माझे आभार कसे मानावेत ह्याचे भाव स्पष्ट दिसत होते. मी म्हंटले मला परत ऑफिसला जायचे आहे तर आपण जरा ……………… आम्ही फॉर्म भरायला आलो.

प्राथमिक नोंदणी आणि इतर गोष्टी झाल्या. सगळे आटोपून मुव्ही पाहायला आलो अशा थाटात एका अलिशान खुर्चीवर मला जवळजवळ झोपवलच होत आणि दिसायला सुंदर अशी मुलगी (सिस्टर म्हणणार नाही) दाभणनुमा सुई घेऊन टोचताना लागणारी कळ चेहऱ्यावर दिसू न देत मी शांत पडून राहिलो.

             पुढची प्रोसेस नेहमी प्रमाणेच झाली आणि मी लागलीच निघायची तयारी केली. रक्तदान ह्या आधी पण केले आहे. पण कोणी अनोळखी व्यक्तीने असे फोन करून नव्हते बोलावले. आता त्यांनी मला सांगितले कि त्यांचे वडील आजारी होते आणि त्यांना रक्ताची गरज होती. गरज, काळजी, आनंद, असे तिन्ही भाव एकदाच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले मला दिसले आणि माझ्या मनाला एका आत्मीयसुख मिळाल्याचा भास झाला.
  
            ह्या गोष्टीला तसे खूप दिवस झाले पण आज त्या व्यक्तीचा पुन्हा फोन आला होत हे सांगायला कि त्यांचे वडील आता घरी आले आहेत आणि त्यांची तब्येत देखील सुधारली आहे. आश्चर्य म्हणजे मला अजून देखील त्या व्यक्तीचे नाव नाही माहित. गरजपण नाही वाटली मला त्याची "माणुसकी" हे एकाच नाव ह्याला शोभेल असे आहे.



शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

सातारा रेंज .......... भाग - १


भर दुपारचा दीडचा सुमार महिमानगडावरून बाहेर मुख्य रस्त्याला आलो, उन्हाची झळाळी चांगलीच जाणवत होती. भूषणगडचा मार्ग विचारायला म्हणून उसाच्या गुऱ्हाळाजवळ गाडी थांबवली आणि चांगले ३ ग्लास गटकावले. पुन्हा गाडीची चाके पंढरपूर मार्गावर भरधाव धावायला लागली. कराड-वडूज मार्ग तसा चांगला आहे पण ओसाड प्रदेश, म्हणजे शेती होते पण रस्ताच्या दुतर्फा झाडे नाहीच. सुर्यदेवांनी स्पॉटलाईट माझ्यावर केंद्रित केला होताच. त्यात रात्र भराचा प्रवास आणि सकाळ पासून केलेले तीन ट्रेक त्या मुळे आता झोप आवरणे आणि बाईक चालवले कठीण झाले होते.  उंबर्डे गावावरून गुरसाळे कडे जाणाऱ्या मार्गावर होतो आणि डोळ्यांनी झपकी मारली तशी लागलीच गाडी थांबवली पुढे जाण्या आधी एक पॉवर न्याप गरजेचा होता. मागे पुढे पहिले थोडे दूरवर शेतात एक मोठाले झाड होते गाडी सरळ शेतात उतरवून झाडाखाली पार्क केली. शेताची नुकतीच कापणी करण्यात आली होती, त्यामुळे दूरवर नजर फिरवली तरी तळपणाऱ्या सुर्यकिरणांची झळ जाणवत होती. अश्यातही हे प्रचंड झाड आपले हात पसारून माझ्या सारख्या मुसाफिराला आपल्या गर्द सावलीच्या छायेत घेण्याचे काम चोख बजावत होते. झाडाखालचा पाला पाचोळा मऊ गालीचाच समजून, सोबत आणलेली चादर अंथरली, निळ्याक्षार आकाशाखाली शरीराचा भार धरणी मातेच्या स्वाधीन करत पहुडलो असताना मनात काही ओळी रचल्या गेल्या.   
 झाडाच्या शांत सावलीत, गार वाऱ्याची झुळूक,
ध्यानी मनी नसताना, येते कानावर शिळ
मुसाफिर मी तरुण मनाचा, तारुण्य वेचितो,
कुंचल्याच्या लेखणीहून, सामर्थ्य नजरेत,
भावनांच्या साखळीला, स्पंदनांचा साज,
विस्कटलेल्या विचारांना, आठवणींचा स्पर्श.
किती वेळ झोपलो माहित नाही पण खिशातला फोन खणखणला आणि जाग आली. मस्त तरतरीत वाटत होते, कुभकर्णाची झोप पूर्ण झाल्याचा फिल होता. अजून भूषणगड शोधायचा होता, पहायचा होता आणि मुक्काम करायला सज्जनगडावर जायचे होते म्हणून तोंडावर थोडे पाणी मारले आणि निघालो. गुरसाळे वरून जस-जसा पुढे आलो तसे गडाचे दर्शन व्हायला लागले होते. मुख्य रस्त्यावरच्या बस थांब्याच्या बाजूने एक वाट वर गावात जाते, गावातल्या मैदानात गाडी थांबवली आणि कोणाकडे पाणी मिळते का म्हणून गावात शिरलो, घर कम दुकान ज्यादा, अश्या दारात आज्जी उभ्या होत्या. दुकान होते म्हणून विचारले.  चहा मिळेल का? "नाही पोरा चहा नाही ठेवत" त्यांनी उत्तर दिले. दुपारच्या झोपे नंतर मस्त चहा मिळाला कि कस तरतरीत वाटते. जाऊंदे पाणीच द्या! मी म्हणालो. आज्जी आत गेल्या आणि एका हातात पाण्याची बाटली आणि एका हातात चहाचा कप घेऊन आल्या "मी माझ्या साठी टाकला होता तू पण घे थोडा" मला वाटले होते पैसे घेतील पण नाही घेतले त्यांनी काय श्रीमंती भरली आहे ह्या गावाकडच्या लोकांत त्या पांडुरंगालाच माहित. मनोमन आजींच्या पाया पडून आणि अंगावरचे ओझे त्यांच्या दारात ठेवून गडाच्या पायऱ्या चढू लागलो. आजच्या दिवसातला हा दुसरा प्रेमळ अनुभव.
किल्ले भूषणगड
भूषणगड: -
गडाच्या पायऱ्या चढून जाताना दरवाजा नेहमी उजवी कडेच राहतो त्यामुळे शत्रू कायम गडावरील पहारेकऱ्यानंच्या नजरेत राहात असे. गडाची तटबंदी भक्कम आहे असे म्हणायला हरकत नाही पण दरवाजाची कमान मात्र कोसळली आहे. 

प्रवेशद्वाराचे भक्कम बुरुज 
संपूर्ण प्रदेशात हा एकाच गड आहे. १२०० च्या शतकातील हे बांधकाम देवगिरीचा राजा सिंघण ह्याच्या कारकिर्दीत बांधला गेला असावा. महाराजांनी १६७६ मध्ये आदिलशहा कडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. औरंगजेबाने जेव्हा किल्ला काबीज केला तेव्हा ह्याचे नाव बदलून "इस्लामतारा" केले. पुढे पेशव्यांनी आणि त्या नंतर इंग्रजांनी १८४८ मध्ये भूषणगड आपल्या ताब्यात घेतला. आत प्रवेश केला कि भक्कम तटबंदीत जंग्या पाहायला मिळतात.  
बुरुजात कोरलेल्या जंग्या ह्यांचा वापर गडावरून तोफा डागण्यास होत असावा 
(तोफ जागेवरून हलू नये म्हणून)
किल्यावर गडाचे दैवत हरणाई देवीचे मंदिर पहावयास मिळते. तटबंदीला लागून चालत राहिलो तर आजूबाजूचा परिसर खास करून दक्षिणे कडील नवीनच कालव्याचे काम चालेलेल दिसते. गडावरून खाली उतरताना एक वाट डावी कडे जाते येथे भुयारी देवीचे मंदिर आहे. भुयार दिसले नाही मंदिर मात्र नवीनच बनवलेले आहे.
 गडाला लागून एकही डोंगर नाही त्यामुळे गडावरून 
चारही बाजूला दूरपर्यंत शत्रूवर नजर ठेवणे शक्य होते
गडावर गर्द झाडे आहेत त्यामुळे बराच दिलासा मिळाला थंड वारा आणि सावलीत गडाची संपूर्ण तटबंदी फिरून पुन्हा मुख्य प्रवेशदारापाशी आलो तेव्हा साधारण ४ ते ५ चा सुमार असेल. सज्जनगडाचे दरवाजे रात्री बंद होतात म्हणून खाली उतरायला लागलो आजींन कडून बॅग घेऊन पुन्हा माझ्या रथाचे दावे हाती घेत भरधाव निघालो.
झाडांच्या सावलीतून जाणारी पाऊलवाट 
किल्ल्याची ऊंची:-        2970  फुट                     किल्ल्याचा प्रकार:-                   गिरीदुर्ग
डोंगररांग:-                     डोंगररांग नाही                श्रेणी:-                                      साधारण
जिल्हा:-                        सातारा                          गाव:-                                      भूषणगडवाडी
पाण्याची सोय:-            आहे.                            जाण्यासाठी लागणारा वेळ:-       ३० मिनिटे
राहाण्याची सोय:-          मंदिरात होऊ शकते          जेवणाची सोय:-                        स्वतः करावी.
महिमानगड ते भूषणगड: - 
 महिमानगड मुख्य रस्तावरून डाव्या हाताला वळावे - सातारा-पंढरपूर महामार्ग- कराड-वडूज मार्ग (पळशी) - उंबर्डे - गुरसाळे - होळीचागाव - भूषणगड.  हा साधारण ४० किलोमीटरचा पल्ला आहे.
औंध महामार्गावर काढलेला फोटो
आता औंध - रहिमतपूर मार्गे सातारा आणि पुढे सज्जनगड असा प्रवास सुरु झाला. पराक्रमी सूर्य देवांचे तेज काहीसे मृदू होऊ लागले होते आणि निळ्या आकाशी भगव्या रंगाची उधळण सुरु झाली होती. गडावर जाऊन मस्त झुणका भाकर मिळाली तर खायची असा फक्कड बेत बनवला होता. नागमोडी वळणांच्या घाट रस्त्यावर वाऱ्याशी बतावणी करत करत सज्जनगडाच्या पायथ्याशी आलो. 
 निळ्या आकाशी भगव्या रंगाची उधळण
             गाडी व्यवस्थित एका जागी लावून गडाच्या पायऱ्या चढायला सुरवात केली मला वाटले कोणीच नसेल पण वर्दळ होती त्यातले बरेच जण राहण्याच्या बेताने आलेले दिसले,वरती आलो तर गड की गाव तेच समजले नाही बरेच बांधकाम केले गेले आहे. कुठे झोपायला जागा मिळते आहे का पाहत होतो तर एक गुरुजी म्हणाले "बाहेर राहायला परवानगी नाही." मी म्हणालो पण मी तर फार दुरून आलो आहे आता कुठे जाणार. त्यावर ते म्हणाले "रूम मिळेल राहायला. तिकडे संस्थानाचे कार्यालय आहे त्यांना भेटा." आता खर्च होणार ह्या शंकेनेच मी कार्यालयात प्रवेश केला. वर पासून खाल पर्यंत एका नजरेत माझा अवतार पाहून त्यांनी आधी बसायला सांगितले आणि येण्याचे कारण विचारले. (खांद्यावर मोठाली बॅग, एका हातात कॅमेऱ्याचा ट्रायपॉड, ट्रेकिंगचे कपडे, गळ्यात बंडाना, वाढलेली दाढी, कसा-बसा सजवलेला केसांचा पिसारा असेच काहीसे देखणे रूप होते.) मी सांगितले "गड किल्ले फिरायला निघालो आहे. आज इथे मुक्काम करून उद्या परतीचा प्रवास आहे." त्यांनी लागलीच माझा पत्ता आणि मोबाईल नंबर लिहून घेत एक किल्ली माझ्या स्वाधीन केली. "सव्वा आठ वाजता दासबोध उपासना असते ती संपली कि लगेच नऊ वाजता महाप्रसाद" असणार वेळवर नाही आलात तर त्याचा लाभ घेता येणार नाही शिस्त आहे इकडची. त्यांच्या बोलण्यात एक जबर पण मृदुता होती एखाद्या अधिकार वाणी सारखी आणि मी फक्त ऐकत होतो. त्यांचे बोलणे थांबले तसे मी विचारले "रूम करीत किती भाडे द्यावे लागणार." "नाही भाडे काहीच नाही तुम्ही जर स्व-इच्छेने काही देणगी दिलीत तर द्या!" आत मात्र चकित व्हायची पाळी माझी होती. शांत पणे चावी घेऊन मला दिलेल्या खोली कडे निघालो. सुस्थितीत असलेल्या १० x १० खोलीत दारा जवळ ठळक बोर्ड लावला आहे. "खोलीची साफसफाई स्वतः करावी" “घेतलेल्या वस्तू जागेवर ठेवाव्यात.” बॅग ठेवून झाडू मारून घेतला मस्त अंघोळ वगैरे करून खाली आलो आणि आनंदाला कॉल केला. आता रात्रीचे साडेआठ झाले होते दासबोध उपासना चालू झाली होती मग आत न जाता बाहेरच्या कट्ट्यावर बसून राहिलो. देवाचे आणि माझे तसे काही वैर नाही पण तो त्याच्या मार्गी असतो आणि माझ्या पण आज इथे मानसिक शांती मिळत होती म्हणून थांबलो. बरोबर नऊ वाजता उपासना संपली तसे गुरुजींनी सगळ्यांना भोजनालयाच्या बाहेर रांग लावायचे आदेश दिले. लोकांना शिस्त पाळायचा काय एवढा तिढा वाटतो समजत नाही त्यांनी एवढे सांगितले तरी हि मंडळी चालली बेशिस्तीत पणे पुढे शेवटी त्यांनी आवाज चढवला तेव्हा कुठे रांगेत आली पण कुजबुज चालूच एवढे काय रांग लावायचे कारण मोजून वीस जण पण नाही आहोत. गडाची शांतात भंग करणे मला बरोबर नाही वाटले म्हणून मी लक्ष नाही दिले. नुसतेच जेवणे माझ्या मनाला पटणारे नव्हते म्हणू गुरुजींना विचारले मी जेवण वाढायला मदत करू का? मला वाटले ते "हो" म्हणतील पण ते म्हणाले "तुम्ही दमला असाल जेवून घ्या!" अनुयायी आहेत ते वाढतील. पंगतीला बऱ्याच वर्षांनी बसलो होतो. ताट, वाटी, पेला आधीच वाढलेले मीठ पानावर बसलो आणि नंतर प्रार्थना ह्या बुफे सिस्टम मुळे हे सगळे आज काल हरवतच चालेल आहे. जेवायला पुढ्यात गरम गरम भात शेंगदाण्याची चटणी आणि सांबार होते. जिभेच्या चोचल्यापेक्षा मनाची तृप्ती जास्त महत्वाची होती. पोट भर जेवण झाले आता मात्र झोप अनावर झाली होती पुन्हा खोलीत आलो खाटेवर न झोपता खाली चटई अंथरली बागेतून स्लीपिंग बॅग काढली आणि त्यातच झोपलो एवढे वजन उचलून नेल्याचा काही तरी फायदा व्हायला नको!! थोडाच वेळ लागला असेल लगेचच झोप लागली. मठातले गुरुजी म्हणाले होते सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी काकड आरतीला या सकाळी जाग आली तेव्हा ६ वाजून ४५ मिनिटे झाली होती. एकाच दिवसात ४ किल्ले संपूर्ण पाहून झाले होते मग आता हा गड देखील पाहून लवकरात लवकर मुंबई कडे निघालो तर वेळेत घरी पोहोचेन ह्या हिशोबात तयारीला लागलो. सकाळचे विधी आटोपून गड फिरायला निघालो सातारा शहरा वरून डोके वर काढणाऱ्या रविराजाल वंदन करून गडाचा फेरफटका चालू केला. गडाचे पावित्र्य तर कालच अनुभवायला मिळाले होते. शांत आदरतिथ्य, पहिल्याच पावसाच्या सरीने जसे धरतीला शिंपडावे तसे कानावर झालेला मंत्रांचा शिडकाव.
सज्जनगडा वरून दिसणारे विहंगम दृश्य
सज्जनगड: -
उर्वशी नदीच्या खोऱ्यात शंभूमहादेव ह्या डोंगररांगेत वसलेला "आश्वलायनगड" आता "सज्जनगड" स्वतः महाराजांच्या पद स्पर्शाने आणि रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे पवित्र झालेला आहे. 
उर्वशी नदी आणि आजूबाजूचा परिसर
तसे पाहता ह्या गडाला बरीच नावे आहेत आश्वलायन ऋषींच्या वास्तव्यामुले ह्याला आश्वलायनगड म्हणत. ह्या शब्दाचे पुढे विटंबन होत ह्याचे नाव "अस्वलगड" देखील झाले. गावाच्या नावावरून ह्याला "परळीगड" असे देखील म्हणतात. ११ व्या शतकातील भोज राजाच्या काळातील हा किल्ला १३०० च्या काळात महंमदशाह म्हणजे आदिलशहाचा आजोबा पणजोबा असावा. पुढे वंश परंपरेने हा किल्ला आदिलशाहाकडे आला १६६२ पर्यंत ह्याचा किल्लेदार फाजलखान होता पुढे २ एप्रिल १६७३ मध्ये शिवरायांनी किल्ला स्वराज्यात घेतला. महाराजांच्या विनंती वरून समर्थ रामदास कायमचे गडावर वास्तव्यास आले. 
समर्थांची समाधी आणि मंदिर
राज्याभिषेकानंतर संभाजी राज्यांना महाराजांनी समर्थांकडे पाठवले, पण नियतीला काही वेगळेच हवे होते शंभूराजे महिन्याभराच्या अंतरातच दिलेरखानाला जाऊन मिळाले. २२ जानेवारी १६८२ रोजी रामदास स्वामींचे निधन झाले. ६ जून १७०० रोजी फ़तेउल्लाखानच्या नेतृत्वा खाली मुघलांनी गड ताब्यात घेतला आणि गडाचे नामकरण केले "नौरसतारा". पुढे १७०९ मध्ये मराठ्यांनी किल्ला काबीज केला. अनुक्रमे १८१८ मध्ये गड इंग्रजांच्या हाती गेला. पायऱ्या चढून वर जाताना गडाचा मुख्य दरवाजा लागतो त्याला छत्रपती शिवाजी महाराजद्वार असे म्हणतात दरवाजा ओलांडून आत शिरल्यावर गडाचा पूर्वाभिमुखी अजून एका दाराला सामोरे जावे लागते त्याला समर्थद्वार म्हणतात. प्रथेप्रमाणे गडाची दर रात्री नऊ ते सकाळी पाच या काळात बंद करण्यात येतात. गडावर राहायची, जेवणाची, पाण्याची उत्तम सोय मठात होते.
भक्कम तटबंदीतील दरवाजे सूर्य नारायणाला देखील रोखायला तत्पर आहेत.
पाण्याची कमतरता बाराही महिने भासणार नाही

बुरुजावर भगवा येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सलामी देत आहे
किल्ल्याची ऊंची:-        3350 फुट                     किल्ल्याचा प्रकार:-                   गिरीदुर्ग
डोंगररांग:-                    शंभूमहादेव,सातारा          श्रेणी:-                                      साधारण
जिल्हा:-                       सातारा                         गाव:-                                       परळी
पाण्याची सोय:-            आहे.                           जाण्यासाठी लागणारा वेळ:-       २० मिनिटे
राहाण्याची सोय:-          होते                             जेवणाची सोय:-                        आहे.

भूषणगड ते सज्जनगड: -
पुन्हा मुख्य रस्त्याला डावीकडे वळावे पुढे औंध - रहिमतपूर - सातारा - सज्जनगड हा साधारण ६८ किलोमीटरचा पल्ला आहे.

गडावरून खाली आलो बॅग बाईकला बांधून "अजिंक्यतारा" च्या दिशेने निघालो. मुख्य चौकात येउन आधी न्याहारीसाठी थांबलो.  एक प्लेट इडली-सांबर आणि शिरा-उपमा त्यावर एक फक्कड चहा, बॉडीची खुराक फुल करून गडावर आलो. पार दारा पर्यंत गाडी जायला रस्ता आहे. गाडी पार्क केली आणि डोक्यावरचे हॅल्मेट काढले समोरच एक काका उभे होते त्यांनी घातलेल्या टी-शर्ट वर सह्याद्रीचे शिलेदार असे लिहले होते. प्रथम दर्शनी ट्रेकला आले असे वाटत होते. पण नंतर समजले कि त्यांच्या बरोबर अजून मंडळी आहेत जे सगळे गडाच्या स्वच्छता मोहिमेवर आले होते. आता जरी मी इतरत्र कचरा करत फिरत नसलो तरी ह्यांच्या उपक्रमात स्वतःचा हातभार लावूच शकत होतो. त्यांना विचारणा केली तर म्हणाले "अरे वाहः असे करणारे तर हवेच असतात आम्हाला. तुमचे स्वागतच आहे." त्यांच्यातले काही जण आणि मी दारा समोरील तटबंदी वरून खाली उतरलो. लोक इतकी निगरगट्ट का असतात हेच समजत नाही. म्हणजे घरात कचरा नको म्हणून घरातला कचरा बाहेर फेकायचा काय अर्थ आहे का ह्याला!! प्लास्टिक, जेवणाच्या प्लेट्स, पाण्याच्या बाटल्या अजून काय काय जमा केले. गोण्या कमी पडत होत्या म्हणून अजून आणायला ते कोणाला तरी सांगत होते, तेवढ्यात एकाला एक प्लास्टिकचे मोठाले पोते मिळाले त्याने उघडून पहिले तर त्यात अजून बरीच रिकामी पोती होती खजाना मिळाल्याच्या आनंदात तो ओरडला. त्याच्या चेहऱ्यावरचा हर्ष पाहण्या जोगा होता. "काय अवलिये भेटतात एक एक, निस्वार्थपणे दुसऱ्यानीं केलेला कचरा उचलायचा आणि आनंद तो कशात शोधायचा तर रिकाम्या पिशव्या मिळाल्या कचरा भरायला म्हणून." हीच माझ्या भटकंतीची भेट असते नेहमी. कहर तर हा होता कि दारूच्या बाटल्या चांगल्या गोणी भरून मिळाल्या. त्यांच्या बरोबर खाली २ गोणी भरून कचरा जमा केला आणि वर आलो त्यांच्यातले काही जण अजून खालच्या बाजूला उतरले. मी विचार केला गडाचा फेर फटका मारताना आतील कचरा जमा करावा म्हणजे गड पाहून देखील होईल आणि उपक्रमात मदत देखील म्हणून आता प्रवेश केला.
अजिंक्यतारा: -
मुख्य प्रवेशद्वार
राजगड, रायगड, जिंजी आणि त्यानंतर मराठ्यांची हि चौथी राजधानी असलेला "अजिंक्यतारा" बामणोली रांगेत सातारा शहराच्या मधोमध उभा आहे. ११९० मध्ये दुसरा राजा भोज ह्याने ह्या किल्ल्याचे बांधकाम केले त्या नंतर हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि पुढे आदिलशहाकडे गेला. गडाला युद्धाची पार्श्वभूमी आहे. तसेच १५७० मध्ये आदिलशाहची पत्नी चांदबीबी हिला गडावर कैद करण्यात आले होते. तसेच १६०० च्या दशकात बजाजी निंबाळकरांना देखील येथेच कैद करण्यात आले होते. (बजाजी म्हणजे शिवरायांचे व्याही, बाजाजींचा मुलगा महादजी आणि महाराजांची कन्या सखुबाई ह्यांचा विवाह १६५५ रोजी संपन्न झाला होता.) २७ जुलै १६७३ रोजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. ह्या गडावर महाराज अंगी ज्वर आल्याने तब्बल दोन महिने मुक्कामास होते. १६८२ मध्ये औरंग्या महाराष्ट्रावर चालून आला. त्याने १६९९ साली गडाला वेध घातला तेव्हा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. तब्बल साडेचार महिने मराठ्यांनी गडाच्या साथीने झुंज दिली पण १३ एप्रिल १७०० मोघलांनी सुरुंग लावण्यास दोन भुयारे खणली आणि सुरुंगास बत्ती देण्यात यशस्वी झाले स्फोट होताच मंगळाईचा बुरुज ढासळला ह्यात बुरुजावारचे मराठे दगावले. प्रयागजी देखी त्यावेळी तिथेच होते पण त्यांना जास्त इजा झाली नाही तेवढ्यात दुसरा स्फोट झाला आणि बुरुजाचा मोठा भाग खाली कोसळला मात्र ह्यात मुघल सैन्यच सापडले तब्बल दीड हजाराच्या आसपास. परंतु २१ एप्रिल रोज गडावरची अपुरी रसद आणि दारुगोळा ह्या मुळे सुभानजी "आझमतारा" वर मोघली निशाण फडकले. पुढे क्रमशः हा गड ताराराणी नंतर पुन्हा मुघलांकडे त्यांच्या कडून शाहूने फितवून किल्ला बळकावला आणि स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. त्यानंतर पेशव्यांकडे गड होता पण दुसऱ्या शाहूंच्या निधन नंतर १८१८ मध्ये इंग्रजांनी गडाचा ताबा मिळवला. गड तसा प्रशस्त आहे पण गडावर ताराबाईंचा ढासाळलेला राजवाडा, प्रसारभारती केंद्र आणि त्याचे टॉवर्स आहेत बुरुज आणि तटबंदी मात्र भक्कम आहे. प्रवेशदाराचे दोन्ही बुरुज अजून देखील उत्तम स्थितीत आहे गडाचा दरवाजा सतत बंदच असतो आत जाण्यास एक छोटे उपद्वार बनवले आहे. आतल्या मंगळाई देवीच्या मंदिरा समोरच मंगळाई बुरुज देखील पहावयास मिळतो. देवन सुद्धा बंदिस्थ करून ठेवले जाते कारण माणूस स्वतःच्या फायद्या साठी त्याला देखील सोडायचा नाही. हनुमानाचे मंदिर बंदच होते. पाणी कुठे उपलब्ध नाही. 
किल्ल्याची ऊंची:-        950                              किल्ल्याचा प्रकार:-                   गिरीदुर्ग
डोंगररांग:-                    बामणोली, सातारा            श्रेणी:-                                      साधारण
जिल्हा:-                       सातारा                           गाव:-                                       सातारा
पाण्याची सोय:-            नाही                              जाण्यासाठी लागणारा वेळ:-      वरपर्यंत गाडी जाते
राहाण्याची सोय:-         हनुमानाच्यामंदिरात           जेवणाची सोय:-                        नाही
अजिंक्यतारा ते मुंबई: -
गडावरून खाली मुख्य रस्ताला उजव्या हातास वळावे २ किलोमीटर वर महामार्ग लागतो तिकडून डाव्या हाताला सरळ पुणे - खोपोली - मुंबई (दादर) हा सरळ रस्ता आहे. साधारण २५८ किलोमीटरचे हे अंतर आहे. 
साताऱ्याचे कंदी पेढे घेतले आता कुठेच थांबायचे नाही डायरेक्ट पुणे असे ठरवून महामार्गाला लागलो. सातारा हायवे वरून बराच पुढे आलो आणि पेट्रोलचा काटा टुकटुक करू लागला म्हंटले आता लोचा नाही झाला पाहिजे. पण पेट्रोल पंप दिसेचना! असे करता करता ३० कि.मी. तरी आलो असेन आणि उजव्या हाताला एक पेट्रोल पंप दिसला पण त्याला छेद रस्ता नव्हता म्हणून थोडे पुढून फिरून आलो पेट्रोल भरले आणि बाजूच्या हॉटेल मधून एक पाण्याची बाटली घेतली. पुन्हा गाडी भर धाव पळवायला सुरवात केली. बराच पल्ला गाठला असेल आणि समोर मोठा बोर्ड दिसला सातारा २ किमी. भुवया उंचावल्या, बोर्ड मागे टाकत पुढे आलो तसा अजून एक बोर्ड दिसला कोल्हापूर १८९ कि.मी. मग मात्र गाडी थांबवली. मागून एक गाडी आली त्यांना थांबवले आणि विचारले त्या वर ते म्हणाले “राव इकडे कुठे त्या रस्त्यावरून जा”!!! प्रश्न चिन्ह तर होते मी चुकलो तरी कुठे परत कसा आलो साताऱ्याला? काहीच समजत नव्हते. योग्य रस्त्याला गाडी घेतली आणि नव्याने सुरवात केली मनात एकाच विचार होता चुकलो कुठे? मग अचानक ट्यूब पेटली पेट्रोलपंप ……………… आईशपथ ……. तिकडेमीयु-टर्न मारला होता आणि पाणी घेऊन मी माघारी न फिरता गाडी सरळ दामटवली होती. पण आता विचार करून काही फायदा नव्हता त्यामुळे पुन्हा मार्गावर लक्ष केंद्रित केले. पुण्यात वाकडच्या ब्रिजखाली गाडी थांबवली आणि मुकेशला फोन केला म्हंटले भेटायला ये! तसा तो हि लगेच आला त्याची धावती भेट संपवून निघालो. थेट गाडी लोणावळ्याला थांबवली आणि अनिकेतला फोन केला कसा येऊ तुझ्या घरी त्याने सांगितलेल्या मार्गा ने त्याच्या घरजवळ आलो पण ह्यात वेळेचे नियोजन जरा मागे पुढे झाले होते त्यामुळे ४.२८ ची खोपोली सी.एस.टी लोकल गेली होती. पुढची ६ वाजता होती मग अनिकेतच्या घरी काही वेळ काढला त्यानेच मग खोपोलीला सोडले. आता सेन्ट्रल रेल्वे आपल्या नावाला जागणार नाही तर कसे चालेल. सहा वाजताची गाडी तब्बल ४५ मिनिटे उशिराने आली, उडी मारून खिडकीतली जागा पटकावली खरी पण गाडी निघालीच ७.०५ ला शांत बसून होतो दुसरा काहीच पर्याय नव्हता. घरी साधारण ११.३० च्यासुमारास पोहोचलो. जेवण केले आणि शांत पणे झोपी गेलो आता उद्या पासून पुन्हा ऑफिसचे झेंगट झेलायचे होतेच. 

बाकी हा ट्रेक मना सारखा झाला खरी. वहीत लिहण्या सारखे आणि उतारवयात मनाला सुखावणारे बरेच अनुभव आले. कोणी प्रेमाने दोन घास भारावले, तर कोणी स्वतःच्या वाटणीचा चहा देऊ केला. अंधाऱ्या गुहेत कानी आलेला पाण्याच्या थेंबांचा आवाज आणि मनात झालेलं धस्स…… कायम लक्षात राहील. भर दुपारी शेतातली झपकी, रणरणत्या उन्हात शोधा शोध करताना नजरेस पडलेल्या पायऱ्या, पहाटेचारच्या सुमारास भरधावगाडीवर असताना अचानक रस्त्यात दिसू लागलेली माणसे. आता रात्रीचे दोन वाजले आहेत चला झोपायला हवे. ह्याट्रेकची सांगता इथेच करतो पुन्हा नव्या ने एखादी मोहीम केली कि भेटूयाचं.........


  • गडांवर आणि इतरत्र हि स्वच्छता राखावी
  •  ट्रेकला जाताना सोबत विजेरी, छोटासा चाकू, मुबलक पाणी, खाण्यासाठी काही पदार्थ ठेवावेत.
  • अतिहौशीपणा करू नये.
  • मी योजिलेला मार्ग माझ्या साठी सोयीस्कर होता कृपया कोणीही जाण्या पूर्वी योग्य माहिती घ्यावी
  • कल्याणगडावर मधमाश्यान पासून सावधान


 कॅमेऱ्यातील मेमरी कार्ड खराब झाल्यमुळे मोबईल मध्ये काढलेल्या फोटोनवरच समाधान मानावे लागते आहे. 


उर्वरित भाग लवकरच