गुरुवार, २१ मे, २०१५

सातारा रेंज भाग २



कोणी तरी म्हणाले होते “तेरा सब उलटा हि रहेता है” लोक पौर्णिमेला ट्रेक करतात आणि मी अमावस्येला ….. लिंगाणा, तैलबैला, अजून देखील आहेत आठवत नाहीत, आज देखील अमावस्या आहेच कि! म्हणजे काय तर अमावस्या आणि ट्रेक समीकरण जुळून येते आहे. ऑफिसची काम संपवून निघे पर्यंत ८.४८ ची खोपोली लोकल गेली. आता शेवटची १०ची ती मला खोपोलीला १२.३० ला पोहोचवणार होती. एवढ्या रात्री अनिकेतला यावे लागले असते म्हणून त्याला फोन करून सांगितले त्याच्या एका होकरावर माझा ट्रेक तग धरून होता. प्रणवच्या आईला बरे नसल्यामुळे त्याला येणे शक्य नव्हते. कल्पेश नाही, कुंदन, अनिकेतला वेळ नव्हता. प्रशु ने पुढचा विकएंड बुक करून ठेवला होता त्यामुळे तोहि नाही. (सोलो ट्रेकला जा असे मी ही कोणालाच सुचवणार नाही) पण गेल्या ५ महिन्याचा ट्रेकचा उपवास ऑफिसची डोकेदुखी ह्या सगळ्याला नजरेत घेता एवढा केलाला प्लान रद्द करणे नाही जमले. ऑफिसमधून निघालो तेव्हा ९.२७ झाले होते आता जेवायला देखील वेळ नव्हता म्हणून अक्षयला म्हंटले मला सी.एस.टी. ला सोड. त्याने सोडल्यावर तिकीट घेऊन आधी खायला शोधले. ऑम्लेटपाव खाल्ला आणि ट्रेनमध्ये मस्त ताणून दिली. कल्याण आले तेव्हा जाग आली १२.३० ला पोहोचणारी गाडी साधारण १ च्या थोडे आधी खोपोली स्टेशनला लागली. अनिकेतला फोन केला तसा तो ही दोनच मिनिटात आला. लोणावळा हायवेचा रस्ता त्याच्या कडून समजून घेतला आणि निघालो. खोपोलीमार्गे लोणावळ्याला आलो आणि छान थंडी पडली होती, म्हणून एके ठिकाणी गाडी थांबवून चहा घेतला आणि अंगात स्वेटर चढवले. आता मात्र मध्ये न थांबता निघालो सातारा येण्या आधी भुईंजला गाडी थांबवली ट्रेकच्या प्लान प्रमाणे आधी कल्याणगड - वर्धनगड - महिमानगड - भूषणगड - सज्जनगड – अजिंक्यतारा असा गडांचा क्रम आखला होता. गावांच्या नावांप्रमाणे म्हणायचे तर कोरेगाव - वडूज - औंध – रहिमतपूर असा सगळा पल्ला फिरत सातारा. पहाटेचे ४.३० झाले होते भुईंज फाट्या जवळचे चहाचे दुकान उघडे दिसले म्हणून थांबलो पत्ता विचारला तर कल्याणगड कोणालाच माहित नव्हता. गुगलवर रस्ता चेक केला तर काही अंतरावर एक फाटा दिसत होता मग चहा घेतला आणि पुढे निघालो साखर कारखान्याचा मोठाला बोर्ड दिसला तिथे दोघे जण उभे होते त्यांना कल्याणगड विचारले तर आजोबा चटकन म्हणाले "नांदगिरीचा किल्ला होय" मनाला हायसे वाटले कि कोणाला तरी माहित आहे म्हणजे आता रस्ता सापडणार. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने गाडी पुढे घेतली निर्जन्य असलेल्या मोकळ्या रस्त्यावर वाऱ्यावर बतावणी करत गाडीची चाकं फिरत होती. गाडीच्या हेडलाईट मध्ये रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे आता भयाण दिसत होती. अंगाला भिनणारा गारगार वारा, समोर दिसणाऱ्या वाडाच्या झाडाच्या पारंब्या, अन गाडीच्या चाकांचा होणारा लयबद्ध आवाज पुढे काय अश्या स्वतःच्या विचारत होतो आणि अचानक थोडे दूरवर कोणी तरी चालताना दिसले जवळजवळ रस्त्याच्या मधो-मधच ती सावली चालत होती, गाडीच्या ब्रेक्सवर नकळतच पायाचा भार पडला तसा गाडीचा वेग मंदावला. शंका अशी कि ह्यावेळी आजूबाजूला कोणतेच गाव नसताना असे रस्त्यात कोणी का चालेल. होर्न वाजवला तर ती सावली बाजूला झाली म्हणजे माणूसच असावा पुन्हा वेग वाढवला आणि पुढे आलो तेव्हा समजले गावातील कोणी बाई होती तोंडा वर “भ” ची बाराखडी उमटून गेलीच. नंतर जस-जसा पुढे आलो बरेच जण रस्त्यावर चालताना दिसले. आता एक रेल्वे फाटक पार करून मी वडूथला आलो होतो (वडूज आणि वडूथ दोन्ही वेगळेवेगळे आहेत) तिथून डाव्या हाताला रस्ता सरळ कल्याणगडाकडे नेतो. कल्याणगड धाबा एवढ्या पहाटे बंदच होता थोडेसेच पुढे एक डोंगरात कोरलेली वाट गडाच्या दिशेने जाते. गाडी कच्च्या रस्त्यावरून वरवर जाऊ लागली आणि मी थेट गगनचुंबी पवन चक्कीजवळ येउन थांबलो त्या पवनचक्कीचा होणारा आवाज अर्धवट पहाटेच्या शांततेला चिरून जात होता. इकडे-तिकडे पहिले रस्ता चुकलो हे नक्की करून पुन्हा मागे आलो तसा मुख्य रस्त्याला लागून एक वाटवर च्या दिशेला जात होती पण तिकडे गाडी नेणे थोडे कठीण होते म्हणून गाडी बाजूला पार्क केली आणि पायीच निघालो.

उत्तरमुखी प्रवेशद्वार
पक्षांच्या किलबिलाट कानी येऊ लागला तसा, उत्तरमुखी प्रवेशद्वारावर पाडव्याच्या मंगलमयी सूर्य किरणांचा अभिषेक होऊ पाहत होता. उगाचच बांधलेल्या चक्राकार दरवाज्या ने माझी वाट अडवली खांद्यावरच्या बॅग मुळे मधेच अडकलो तसा तुटलेल्या दारा च्या कर्णकर्कश्य आवाजाने सगळी शांताता भंग केली. त्यातून सुटून कसा बसा आता गेलो आणि ह्या शिल्पकाराच्या कौशल्या पुढे नतमस्तक झालो. काय सुंदर कमान बनवली आहे.  घुमवदार आकाराची एकमेकांवर रचलेली आरास काय सुरेख मेळ घालून आणला आहे आज इतक्या वर्षांनीसुद्धा जशीच्या तशी आहे.  
शिल्पकाराच्या कौशल्याचा अप्रतिम नमुना
दारातून आत आलो तश्या दोन वाटा दिसल्या एक उजवीकडे एक पत्र्याच्या शेड मधून बुरुजाला लागून पार खाली उतरत होती कल्याणगडावर आलो आणि गुहेत नाही गेलो मग काय पाहिलं!!!! 
गुहेकडे उतरत जाणाऱ्या पायऱ्या
कोणाचाच मागमूस लागत नव्हता, मग बॅग खाली ठेवली आणि हळू हळू पायऱ्या उतरू लागलो, समोरच गुहेच्या तोंडावरती मधमाश्यांची मोठाली पोळी दिसली. दोन पोळ्यातले मधमाश्यांचे श्रम कोणा मानवाने लंपास केले होते आणि त्याचा निस्वार्थी पणा म्हणू कि स्वार्थी पणा अर्धवट पोळे तिथेच होते जेणे करून तिथेच त्यांनी आपल्या घराचे नक्षीदार काम पुन्हा सुरु करावे.  
मधमाश्यांचे पोळे
गुहेचे प्रवेशद्वार
गुहेत प्रवेश केल्यावर
गुहेत प्रवेश करायला जवळजवळ बसूनच जावे लागते डाव्या बाजूला एक वाट आतील बाजूस जाते. वाटेच्या दोन्ही बाजूस पाण्याचे टाके आहेत म्हणून दुतर्फा रेलिंग लावल्या आहेत. मी विजेरीच्या प्रकाश झोतात हळू हळू पुढे सरकलो एका विशिष्ठ ठिकाणी आल्यावर पूर्ण पणे उभा राहीन ह्याची खात्री केली आणि उभा राहिलो, गुहेत मंदिर असल्याने शूज वरतीच काढून ठेवले होते अनवाणी पायांना झालेल्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने अंगात शिरशिरी भरली, डोक्याला लावलेली विजेरी माझ्या पुढ्यातला अंधार तर दूर करत होती पण गुहेतील ती थंड शांतात नसानसात भिनत होती, मी सोडलेल्या श्वास बरोबर धुक्यात बनणारी वलय आक्राळ-विक्राळ आकार घेत माझ्या डोळयांन देखत नाचत होती. संपूर्ण गुहेत एक नजर फिरवली मी एकटाच असल्याची खात्री करून घेतली आणि पुढे सरकलो दोन्ही बाजूला पाण्याची टाकी आहेत त्यात मोठाले विचित्र आकाराचे खडक जसेच्या तसे आहेत. अगदी आतल्या बाजूला मंदिर बनवलेले आहे फोटो काढायचे म्हणून खाली बसून कॅमेरा सेट करत होतो इतक्यात पाण्यात एकाच वेळी चार ते पाच ओघळ पडले पण त्याच्यातले अंतर सेकंदाच्या अगदी बारीक हिश्या एवढे होते आधीच मी निर्जन्य अश्या ठिकाणी एकटाच होतो गुहेतल्या भयाण शांततेत एकाच लाईन मध्ये पाण्याच्या झालेल्या टपप्प्प्प्प आवाजाने मला गरकन गिरकी घेऊन मागे वळायला भाग पडले. मनातल्या इतर शंका मनातच दाबल्या आणि पटकन दोन फोटो काढून बाहेरचा मार्ग धरला. गुहेच्या आत सूर्यकिरणे येत नाहीत पण प्रवेशद्वारा वरच्या त्या तेजोमय अस्तित्वाला पाहून मनाला हायसेच वाटले. बाहेर आलो आणि मग पुन्हा आत वळून पहिले आता इतक्या वेळ ओठांवर नसलेले स्मित परत आले होते समोरच्या खडकावर मंदिराकडे असे लिहले होते. उभ्या आयुष्यात तो पाण्याचा आवाज मी विसरणार नाही. आता बाकीचा गड पाहून लवकरात लवकर पुढच्या गडाच्या मोहिमेवर निघाचे होते. प्रत्येक गडावर मारुतीरायांचे दर्शन नक्कीच घडते, बलशाली प्रतीकच ते, डाव्या बाजूला वळालो (मूर्ख) सरकारच्या दुर्ग संवर्धन ह्या उपक्रम अंतर्गत बनवलेल्या सिमेंटच्या रस्त्याने पुढे काही अंतरावर असणाऱ्या मशीदीच्या उरलेसुरलेल्या अवशेषांच्या दिशेने चालताना झाडाच्या मधून अचानक कोणी तरी डोकावताना दिसले, 
पिर आणि साधूबाबा
आता अजून किती धक्के पचवायचे होते काय माहित थोडा अजून पुढे आलो आणि पाहिले एक साधू बाबा आपल्याच्य तोऱ्यात होते. माझे येणे त्यांना तितकेसे आवडले नव्हते हे निश्चित. गडाचे उरलेसुरलेले अवशेष कॅमेऱ्यात बंदिस्त करून परतीची वाट धरली.
गुहेच्या वरच्या बाजूची तटबंदी
हनुमानाचे मंदिर 
जय श्रीराम
 चुन्याच्या घाण्याचा दगड (तो साधूबाबा कपडे धुवतो आहे ह्यावर)
कल्याणस्वामींची समाधी
पाण्याचे तळे
दगडात कोरलेले तलवारीचे चित्र
कल्याणगड: -

नंदगीरीचा हा किल्ला शिलाहार दुसरा राजा भोज ह्याने इ.स ११७८ ते इ.स१२०९ या कालावधीत बांधला असावा असे सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार समजते. महाराजांनी १६७३ मध्ये सातारा मोहिमेत गड ताब्यात घेतला असावा. पुढे पेशव्यांकडे आणि ततपश्चात १८१८ मध्ये जनरल प्रिझलरने हा किल्ला ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नेला. गडावरचे सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे गुहा जवळजवळ ३० मीटर, रूंदी ४ मीटर व ३ मीटर असणाऱ्या भुयारात १२ महिने पाणी असते. वाटेच्या आजुबाजूला लोखंडी कथडे आहेत. भुयाराच्या शेवटी नवव्या शतकात घडवलेली पाश्वर्नाथांची मूर्ती, पद्मावती देवीची मूर्ती आणि श्री दत्तात्रेयाची मूर्ती अशा ३ मूर्त्या आहेत. 


दत्तात्र्यांची मूर्ती
पार्श्वनाथांची मूर्ती
कल्याणगडा वरून साधारण दक्षिणेला जरंडा, अजिंक्यतारा, यवतेश्वर, चंदनवंदन, मोर्‍या, वैराटगड ही ठिकाणे दिसतात.

किल्ल्याची ऊंची:-        ३५००                            किल्ल्याचा प्रकार:-                   गिरीदुर्ग
डोंगररांग:-                    सातारा                            श्रेणी:-                                      मध्यम
जिल्हा:-                       सातारा                            गाव:-                                       वर्धनगड
पाण्याची सोय:-            आहे.                              जाण्यासाठी लागणारा वेळ:-       ३० मिनिटे
राहाण्याची सोय:-         तितकीशी सोयीस्कर नाही.    जेवणाची सोय:-                        स्वतः करावी.

मुंबई ते कल्याणगड: - मुंबई वरून साताऱ्या अगोदर लागणाऱ्या भुईंज गावा जवळच्या साखर कारखान्याच्या रस्त्यावरून वडूथला येउन डाव्या हाताकडील रस्ता सरळ किल्याकडेच जातो. कल्याणगड ढाब्याच्या बाजूने एक कच्चा रस्ता लागतो, त्या रस्त्याने वर जाताना मधेच दोन वाटा फुटतात एक रस्ता अजून वर जातो. त्यानेच गडावर जाता येते

 गाडी उभी केलेल्या ठिकाणी आलो तेव्हा सकाळचे नऊ वाजत आले होते, भूक तर तडकून लागली होती. आता वर्धनगडाकडे मोर्चा वळवला आणि रस्तात काही खायला मिळेल ह्याच अर्थाने. कोरगावला आलो तर सगळीकडे गुढी उभारण्याची लगबग चालली होती. मुख्य रस्त्यावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वर्धनगड आहे इतकी माहिती होती. पोटात कावळे "मिसळ मिसळ" असे जोरात ओरडत होते, म्हणून तंबू वजा हॉटेलमध्ये थांबलो, पोराने विचारले "काय देऊ साहेब?" पुन्हा कावळ्यांचा आवाज आला "मिसळ मिसळ" मग त्याला सुद्धा तेच आणायला सांगितले. चांगले चार पाव आणि झणझणीत मिसळ झाली तसा गाडीच्या चाकांना पुन्हा वेग आला. वर्धनगड गावाच्या वळणावरील चौथऱ्यावर दोन छोटे खानी तोफा स्वागतला आहेत.
गावात शिरताना स्वागताला असणाऱ्या तोफा

गावातल्या काकांना गडावर जाणारी वाट विचारली तर म्हणाले "गाडी इकडे लावा, आणि इथूनच वर जा" मग मी तसेच केले गाडी त्यांच्याच घरा समोर पार्क केली तसे काका म्हणाले "जर काही सामान ठेवायचे असेल तर ठेवा, उगाच कशाला वजन उचलून नेता." नकळत मिळालेला पाहुणचार मनाला सुखावूनच जातो, मी पण लगेचच बॅग त्यांच्या हातात दिली. अधुनिक पद्धतीने बांधलेल्या पायऱ्या चढू लागलो मधेच एका झाडाखाली शेंदूर फाशीत देव विराजमान आहेत. 
शेंदूर फाशीत देव
गडावरच्या मार्गात तशी झाडे कमीच आहेत त्यात मार्च महिना कोणी तरी खाली उतरताना दिसले दोघे मध्यम वयाचे होते, काकी जराश्या दमल्या सारख्याच वाटत होत्या म्हणून माझ्या जवळ असलेली पाण्याची बाटली पुढे केली तर काका म्हणणे "पोरा आहे आमच्याकडे पाणी, तू ठेव तुला लागेल ऊन खूपच आहे." मग कुठून आला वगेरे चौकशी आणि त्यांना माझी समाधान कारक उत्तर मिळाल्या नंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. १५ मिनीटाच गोमुखी प्रवेशद्वारा पाशी आलो. 
प्रवेशद्वाराची सुरवात
दारा जवळूनच तटबंदी चालू होते ती संपूर्ण गडाला वळसा मारून पूर्ण होते अजूनही शाबूत अवस्थेत असणारी हि तटबंदी चालत चालत फिरताना बांधलेले १४ बुरुज पाहायला मिळाले. 


बुरुज आणि तटबंदी
पुन्हा दारापाशी आलो होतो आता गडाच्या मुख्य रस्त्यावरून वर जाताना मारुती रायाचे मंदिर आणि पुढे महादेव विराजमान असलेले दिसतात. 
मंदिर
उध्वस्त शिवलिंग
तलावाच्या बाजूने वरच्या बाजूला कच्च्या पायऱ्यांची वाट आहे त्याने वर आल्यावर गडाच्या अधिष्ठात्री वर्धनीमातेचे मंदिर लागले, 
कच्च्या पायऱ्यांची वाट
अधिष्ठात्री वर्धनीमातेचे मंदिर
पुजारी बुआ गुडी उभाराच्या तयारीत होते. देवी नवसाला पावते असे म्हणतात मी काही आत गेलो नाही. मंदिराच्या मागे दगडाचा आकर्षक असा दीपस्तंभ आहे. 


नेहमीच्या दीपमाळे पेक्षा वेगळा 
गड फिरून झालाच होता मग खाली उतरायला लागलो आता उन्हाचा ताप चांगलाच वाढला होता. गावात परत काकांच्या घराजवळ आलो बॅग मागितली तर त्यांनी घरात येण्यास आमंत्रण दिले पाणी दिले आणि म्हणाले जेवूनजा थोड आता मात्र मला थोडे अवघडल्या सारखे झाले म्हंटले काका जेवण नको मला पुढचा प्रवास करायचा आहे. "पोर सणासुदी पाव्हणा म्हणून आलास आहे एवढ्या लांबवर दोन घास खाउन जा बरा वाटेल गरिबाला". मायेच्या विनवणी पुढे माझ्या नाकारानें तग नाही धरला, मटकीची उसळ, भाकरी, कांदा असे ताट पुढ्यात आले, पाडवा होता त्या दिवशी घरात गोड नाही बनणार!!!!!!! पुरणाची पोळी अह्ह्ह दिवसच सार्थकी लागला माझा. आता दिवसभर काही पोटाला खुराक लागणार नव्हता. नवीन वर्षाची सुरवात मोठ्यांच्या आशीर्वादाने व्हावी पण घरात नसल्याने आई बाबा समोर नव्हते मग आज माझे उदरभरण करणाऱ्या निंबाळकर काकांनांच नमस्कार करून महिमानगडाचा रस्ता धरला. 

वर्धनगड: -

१२ अक्टोबर ते ११ नव्हेंबर १६६१ महाराज वर्धनगडावर मुक्कामास होते. १७०१ मध्ये मुघलांनी पन्हाळा जिंकून आपले लक्ष्य साताऱ्याकडे वळवले. मोगल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला की ‘‘बादशहांनी खटावला छावणी करावी, म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील’’. औंरगजेबाने या योजनेला मंजुरी दिली. दि. ८ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभव झाला. नंतर ९ जून १७०१ रोजी वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखाना जवळ पाठवला. त्याने याला सांगितले की ‘‘किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे’’. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केली. खरतर फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळाकाढूपणा होता.मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फतेउल्लाखान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पाहात राहीला, पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकला सुध्दा नाही. फतेउल्लाखानाला मराठयांचा डाव लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला.त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले, पण यात अनेक मराठे मारले गेले. अनेकजण जखमी झाले. मोगलानी मराठ्यांच्या चाळीस लोंकाना कैद केले. मग मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाडया जाळून टाकल्या. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. दि. १९ जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी ‘मीर ए सामान’ या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य, चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू, सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून ‘सादिकगड’ असे ठेवले. वर्धनगड तीन वर्ष मोगलांच्या ताब्यात होता. सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्लेदार किशोरसिंगला कैद केले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोगलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. इ.स.१७०७ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. हा गड स्वतः महाराजांनी अफझलखानाच्या वधा नंतर बांधून घेतला.

किल्ल्याची ऊंची:-        १५००                   किल्ल्याचा प्रकार:-                   गिरीदुर्ग
डोंगररांग:-                    म्हसोबा, सातारा       श्रेणी:-                                      मध्यम
जिल्हा:-                       सातारा                    गाव:-                                       महिमानगड
पाण्याची सोय:-           आहे.                      जाण्यासाठी लागणारा वेळ:-       २० ते ३० मिनिटे
राहाण्याची सोय:-        नाही.                       जेवणाची सोय:-                        स्वतः करावी.

कल्याणगड ते वर्धनगड: - कल्याणगड वरून कोरेगावला यावे मुख्य रस्त्यावरून सातारा - पंढरपूर महामार्गावर वर्धनगड गाव लागते. 

व्यापारी मार्गाच्या रक्षणाकरिता बांधलेल्या ह्या गडाची पडझड झालीच आहे म्हणा पण तरीही लांबूनच आपले अस्तित्व दाखवतोच. 
गावाच्या वळणावरून वर्धनगड
गावात आलो, माझा एकूण अवतार पाहून लोकांच्या मनात चुकीच्या वाटेने आलेला कोणी तरी अशी जी काही समजूत होती ती माझ्या प्रश्नाने थोडी दूर झाली. "इथे गडावर कुठून जायचे?" मी विचारले. एक मुलगा म्हणाला "ह्या मंदिराच्या बाजूने वर जा पायवाट सापडेल." गाडी ठेवली आणि मोबाईल वाजला ऑफिस वाले काही मला सुखासुखी सुट्टी घालवून देणार नाहीतच. जवळजवळ तीस ते चाळीस मिनिटांनी फोन बंद झाला, समोर एक काकी बसल्या होत्या त्यांना पाण्यासाठी विचारले आणि ठेव्याला त्यांचा होकार मिळवून. पाण्याची बाटली कमरेला बांधली, मंदिराच्या बाजूच्या पायवाटेने वर चढू लागलो मुळात पायवाट हा प्रकार इकडे नाहीच आहे गुरांच्या चलण्यामुळे बरेच मार्ग बनले आहेत रखरखीत उन्हात समोरच पाहायला होत होते जर नजर वर घेतली कि डोळ्यांना त्रास होत होता, एकदा, दोनदा, तीनदा वेगळे वेगळे मार्ग आजमावून देखील वाट काही केल्या सापडत नव्हती जणू काही चकवाच लागला आहे. थोडा वेळ बसून पाण्याचे दोन घोट घेतले भिरभिरणारे डोके शांत केले आणि पुन्हा नव्याने सुरवात केली आता पायवाट सोडून स्वतःचा असा मार्ग बनवत वरच्या दिशेने जिकडे भगवा दिसत होता त्या दिशेने चढू लागलो, संपूर्ण मी घामाने डबडबलो होतो आणि समोर दगडानमध्ये तुटलेल्या पायऱ्यांचे अवशेष दिसले त्या क्षणी जो आनंद अनुभवला आहे ना तो काही औरच आहे. 
तुटलेल्या पायऱ्या
पायांचा वेग वाढला आणि झपाझप पावले टाकत मी गडाच्या दारापाशी येऊनच थांबलो. पुन्हा पाण्याचे दोन घोट घेतले. एवढ्याश्या दिसणाऱ्या ह्या गाडाने माझा चांगलाच घाम गाळला होता. आत शिरताना डाव्या आणि उजव्या बाजूला दगडात हत्तीचे मुख कोरले आहेत.  
गजमुखाचे शिल्प
कमानीचा एक मोठाला दगड जवळच पडलेला दिसतो. तटबंदीच्या बुरुजावर भगवा फडकत होता. थोडे पुढे आलो तर मंदिर लागले एका गोष्टीचे मला नेहमी आश्चर्य वाटते देवाला पण कडीकुलुपात का ठेवता? नक्की कोणाला कोणाची धास्ती आहे? कदाचित देवच आजकाल मनुष्याला घाबरत असावा. दगडांनमध्ये देव कि देवाचा दगड _/\_.  
मराठ्यांचे मनाचे चिन्ह घेऊन उभा असणारा बुरुज 
कैदेतला मारुती
पाण्याचा जलाशय
मोठाला पाण्याचा जलाशय आहे पण स्वच्छता नसल्याने शेवाळे जमले आहे. ईशान्येला असलेल्या गडाच्या विस्तारित भागाकडे जाताना एक चोरदरवाजा लागतो. 
ईशान्येकडील बुरुज आणि त्यातला चोर दरवाजा
वातावरणाचा ताप खूपच वाढला होता तसा गड देखील पाहून झालाच होता म्हणून खाली उतरू लागलो. समान पुन्हा गाडीवर लादले आणि भूषणगडाच्या शोधत निघालो. 

महिमानगड: -    

मुख्य डोंगर रांगेपासून वेगळा असला तरी ह्यावरील कातळानमुळे लक्ष वेधी आहे. आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर - पंढरपूर - सातारा - वाई - महाड असा व्यापारी मार्ग होता. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले, त्यापैकीच एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते.

किल्ल्याची ऊंची:-        ३२००              किल्ल्याचा प्रकार:-                   गिरीदुर्ग
डोंगररांग:-                    सातारा              श्रेणी:-                                      मध्यम
जिल्हा:-                       सातारा              गाव:-                                       महिमानगड
पाण्याची सोय:-            आहे.                जाण्यासाठी लागणारा वेळ:-       २० ते ३० मिनिटे
राहाण्याची सोय:-          नाही.                जेवणाची सोय:-                        स्वतः करावी.

वर्धनगड ते महिमानगड: - सातारा पंढरपूर मार्गावर स्थित आहे.

अवघ्या ९८ किलोमीटरवर विठूराया विराजमान होता मनात आणले असते तर दोनच तासात पोहोचलो असतो पण योग वारीचाच हवा म्हणून तिकडे नाही जाण्याचेच निश्चित केले.