बुधवार, २२ एप्रिल, २०१५

रक्तदान


नोंदणी का करावी?

             ह्याचा अनुभव मला काही दिवसांन पूर्वी आला. नोंदणी केली की इवेन्टसचे अपडेट पाठवणे हा कोणत्याही ग्रुपचा पहिला भाग असणारच त्याला मार्केटिंग म्हणता यॆइल. पण आपण दिलेल्या माहिती मधील रक्तगटाची नोंद फार महत्वाची ठरते. ऑफिस मध्ये असताना अचानक फोन खणखणला समोरून विचारणा झाली “आप प्रितम बोल रहे है क्या?” मी हो म्हणताच, पुन्हा प्रश्न “आप का ब्लड ग्रुप B- है क्या?” माझा होकार मिळताचं पुन्हा काळजीने केलेला प्रश्न! क्या आप ब्लड डोनेट करनें आ सकते है? ऑफिस मध्ये होतो म्हणून कुठे आणि कधी यायचं विचारलं. पलीकडला काळजीचा सूर चिंतेत बदलला होता. त्यांनी लीलावती हॉस्पिटल सांगितले आणि जमल्यास आज यायला जमेल का? असेही विचारले म्हणून विचारले, होकार देऊ कि नकार हे ऑफिस मध्ये असल्यावर समजत नाही, पण तोंडाने मनाचा होकार दिलाच होता. फोन ठेवला आणि मग लक्षात आले एच. आर. ला काय सांगू!!!!!!!!!!

            आय. टी. वाल्यांचे ते एक बरे असते आम्हाला काम खूप असते आणि त्यातले कोणाला काही समजत नाही. मग लगेचच एक काल्पनिक काम माझ्या लक्षात आले. बांद्राला आलो आणि तिकडून हॉस्पिटलच्या खाली उभे असताना त्यांना फोन केला. त्यांनी तिसऱ्या माळ्यावर या असे सांगितले. इकडे आल्यावर मला हॉस्पिटल पेक्षा हॉटेल मध्ये आल्याचा अनुभव जास्त आला. तिसऱ्या माळ्यावर हॉस्पिटलची ब्लड बँक आहे. मी त्यांना ओळखत नसल्याने पुन्हा फोन केला तर साधारण पस्तीस-चाळीशितील व्यक्ती समोर आली. आप प्रितम हो? मी हो म्हंटले. त्यांच्या चेहऱ्यावर माझे आभार कसे मानावेत ह्याचे भाव स्पष्ट दिसत होते. मी म्हंटले मला परत ऑफिसला जायचे आहे तर आपण जरा ……………… आम्ही फॉर्म भरायला आलो.

प्राथमिक नोंदणी आणि इतर गोष्टी झाल्या. सगळे आटोपून मुव्ही पाहायला आलो अशा थाटात एका अलिशान खुर्चीवर मला जवळजवळ झोपवलच होत आणि दिसायला सुंदर अशी मुलगी (सिस्टर म्हणणार नाही) दाभणनुमा सुई घेऊन टोचताना लागणारी कळ चेहऱ्यावर दिसू न देत मी शांत पडून राहिलो.

             पुढची प्रोसेस नेहमी प्रमाणेच झाली आणि मी लागलीच निघायची तयारी केली. रक्तदान ह्या आधी पण केले आहे. पण कोणी अनोळखी व्यक्तीने असे फोन करून नव्हते बोलावले. आता त्यांनी मला सांगितले कि त्यांचे वडील आजारी होते आणि त्यांना रक्ताची गरज होती. गरज, काळजी, आनंद, असे तिन्ही भाव एकदाच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले मला दिसले आणि माझ्या मनाला एका आत्मीयसुख मिळाल्याचा भास झाला.
  
            ह्या गोष्टीला तसे खूप दिवस झाले पण आज त्या व्यक्तीचा पुन्हा फोन आला होत हे सांगायला कि त्यांचे वडील आता घरी आले आहेत आणि त्यांची तब्येत देखील सुधारली आहे. आश्चर्य म्हणजे मला अजून देखील त्या व्यक्तीचे नाव नाही माहित. गरजपण नाही वाटली मला त्याची "माणुसकी" हे एकाच नाव ह्याला शोभेल असे आहे.



शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

सातारा रेंज .......... भाग - १


भर दुपारचा दीडचा सुमार महिमानगडावरून बाहेर मुख्य रस्त्याला आलो, उन्हाची झळाळी चांगलीच जाणवत होती. भूषणगडचा मार्ग विचारायला म्हणून उसाच्या गुऱ्हाळाजवळ गाडी थांबवली आणि चांगले ३ ग्लास गटकावले. पुन्हा गाडीची चाके पंढरपूर मार्गावर भरधाव धावायला लागली. कराड-वडूज मार्ग तसा चांगला आहे पण ओसाड प्रदेश, म्हणजे शेती होते पण रस्ताच्या दुतर्फा झाडे नाहीच. सुर्यदेवांनी स्पॉटलाईट माझ्यावर केंद्रित केला होताच. त्यात रात्र भराचा प्रवास आणि सकाळ पासून केलेले तीन ट्रेक त्या मुळे आता झोप आवरणे आणि बाईक चालवले कठीण झाले होते.  उंबर्डे गावावरून गुरसाळे कडे जाणाऱ्या मार्गावर होतो आणि डोळ्यांनी झपकी मारली तशी लागलीच गाडी थांबवली पुढे जाण्या आधी एक पॉवर न्याप गरजेचा होता. मागे पुढे पहिले थोडे दूरवर शेतात एक मोठाले झाड होते गाडी सरळ शेतात उतरवून झाडाखाली पार्क केली. शेताची नुकतीच कापणी करण्यात आली होती, त्यामुळे दूरवर नजर फिरवली तरी तळपणाऱ्या सुर्यकिरणांची झळ जाणवत होती. अश्यातही हे प्रचंड झाड आपले हात पसारून माझ्या सारख्या मुसाफिराला आपल्या गर्द सावलीच्या छायेत घेण्याचे काम चोख बजावत होते. झाडाखालचा पाला पाचोळा मऊ गालीचाच समजून, सोबत आणलेली चादर अंथरली, निळ्याक्षार आकाशाखाली शरीराचा भार धरणी मातेच्या स्वाधीन करत पहुडलो असताना मनात काही ओळी रचल्या गेल्या.   
 झाडाच्या शांत सावलीत, गार वाऱ्याची झुळूक,
ध्यानी मनी नसताना, येते कानावर शिळ
मुसाफिर मी तरुण मनाचा, तारुण्य वेचितो,
कुंचल्याच्या लेखणीहून, सामर्थ्य नजरेत,
भावनांच्या साखळीला, स्पंदनांचा साज,
विस्कटलेल्या विचारांना, आठवणींचा स्पर्श.
किती वेळ झोपलो माहित नाही पण खिशातला फोन खणखणला आणि जाग आली. मस्त तरतरीत वाटत होते, कुभकर्णाची झोप पूर्ण झाल्याचा फिल होता. अजून भूषणगड शोधायचा होता, पहायचा होता आणि मुक्काम करायला सज्जनगडावर जायचे होते म्हणून तोंडावर थोडे पाणी मारले आणि निघालो. गुरसाळे वरून जस-जसा पुढे आलो तसे गडाचे दर्शन व्हायला लागले होते. मुख्य रस्त्यावरच्या बस थांब्याच्या बाजूने एक वाट वर गावात जाते, गावातल्या मैदानात गाडी थांबवली आणि कोणाकडे पाणी मिळते का म्हणून गावात शिरलो, घर कम दुकान ज्यादा, अश्या दारात आज्जी उभ्या होत्या. दुकान होते म्हणून विचारले.  चहा मिळेल का? "नाही पोरा चहा नाही ठेवत" त्यांनी उत्तर दिले. दुपारच्या झोपे नंतर मस्त चहा मिळाला कि कस तरतरीत वाटते. जाऊंदे पाणीच द्या! मी म्हणालो. आज्जी आत गेल्या आणि एका हातात पाण्याची बाटली आणि एका हातात चहाचा कप घेऊन आल्या "मी माझ्या साठी टाकला होता तू पण घे थोडा" मला वाटले होते पैसे घेतील पण नाही घेतले त्यांनी काय श्रीमंती भरली आहे ह्या गावाकडच्या लोकांत त्या पांडुरंगालाच माहित. मनोमन आजींच्या पाया पडून आणि अंगावरचे ओझे त्यांच्या दारात ठेवून गडाच्या पायऱ्या चढू लागलो. आजच्या दिवसातला हा दुसरा प्रेमळ अनुभव.
किल्ले भूषणगड
भूषणगड: -
गडाच्या पायऱ्या चढून जाताना दरवाजा नेहमी उजवी कडेच राहतो त्यामुळे शत्रू कायम गडावरील पहारेकऱ्यानंच्या नजरेत राहात असे. गडाची तटबंदी भक्कम आहे असे म्हणायला हरकत नाही पण दरवाजाची कमान मात्र कोसळली आहे. 

प्रवेशद्वाराचे भक्कम बुरुज 
संपूर्ण प्रदेशात हा एकाच गड आहे. १२०० च्या शतकातील हे बांधकाम देवगिरीचा राजा सिंघण ह्याच्या कारकिर्दीत बांधला गेला असावा. महाराजांनी १६७६ मध्ये आदिलशहा कडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. औरंगजेबाने जेव्हा किल्ला काबीज केला तेव्हा ह्याचे नाव बदलून "इस्लामतारा" केले. पुढे पेशव्यांनी आणि त्या नंतर इंग्रजांनी १८४८ मध्ये भूषणगड आपल्या ताब्यात घेतला. आत प्रवेश केला कि भक्कम तटबंदीत जंग्या पाहायला मिळतात.  
बुरुजात कोरलेल्या जंग्या ह्यांचा वापर गडावरून तोफा डागण्यास होत असावा 
(तोफ जागेवरून हलू नये म्हणून)
किल्यावर गडाचे दैवत हरणाई देवीचे मंदिर पहावयास मिळते. तटबंदीला लागून चालत राहिलो तर आजूबाजूचा परिसर खास करून दक्षिणे कडील नवीनच कालव्याचे काम चालेलेल दिसते. गडावरून खाली उतरताना एक वाट डावी कडे जाते येथे भुयारी देवीचे मंदिर आहे. भुयार दिसले नाही मंदिर मात्र नवीनच बनवलेले आहे.
 गडाला लागून एकही डोंगर नाही त्यामुळे गडावरून 
चारही बाजूला दूरपर्यंत शत्रूवर नजर ठेवणे शक्य होते
गडावर गर्द झाडे आहेत त्यामुळे बराच दिलासा मिळाला थंड वारा आणि सावलीत गडाची संपूर्ण तटबंदी फिरून पुन्हा मुख्य प्रवेशदारापाशी आलो तेव्हा साधारण ४ ते ५ चा सुमार असेल. सज्जनगडाचे दरवाजे रात्री बंद होतात म्हणून खाली उतरायला लागलो आजींन कडून बॅग घेऊन पुन्हा माझ्या रथाचे दावे हाती घेत भरधाव निघालो.
झाडांच्या सावलीतून जाणारी पाऊलवाट 
किल्ल्याची ऊंची:-        2970  फुट                     किल्ल्याचा प्रकार:-                   गिरीदुर्ग
डोंगररांग:-                     डोंगररांग नाही                श्रेणी:-                                      साधारण
जिल्हा:-                        सातारा                          गाव:-                                      भूषणगडवाडी
पाण्याची सोय:-            आहे.                            जाण्यासाठी लागणारा वेळ:-       ३० मिनिटे
राहाण्याची सोय:-          मंदिरात होऊ शकते          जेवणाची सोय:-                        स्वतः करावी.
महिमानगड ते भूषणगड: - 
 महिमानगड मुख्य रस्तावरून डाव्या हाताला वळावे - सातारा-पंढरपूर महामार्ग- कराड-वडूज मार्ग (पळशी) - उंबर्डे - गुरसाळे - होळीचागाव - भूषणगड.  हा साधारण ४० किलोमीटरचा पल्ला आहे.
औंध महामार्गावर काढलेला फोटो
आता औंध - रहिमतपूर मार्गे सातारा आणि पुढे सज्जनगड असा प्रवास सुरु झाला. पराक्रमी सूर्य देवांचे तेज काहीसे मृदू होऊ लागले होते आणि निळ्या आकाशी भगव्या रंगाची उधळण सुरु झाली होती. गडावर जाऊन मस्त झुणका भाकर मिळाली तर खायची असा फक्कड बेत बनवला होता. नागमोडी वळणांच्या घाट रस्त्यावर वाऱ्याशी बतावणी करत करत सज्जनगडाच्या पायथ्याशी आलो. 
 निळ्या आकाशी भगव्या रंगाची उधळण
             गाडी व्यवस्थित एका जागी लावून गडाच्या पायऱ्या चढायला सुरवात केली मला वाटले कोणीच नसेल पण वर्दळ होती त्यातले बरेच जण राहण्याच्या बेताने आलेले दिसले,वरती आलो तर गड की गाव तेच समजले नाही बरेच बांधकाम केले गेले आहे. कुठे झोपायला जागा मिळते आहे का पाहत होतो तर एक गुरुजी म्हणाले "बाहेर राहायला परवानगी नाही." मी म्हणालो पण मी तर फार दुरून आलो आहे आता कुठे जाणार. त्यावर ते म्हणाले "रूम मिळेल राहायला. तिकडे संस्थानाचे कार्यालय आहे त्यांना भेटा." आता खर्च होणार ह्या शंकेनेच मी कार्यालयात प्रवेश केला. वर पासून खाल पर्यंत एका नजरेत माझा अवतार पाहून त्यांनी आधी बसायला सांगितले आणि येण्याचे कारण विचारले. (खांद्यावर मोठाली बॅग, एका हातात कॅमेऱ्याचा ट्रायपॉड, ट्रेकिंगचे कपडे, गळ्यात बंडाना, वाढलेली दाढी, कसा-बसा सजवलेला केसांचा पिसारा असेच काहीसे देखणे रूप होते.) मी सांगितले "गड किल्ले फिरायला निघालो आहे. आज इथे मुक्काम करून उद्या परतीचा प्रवास आहे." त्यांनी लागलीच माझा पत्ता आणि मोबाईल नंबर लिहून घेत एक किल्ली माझ्या स्वाधीन केली. "सव्वा आठ वाजता दासबोध उपासना असते ती संपली कि लगेच नऊ वाजता महाप्रसाद" असणार वेळवर नाही आलात तर त्याचा लाभ घेता येणार नाही शिस्त आहे इकडची. त्यांच्या बोलण्यात एक जबर पण मृदुता होती एखाद्या अधिकार वाणी सारखी आणि मी फक्त ऐकत होतो. त्यांचे बोलणे थांबले तसे मी विचारले "रूम करीत किती भाडे द्यावे लागणार." "नाही भाडे काहीच नाही तुम्ही जर स्व-इच्छेने काही देणगी दिलीत तर द्या!" आत मात्र चकित व्हायची पाळी माझी होती. शांत पणे चावी घेऊन मला दिलेल्या खोली कडे निघालो. सुस्थितीत असलेल्या १० x १० खोलीत दारा जवळ ठळक बोर्ड लावला आहे. "खोलीची साफसफाई स्वतः करावी" “घेतलेल्या वस्तू जागेवर ठेवाव्यात.” बॅग ठेवून झाडू मारून घेतला मस्त अंघोळ वगैरे करून खाली आलो आणि आनंदाला कॉल केला. आता रात्रीचे साडेआठ झाले होते दासबोध उपासना चालू झाली होती मग आत न जाता बाहेरच्या कट्ट्यावर बसून राहिलो. देवाचे आणि माझे तसे काही वैर नाही पण तो त्याच्या मार्गी असतो आणि माझ्या पण आज इथे मानसिक शांती मिळत होती म्हणून थांबलो. बरोबर नऊ वाजता उपासना संपली तसे गुरुजींनी सगळ्यांना भोजनालयाच्या बाहेर रांग लावायचे आदेश दिले. लोकांना शिस्त पाळायचा काय एवढा तिढा वाटतो समजत नाही त्यांनी एवढे सांगितले तरी हि मंडळी चालली बेशिस्तीत पणे पुढे शेवटी त्यांनी आवाज चढवला तेव्हा कुठे रांगेत आली पण कुजबुज चालूच एवढे काय रांग लावायचे कारण मोजून वीस जण पण नाही आहोत. गडाची शांतात भंग करणे मला बरोबर नाही वाटले म्हणून मी लक्ष नाही दिले. नुसतेच जेवणे माझ्या मनाला पटणारे नव्हते म्हणू गुरुजींना विचारले मी जेवण वाढायला मदत करू का? मला वाटले ते "हो" म्हणतील पण ते म्हणाले "तुम्ही दमला असाल जेवून घ्या!" अनुयायी आहेत ते वाढतील. पंगतीला बऱ्याच वर्षांनी बसलो होतो. ताट, वाटी, पेला आधीच वाढलेले मीठ पानावर बसलो आणि नंतर प्रार्थना ह्या बुफे सिस्टम मुळे हे सगळे आज काल हरवतच चालेल आहे. जेवायला पुढ्यात गरम गरम भात शेंगदाण्याची चटणी आणि सांबार होते. जिभेच्या चोचल्यापेक्षा मनाची तृप्ती जास्त महत्वाची होती. पोट भर जेवण झाले आता मात्र झोप अनावर झाली होती पुन्हा खोलीत आलो खाटेवर न झोपता खाली चटई अंथरली बागेतून स्लीपिंग बॅग काढली आणि त्यातच झोपलो एवढे वजन उचलून नेल्याचा काही तरी फायदा व्हायला नको!! थोडाच वेळ लागला असेल लगेचच झोप लागली. मठातले गुरुजी म्हणाले होते सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी काकड आरतीला या सकाळी जाग आली तेव्हा ६ वाजून ४५ मिनिटे झाली होती. एकाच दिवसात ४ किल्ले संपूर्ण पाहून झाले होते मग आता हा गड देखील पाहून लवकरात लवकर मुंबई कडे निघालो तर वेळेत घरी पोहोचेन ह्या हिशोबात तयारीला लागलो. सकाळचे विधी आटोपून गड फिरायला निघालो सातारा शहरा वरून डोके वर काढणाऱ्या रविराजाल वंदन करून गडाचा फेरफटका चालू केला. गडाचे पावित्र्य तर कालच अनुभवायला मिळाले होते. शांत आदरतिथ्य, पहिल्याच पावसाच्या सरीने जसे धरतीला शिंपडावे तसे कानावर झालेला मंत्रांचा शिडकाव.
सज्जनगडा वरून दिसणारे विहंगम दृश्य
सज्जनगड: -
उर्वशी नदीच्या खोऱ्यात शंभूमहादेव ह्या डोंगररांगेत वसलेला "आश्वलायनगड" आता "सज्जनगड" स्वतः महाराजांच्या पद स्पर्शाने आणि रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे पवित्र झालेला आहे. 
उर्वशी नदी आणि आजूबाजूचा परिसर
तसे पाहता ह्या गडाला बरीच नावे आहेत आश्वलायन ऋषींच्या वास्तव्यामुले ह्याला आश्वलायनगड म्हणत. ह्या शब्दाचे पुढे विटंबन होत ह्याचे नाव "अस्वलगड" देखील झाले. गावाच्या नावावरून ह्याला "परळीगड" असे देखील म्हणतात. ११ व्या शतकातील भोज राजाच्या काळातील हा किल्ला १३०० च्या काळात महंमदशाह म्हणजे आदिलशहाचा आजोबा पणजोबा असावा. पुढे वंश परंपरेने हा किल्ला आदिलशाहाकडे आला १६६२ पर्यंत ह्याचा किल्लेदार फाजलखान होता पुढे २ एप्रिल १६७३ मध्ये शिवरायांनी किल्ला स्वराज्यात घेतला. महाराजांच्या विनंती वरून समर्थ रामदास कायमचे गडावर वास्तव्यास आले. 
समर्थांची समाधी आणि मंदिर
राज्याभिषेकानंतर संभाजी राज्यांना महाराजांनी समर्थांकडे पाठवले, पण नियतीला काही वेगळेच हवे होते शंभूराजे महिन्याभराच्या अंतरातच दिलेरखानाला जाऊन मिळाले. २२ जानेवारी १६८२ रोजी रामदास स्वामींचे निधन झाले. ६ जून १७०० रोजी फ़तेउल्लाखानच्या नेतृत्वा खाली मुघलांनी गड ताब्यात घेतला आणि गडाचे नामकरण केले "नौरसतारा". पुढे १७०९ मध्ये मराठ्यांनी किल्ला काबीज केला. अनुक्रमे १८१८ मध्ये गड इंग्रजांच्या हाती गेला. पायऱ्या चढून वर जाताना गडाचा मुख्य दरवाजा लागतो त्याला छत्रपती शिवाजी महाराजद्वार असे म्हणतात दरवाजा ओलांडून आत शिरल्यावर गडाचा पूर्वाभिमुखी अजून एका दाराला सामोरे जावे लागते त्याला समर्थद्वार म्हणतात. प्रथेप्रमाणे गडाची दर रात्री नऊ ते सकाळी पाच या काळात बंद करण्यात येतात. गडावर राहायची, जेवणाची, पाण्याची उत्तम सोय मठात होते.
भक्कम तटबंदीतील दरवाजे सूर्य नारायणाला देखील रोखायला तत्पर आहेत.
पाण्याची कमतरता बाराही महिने भासणार नाही

बुरुजावर भगवा येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सलामी देत आहे
किल्ल्याची ऊंची:-        3350 फुट                     किल्ल्याचा प्रकार:-                   गिरीदुर्ग
डोंगररांग:-                    शंभूमहादेव,सातारा          श्रेणी:-                                      साधारण
जिल्हा:-                       सातारा                         गाव:-                                       परळी
पाण्याची सोय:-            आहे.                           जाण्यासाठी लागणारा वेळ:-       २० मिनिटे
राहाण्याची सोय:-          होते                             जेवणाची सोय:-                        आहे.

भूषणगड ते सज्जनगड: -
पुन्हा मुख्य रस्त्याला डावीकडे वळावे पुढे औंध - रहिमतपूर - सातारा - सज्जनगड हा साधारण ६८ किलोमीटरचा पल्ला आहे.

गडावरून खाली आलो बॅग बाईकला बांधून "अजिंक्यतारा" च्या दिशेने निघालो. मुख्य चौकात येउन आधी न्याहारीसाठी थांबलो.  एक प्लेट इडली-सांबर आणि शिरा-उपमा त्यावर एक फक्कड चहा, बॉडीची खुराक फुल करून गडावर आलो. पार दारा पर्यंत गाडी जायला रस्ता आहे. गाडी पार्क केली आणि डोक्यावरचे हॅल्मेट काढले समोरच एक काका उभे होते त्यांनी घातलेल्या टी-शर्ट वर सह्याद्रीचे शिलेदार असे लिहले होते. प्रथम दर्शनी ट्रेकला आले असे वाटत होते. पण नंतर समजले कि त्यांच्या बरोबर अजून मंडळी आहेत जे सगळे गडाच्या स्वच्छता मोहिमेवर आले होते. आता जरी मी इतरत्र कचरा करत फिरत नसलो तरी ह्यांच्या उपक्रमात स्वतःचा हातभार लावूच शकत होतो. त्यांना विचारणा केली तर म्हणाले "अरे वाहः असे करणारे तर हवेच असतात आम्हाला. तुमचे स्वागतच आहे." त्यांच्यातले काही जण आणि मी दारा समोरील तटबंदी वरून खाली उतरलो. लोक इतकी निगरगट्ट का असतात हेच समजत नाही. म्हणजे घरात कचरा नको म्हणून घरातला कचरा बाहेर फेकायचा काय अर्थ आहे का ह्याला!! प्लास्टिक, जेवणाच्या प्लेट्स, पाण्याच्या बाटल्या अजून काय काय जमा केले. गोण्या कमी पडत होत्या म्हणून अजून आणायला ते कोणाला तरी सांगत होते, तेवढ्यात एकाला एक प्लास्टिकचे मोठाले पोते मिळाले त्याने उघडून पहिले तर त्यात अजून बरीच रिकामी पोती होती खजाना मिळाल्याच्या आनंदात तो ओरडला. त्याच्या चेहऱ्यावरचा हर्ष पाहण्या जोगा होता. "काय अवलिये भेटतात एक एक, निस्वार्थपणे दुसऱ्यानीं केलेला कचरा उचलायचा आणि आनंद तो कशात शोधायचा तर रिकाम्या पिशव्या मिळाल्या कचरा भरायला म्हणून." हीच माझ्या भटकंतीची भेट असते नेहमी. कहर तर हा होता कि दारूच्या बाटल्या चांगल्या गोणी भरून मिळाल्या. त्यांच्या बरोबर खाली २ गोणी भरून कचरा जमा केला आणि वर आलो त्यांच्यातले काही जण अजून खालच्या बाजूला उतरले. मी विचार केला गडाचा फेर फटका मारताना आतील कचरा जमा करावा म्हणजे गड पाहून देखील होईल आणि उपक्रमात मदत देखील म्हणून आता प्रवेश केला.
अजिंक्यतारा: -
मुख्य प्रवेशद्वार
राजगड, रायगड, जिंजी आणि त्यानंतर मराठ्यांची हि चौथी राजधानी असलेला "अजिंक्यतारा" बामणोली रांगेत सातारा शहराच्या मधोमध उभा आहे. ११९० मध्ये दुसरा राजा भोज ह्याने ह्या किल्ल्याचे बांधकाम केले त्या नंतर हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि पुढे आदिलशहाकडे गेला. गडाला युद्धाची पार्श्वभूमी आहे. तसेच १५७० मध्ये आदिलशाहची पत्नी चांदबीबी हिला गडावर कैद करण्यात आले होते. तसेच १६०० च्या दशकात बजाजी निंबाळकरांना देखील येथेच कैद करण्यात आले होते. (बजाजी म्हणजे शिवरायांचे व्याही, बाजाजींचा मुलगा महादजी आणि महाराजांची कन्या सखुबाई ह्यांचा विवाह १६५५ रोजी संपन्न झाला होता.) २७ जुलै १६७३ रोजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. ह्या गडावर महाराज अंगी ज्वर आल्याने तब्बल दोन महिने मुक्कामास होते. १६८२ मध्ये औरंग्या महाराष्ट्रावर चालून आला. त्याने १६९९ साली गडाला वेध घातला तेव्हा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. तब्बल साडेचार महिने मराठ्यांनी गडाच्या साथीने झुंज दिली पण १३ एप्रिल १७०० मोघलांनी सुरुंग लावण्यास दोन भुयारे खणली आणि सुरुंगास बत्ती देण्यात यशस्वी झाले स्फोट होताच मंगळाईचा बुरुज ढासळला ह्यात बुरुजावारचे मराठे दगावले. प्रयागजी देखी त्यावेळी तिथेच होते पण त्यांना जास्त इजा झाली नाही तेवढ्यात दुसरा स्फोट झाला आणि बुरुजाचा मोठा भाग खाली कोसळला मात्र ह्यात मुघल सैन्यच सापडले तब्बल दीड हजाराच्या आसपास. परंतु २१ एप्रिल रोज गडावरची अपुरी रसद आणि दारुगोळा ह्या मुळे सुभानजी "आझमतारा" वर मोघली निशाण फडकले. पुढे क्रमशः हा गड ताराराणी नंतर पुन्हा मुघलांकडे त्यांच्या कडून शाहूने फितवून किल्ला बळकावला आणि स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. त्यानंतर पेशव्यांकडे गड होता पण दुसऱ्या शाहूंच्या निधन नंतर १८१८ मध्ये इंग्रजांनी गडाचा ताबा मिळवला. गड तसा प्रशस्त आहे पण गडावर ताराबाईंचा ढासाळलेला राजवाडा, प्रसारभारती केंद्र आणि त्याचे टॉवर्स आहेत बुरुज आणि तटबंदी मात्र भक्कम आहे. प्रवेशदाराचे दोन्ही बुरुज अजून देखील उत्तम स्थितीत आहे गडाचा दरवाजा सतत बंदच असतो आत जाण्यास एक छोटे उपद्वार बनवले आहे. आतल्या मंगळाई देवीच्या मंदिरा समोरच मंगळाई बुरुज देखील पहावयास मिळतो. देवन सुद्धा बंदिस्थ करून ठेवले जाते कारण माणूस स्वतःच्या फायद्या साठी त्याला देखील सोडायचा नाही. हनुमानाचे मंदिर बंदच होते. पाणी कुठे उपलब्ध नाही. 
किल्ल्याची ऊंची:-        950                              किल्ल्याचा प्रकार:-                   गिरीदुर्ग
डोंगररांग:-                    बामणोली, सातारा            श्रेणी:-                                      साधारण
जिल्हा:-                       सातारा                           गाव:-                                       सातारा
पाण्याची सोय:-            नाही                              जाण्यासाठी लागणारा वेळ:-      वरपर्यंत गाडी जाते
राहाण्याची सोय:-         हनुमानाच्यामंदिरात           जेवणाची सोय:-                        नाही
अजिंक्यतारा ते मुंबई: -
गडावरून खाली मुख्य रस्ताला उजव्या हातास वळावे २ किलोमीटर वर महामार्ग लागतो तिकडून डाव्या हाताला सरळ पुणे - खोपोली - मुंबई (दादर) हा सरळ रस्ता आहे. साधारण २५८ किलोमीटरचे हे अंतर आहे. 
साताऱ्याचे कंदी पेढे घेतले आता कुठेच थांबायचे नाही डायरेक्ट पुणे असे ठरवून महामार्गाला लागलो. सातारा हायवे वरून बराच पुढे आलो आणि पेट्रोलचा काटा टुकटुक करू लागला म्हंटले आता लोचा नाही झाला पाहिजे. पण पेट्रोल पंप दिसेचना! असे करता करता ३० कि.मी. तरी आलो असेन आणि उजव्या हाताला एक पेट्रोल पंप दिसला पण त्याला छेद रस्ता नव्हता म्हणून थोडे पुढून फिरून आलो पेट्रोल भरले आणि बाजूच्या हॉटेल मधून एक पाण्याची बाटली घेतली. पुन्हा गाडी भर धाव पळवायला सुरवात केली. बराच पल्ला गाठला असेल आणि समोर मोठा बोर्ड दिसला सातारा २ किमी. भुवया उंचावल्या, बोर्ड मागे टाकत पुढे आलो तसा अजून एक बोर्ड दिसला कोल्हापूर १८९ कि.मी. मग मात्र गाडी थांबवली. मागून एक गाडी आली त्यांना थांबवले आणि विचारले त्या वर ते म्हणाले “राव इकडे कुठे त्या रस्त्यावरून जा”!!! प्रश्न चिन्ह तर होते मी चुकलो तरी कुठे परत कसा आलो साताऱ्याला? काहीच समजत नव्हते. योग्य रस्त्याला गाडी घेतली आणि नव्याने सुरवात केली मनात एकाच विचार होता चुकलो कुठे? मग अचानक ट्यूब पेटली पेट्रोलपंप ……………… आईशपथ ……. तिकडेमीयु-टर्न मारला होता आणि पाणी घेऊन मी माघारी न फिरता गाडी सरळ दामटवली होती. पण आता विचार करून काही फायदा नव्हता त्यामुळे पुन्हा मार्गावर लक्ष केंद्रित केले. पुण्यात वाकडच्या ब्रिजखाली गाडी थांबवली आणि मुकेशला फोन केला म्हंटले भेटायला ये! तसा तो हि लगेच आला त्याची धावती भेट संपवून निघालो. थेट गाडी लोणावळ्याला थांबवली आणि अनिकेतला फोन केला कसा येऊ तुझ्या घरी त्याने सांगितलेल्या मार्गा ने त्याच्या घरजवळ आलो पण ह्यात वेळेचे नियोजन जरा मागे पुढे झाले होते त्यामुळे ४.२८ ची खोपोली सी.एस.टी लोकल गेली होती. पुढची ६ वाजता होती मग अनिकेतच्या घरी काही वेळ काढला त्यानेच मग खोपोलीला सोडले. आता सेन्ट्रल रेल्वे आपल्या नावाला जागणार नाही तर कसे चालेल. सहा वाजताची गाडी तब्बल ४५ मिनिटे उशिराने आली, उडी मारून खिडकीतली जागा पटकावली खरी पण गाडी निघालीच ७.०५ ला शांत बसून होतो दुसरा काहीच पर्याय नव्हता. घरी साधारण ११.३० च्यासुमारास पोहोचलो. जेवण केले आणि शांत पणे झोपी गेलो आता उद्या पासून पुन्हा ऑफिसचे झेंगट झेलायचे होतेच. 

बाकी हा ट्रेक मना सारखा झाला खरी. वहीत लिहण्या सारखे आणि उतारवयात मनाला सुखावणारे बरेच अनुभव आले. कोणी प्रेमाने दोन घास भारावले, तर कोणी स्वतःच्या वाटणीचा चहा देऊ केला. अंधाऱ्या गुहेत कानी आलेला पाण्याच्या थेंबांचा आवाज आणि मनात झालेलं धस्स…… कायम लक्षात राहील. भर दुपारी शेतातली झपकी, रणरणत्या उन्हात शोधा शोध करताना नजरेस पडलेल्या पायऱ्या, पहाटेचारच्या सुमारास भरधावगाडीवर असताना अचानक रस्त्यात दिसू लागलेली माणसे. आता रात्रीचे दोन वाजले आहेत चला झोपायला हवे. ह्याट्रेकची सांगता इथेच करतो पुन्हा नव्या ने एखादी मोहीम केली कि भेटूयाचं.........


  • गडांवर आणि इतरत्र हि स्वच्छता राखावी
  •  ट्रेकला जाताना सोबत विजेरी, छोटासा चाकू, मुबलक पाणी, खाण्यासाठी काही पदार्थ ठेवावेत.
  • अतिहौशीपणा करू नये.
  • मी योजिलेला मार्ग माझ्या साठी सोयीस्कर होता कृपया कोणीही जाण्या पूर्वी योग्य माहिती घ्यावी
  • कल्याणगडावर मधमाश्यान पासून सावधान


 कॅमेऱ्यातील मेमरी कार्ड खराब झाल्यमुळे मोबईल मध्ये काढलेल्या फोटोनवरच समाधान मानावे लागते आहे. 


उर्वरित भाग लवकरच







गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

"जिवंत असण्याचा आभास"




पुढ्यातल्या खोल दरीत पाय सोडून थंडगार कातळावर टेकून बसायची मजाच काही और आहे. मधूनच वाहणाऱ्या मंद वाऱ्याची झुळूक एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते, निळ्या आकाशात तांबड्या रंगाची झालेली उधळण का कोणास ठाऊक पण, कोणाच्या हातावरी मेहंदी सारखी वाटून जाते, मावळणाऱ्या रविला दंडवत करू कि येणाऱ्या अंधाराला घट्ट मिठी मारू अशी द्विधा मनस्थिती.

स्वतःच्या दुनियेत असताना घश्याला पडलेली कोरड ओलावण्यास मी बॅग जवळ खेचली त्याच क्षणी कानी आलेला फुत्कार माझ्या हृदयाचे ठोके वाढवायला पुरेसा होता, झोपेतून खडबडून जागा झाल्यासारखा मी जागच्या जागी उठलो घेतलेल्या सेफ्टीमुळे तिथेच अडकलो म्हणणण्या पेक्षा वाचलो म्हणेन, क्षणभर आमची नजर नजर झाली असेल दोघांच्या डोळ्यात एकमेकांच्या असण्याची अनामिक भीती होती. पण माझ्याकडे दुर्लक्ष करीत ते महाशय सरपटत आपल्या मार्गी निघून गेले हे बरे. टेपसिलिंग वरचा भार पुन्हा पायावर घेत नीट उभा राहिलो, तणावग्रस्त परिस्थिती सुद्धा नकळत मी माझ्या जिवंत असण्यावर स्मित करून गेलो. खरेच खूप मज्जा येते आहे मला ह्या जगण्याची.
        

निसर्ग…………सह्याद्री………… अनुभव………….थरार ……………आणि ह्या सगळ्यात महत्वाचे "जिवंत असण्याचा आभास"………………



मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

ताम्रमुखी टिटवी / Red-wattled Lapwing


















नावे: -
मराठी: -             ताम्रमुखी टिटवी
संस्कृत नाव: -     ताम्रमुखी टिट्टिभ
इंग्लिश: -           Red-wattled Lapwing
हिंदी:-               टिटहरी
शास्त्रीय नाव: -    Vanellus indicus
कुळ: -               टिट्टिभाद्य (Charadriidae)

वर्णन: -
ताम्रमुखी टिटवी हा पक्षी सुमारे ३३ सें. मी. आकाराचा असून याची चोच लाल, डोके, गळा, छाती काळ्या रंगाची, त्या खाली पोटाकडे पांढरा रंग तर पाठीकडून पंखांपर्यंतचा भाग तपकिरी रंगाचा, पाय लांबट पिवळ्या रंगाचे असतात आणि यांची मुख्य ओळख म्हणजे दोन्ही डोळ्यांजवळ लाल रंगाचे कल्ले. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

वास्तव्य/आढळस्थान: -
ताम्रमुखी टिटवी पक्षी हिमालयाच्या १८०० मी. उंचीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळणारा सर्वसामान्य पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, इराण, इराक वगैरे देशांमध्येही आढळतो. शेतीचे प्रदेश, मोकळे माळरान प्रदेश, उंच जंगलांच्या किनाऱ्यांजवळ, पाण्याच्याजवळ विशेषतः नदी, तलावांच्या किनाऱ्यांजवळ ताम्रमुखी टिटवी पक्षी हमखास दिसून येतो.

खाद्य: -
लहान-मोठे कीटक शंख-शिंपल्यातील जीव हे ताम्रमुखी टिटवी पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.

प्रजनन काळ: -
या पक्ष्यांच्या वीणीचा काळ साधारणपणे मार्च ते ऑगस्ट असा असून मादी एकावेळी ३ ते ४ राखाडी किंवा राखाडी-तपकिरी रंगाची त्यावर काळे ठिपके असलेली अंडी देते. ही अंडी तलावांच्या, नदीच्या किनाऱ्याजवळील मोकळ्या मैदानात असतात. यांचे मुद्दाम बांधलेले घरटे नसते. अंड्यांजवळचा भाग सहसा खोलगट असतो आणि तेथे गारगोटी सारखे दगड असतात. यामुळे अंडी आणि दगडातील फरक चटकन ओळखता येत नाही. अंडी असतील त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केल्यास नर-मादी मोठ्याने आवाज करीत त्या विरुद्ध दिशेने उडून लक्ष दुसरीकडे वेधून घेतात.