पुढ्यातल्या
खोल दरीत पाय सोडून थंडगार कातळावर टेकून बसायची मजाच काही और आहे. मधूनच वाहणाऱ्या
मंद वाऱ्याची झुळूक एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते, निळ्या आकाशात तांबड्या रंगाची
झालेली उधळण का कोणास ठाऊक पण, कोणाच्या हातावरी मेहंदी सारखी वाटून जाते, मावळणाऱ्या
रविला दंडवत करू कि येणाऱ्या अंधाराला घट्ट मिठी मारू अशी द्विधा मनस्थिती.
स्वतःच्या
दुनियेत असताना घश्याला पडलेली कोरड ओलावण्यास मी बॅग जवळ खेचली त्याच क्षणी कानी आलेला
फुत्कार माझ्या हृदयाचे ठोके वाढवायला पुरेसा होता, झोपेतून खडबडून जागा झाल्यासारखा
मी जागच्या जागी उठलो घेतलेल्या सेफ्टीमुळे तिथेच अडकलो म्हणणण्या पेक्षा वाचलो म्हणेन,
क्षणभर आमची नजर नजर झाली असेल दोघांच्या डोळ्यात एकमेकांच्या असण्याची अनामिक भीती
होती. पण माझ्याकडे दुर्लक्ष करीत ते महाशय सरपटत आपल्या मार्गी निघून गेले हे बरे.
टेपसिलिंग वरचा भार पुन्हा पायावर घेत नीट उभा राहिलो, तणावग्रस्त परिस्थिती सुद्धा
नकळत मी माझ्या जिवंत असण्यावर स्मित करून गेलो. खरेच खूप मज्जा येते आहे मला ह्या
जगण्याची.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा