शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

वर्ष २०१३ ने काय दिले ?????????



२०१३ वर्ष सरत आले …… मनात विचार आला काय दिले या वर्षाने? प्रश्न तर मोठा आहे पण माझ्या कडे पण संपूर्ण रात्र पडली आहेच मग एक एक करत सगळे आठवू  लागले आणि उत्तर पण मिळाले या वर्षाने दिल्या आठवणी! नेहमी सारख्या. आयुष्य म्हणजे काय नक्की आठवणीच काय? मग आठवण म्हणजे काय????????????

आठवण म्हणजे सांधणची दरी: -                 बोचरी थंडी, शेकोटी, सोबतीला गाणी, मस्त जेवण आणि चांदणे 
पांघरून झोपणे
आठवण म्हणजे भैरमगड: -                        हरवलेली वाट, घशाला पडलेली कोरड आणि मावळतीला जाणारा सुर्य 
आठवण म्हणजे हरिश्चंद्रगड: -                     नळीची वाट, कोंकणकडा, आणि मी पाहिलेला सूर्यास्त
आठवण म्हणजे प्रबळगड: -                       रणरणत्या उन्हात झाडाची सावली, संपलेल्या पाण्याच्या बाटल्या, आणि 
टाकीतले थंडगार पाणी 
आठवण म्हणजे चंदेरी: -                           पाठीवेरची जड बॅग सांभाळत रात्रीच्या अंधारात चालणे आणि 
वेळीच साधलेले प्रसंगासावधान
आठवण म्हणजे गणपती गडाड:-                संपूर्ण दिवस धबधब्याखाली भिजणे, गरमा गरम जेवण आणि 
देवळातील शांत झोप........
आठवण म्हणजे कात्रज ते सिंहगड:-             लचकलेला पाय, मित्रांनी दिलेली साथ आणि 
गरमा गरम कांदाभजी ………….
आठवण म्हणजे भीमाशंकर: -                     निसर्गरम्य वातावरण, शिडीघाट आणि गाण्याच्या भेंड्या………….
आठवण म्हणजे वासोटा: -                         सुर्यालाही रोखणारे घनदाट वन आणि कोयनेचे शांत निर्मल पात्र…….
आठवण म्हणजे लिंगाणा: -            गवताचा गालीचा, चांदणी रात्र, आणि प्रौढप्रतापपुरंदरला दिलेली आरोळी ………… 
आठवण म्हणजे मुंबई: -                             सांजवेळ, मरीन ड्रायइव्ह, आणि ती ……………… (अजून पण ती कोण हा प्रश्न अनुत्तरीत!)
आठवण म्हणजे आता आठवण हेच आयुष्य झाले आहे ………… मग आयुष्य म्हणजे?

आयुष्य म्हणजे आई: -                  नेहमी घराबाहेर राहतो म्हणून ओरडणारी पण सांभाळून या सगळ्यांनी न चुकता बोलणारी आणि रात्री अपरात्री पण जेवण वाढायला स्वतःची झोप मोड करणारी
आयुष्य म्हणजे महाराष्ट्र: -             संतांची भूमी, समर भूमी, माझी भूमी ………….
आयुष्य म्हणजे शिवराय: -  जगावे कसे हे शिकवणारे.... 
आयुष्य म्हणजे शंभूराजे: -  धैर्य, साहस, स्वाभिमान …………
आयुष्य म्हणजे जिजाऊ:-               मायेचा सागर……………..
आयुष्य म्हणजे मित्र: -                   नेहमी साथ देणारे……………..


आयुष्य म्हणजे माझा सखा सह्याद्री……………..

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

स्वारी लिंगाण्याची .................. भाग १

        


३ नोव्हेंबर २०१३ लक्ष्मी पूजनाचा मंगलमय दिवस सायंकाळची ५ वाजून ३६ मिनिटे झाली होती. सुधीर भगव्याच्या दिशेने पुढे चालत होता मी तो क्षण कॅमेऱ्यात टिपण्यास सज्ज होतो. तो क्षण इतका अविस्मरणीय होता कि त्याला अनुभवता येईल पण समजावता ना जरा कठीण, तरी काही लिहितो आहे. 

सुधीर लिंगाण्याच्या शिखरावर भगव्याच्या दिशेने चालताना

आमच्या ह्या धाडसाला दोन मुख्य साक्षीदार होते. एक म्हणजे महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेला दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि त्या मागे दडू पाहणारा भगव्या तेजाचा रविराज जणू आम्हाला सलामीच देत होता. कि पुढचे आव्हाहन मांडत होता हे त्या परमेश्वरालाच ठाऊक. 

लिंगाण्याच्या माथ्यावरून दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि तेजोमय सूर्य

सुधीर मागोमाग आम्ही सुद्धा शिखरावर आलो. इतके दिवस चालेली जीवाची धडपड, मनाची घालमेल, साऱ्यांना पडलेले प्रश्न, तहान, भूक सगळ्याचा विसर पडला होता. आम्ही सगळेच समोरचा तो विलोभनीय नजरा डोळ्यांत साठवण्यात गुंग झालो होतो. एक विलक्षण आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. मनात विचारांची उलथापालथ होत असतानाच अचानक माझी तंद्री भंग झाली आणि कानी आली ती शिवगर्जना ………….

गो ब्राम्हणप्रतिपालक, 
हिंदविस्वराज्य संस्थापक, 
जाणता राजा,  निश्चयाचा महामेरू, 
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय, 
जय भवानी जय शिवाजी, 
हर हर महादेव.  

गर्जना देताना सुधीर 

हर हर महादेवाच्या जयघोषात सारा आसमांत दुमदुमला.............

डावीकडून  दीपक, कल्पेश, स्वप्ना, अजय, सुधीर

मी सुधीरला हाथ मिळवायला पुढे झालो तो फक्त स्मित हसला त्याच्या चेहऱ्यावर पुढची चिंता स्पष्ट दिसत होती. आता पर्यंत साक्षीला असणारा सूर्य नारायण आता रायगडामागे निरोप घेऊ पाहत होता. होणाऱ्या अंधाराला प्रतिकार म्हणून जवळ फक्त एकाच टॉर्च होता. दीपक आणि सुधीर लगेच पुढे पॅचवर Rappelling चा सेटप करयला गेले. अजय, स्वप्ना, कल्पेश आणि मी मागे अजून काही क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात व्यस्त झालो. पूर्ण अंधार होण्या अगोदर गुहे पर्यंत पोहोचायचे होते. एकाच टॉर्च असल्याने आधी मी खाली जावे आणि मागाहून येणाऱ्यांना रूट समजवावा हे ठरले. पहिले खाली उतरलो, रोप पुन्हा वर खेचून दुसरे कोणी येई पर्यंत एकटाच होतो जवळ असलेल्या टॉर्चच्या प्रकाशाशिवाय तिकडे मिट्ट काळोख होता. त्यात अमावस्येची रात्र अचानक वाऱ्याची झुळूक आली आणि अंग शहारले काही वेगळाच अनुभव होता तो. सगळ्यांना गुहेच्या जवळील पाण्याच्या टाक्यापर्यंत यायला साधारण रात्रीचे ९ वाजले. सगळ्यात जास्त दमछाक सुधीर आणि दीपकची झाली होती. सो कॉल्ड आम्ही पण दमलो होतो. 

आमच्या सहा जणांत सुधीर लिड क्लायम्बिंग करत होता आणि दीपक त्याचा बिले देत होता. सुरवातीपासून हाच क्रम होता सुधीर वर गेला कि बिलेचा सेटप बनवून दीपकला वर घ्यायचा आणि मागाहून चढाई करायचो. (गडाची चढाई कठीण श्रेणीत येते त्यामुळे येण्याआधी जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी आम्ही जमा केली होती. त्यात एक गोष्ट स्पष्ट झाली होती कि सेफ्टी घेतली तर गड सर होणारच, कोणत्याही दुर्घटने शिवाय.) गुहेच्या जवळ बसायला बऱ्यापैकी जागा आहे. (बऱ्यापैकी हा शब्द महत्वाचा कारण लिंगाण्याच्या शिखरावर फक्त २५०० स्क़्वेअर फुट इतकीच जागा आहे.) तिकडेच जरा विसावलो, संपूर्ण दिवसाचा थकवा आता जाणवत होता त्यात संथ वाहणाऱ्या गार वाऱ्याने अलगद निद्रेची चादर पांघरली.  थोड्या वेळाने मी आणि कल्पेश पाणी आणायला म्हणून टाक्यावर गेलो. निसर्गाची किमयाच म्हणावी लागेल. शहरात शुद्ध पाणी विकत घ्यायला पैसे मोजावे लागतात आणि येथे मात्र थंडगार अमृततुल्य जल आम्हाला प्यायला मिळाले. ह्याच पाण्याच्या जोरावर आम्ही दुपारी गडसर करायचा निर्णय पक्का केला होता. सुर्य डोक्यावर आला होता तरी आमची गुहेपर्यंतची चढाईपण पूर्ण झाली नव्हती. तिथवर पोहोचायलाच आम्हाला साधारण २ वाजले. पाणी संपले होते जेवायला म्हणून संत्री, सफरचंद आणि ड्रायफ्रुट अशी शिदोरी होती. सुधीर आणि मी पाणी पाहायला टाकी शोधत पुढे आलो थंडगार पाण्याने भारलेल्या टाक्यावर बसून आम्ही आधी मनसोक्त पाणी प्यायलो. पाणी पीत असताना दादा (सुधीर) म्हणाला आपल्याला परत खाली जायला लागणार! मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. मला समजावत तो म्हणाला "बघ आता खाली उतरायला घेतले तर अंधार होता होता आपण पान्हे किंवा परत मोहरी गावांत जाऊ शकू जिकडे आपली खाण्याची काही सोय होऊ शकते." जवळ खायला काही नव्हते गुहेत राहायचे म्हंटले तर नोव्हेंबर महिन्याच्या थंडीपासून बचाव करायला सुद्धा काही नाही. इतक्या जवळ येउन पुन्हा माघारी फिरायची माझी अजीबात इच्छा नव्हती अर्थातच त्याची देखील नव्हती. पण सगळ्यांचे मत घ्यायला लागणार होते रात्री खायला आणि थंडी पासून वाचायला काहीच जवळ नव्हते. त्यात राहणार कुठे हा मोठा प्रश्न होता. सगळे बसले होते तिकडे परत आलो मी प्रश्न समोर मांडला. माघार घ्यायची इच्छा कोणाचीच नव्हती. पण पोटाचे काय करणार आणि थंडी पासून कसे वाचणार होतो. कारण चढाई करायची म्हणून आम्ही सगळ्यांनी बॅग्ज खालीच झाडाला बांधून ठेवल्या होत्या. बॅग्जमध्ये पण जास्त काही खायला नव्हतेच खाली उतरून गावात पोहोचून मगच खायची काही व्यवस्था होणार होती. आणि इथे काय? काल पण नीट जेवण झाले नव्हते. आईने बांधून दिलेले जेवण मी सकाळी ट्रेनमधेच विसरलो होतो. म्हणून रात्रीच्या जेवणात आम्ही जास्तीची शिदोरी म्हणून आणलेली मॅग्गी आणि सूप ह्यांची मेजवानी करायचे ठरवले आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तो काय, दिपकने मॅग्गी तयार झाली म्हणून ज्या आवेशात भांडे उचलले त्याच्या जोशात गरम लागले म्हणून त्याच्या हातून ते निसटले देखील पूर्ण भरलेल्या टोपात आता जेमतेम चार माणसांना पुरेल इतके खाणे राहिले होते. ह्या सगळ्यात आता आपल्या कडे काय आहे. "बॅग चेक करा बघू आधी" स्वप्ना म्हणाली! ७ सफरचंद, ३ संत्री, आणि एक ड्रायफ्रुटचे पाकीट ह्या सगळ्यावर आता चा उरलेला दिवस, त्या नंतर येणारी रात्र आणि उद्या जेव्हा केव्हा कोणत्या तरी गावात पोहोचणार तेव्हा पोटात काही पडणार होते. निर्णय तर सगळ्यांनी घेतला होता त्यात दुसरा असा विचार नव्हताच लिंगाणा आजच सर करायचा.  

पुढे जायचा निर्णय घेतला खरी पण शिखर गाठून पुन्हा खाली पोहोचणे शक्य नव्हते म्हणून गुहेत राहायचे असे ठरले. पाणी घेऊन मी आणि कल्पेश परत आलो सगळे जण तिकडेच थांबले होते म्हंटले इकडे काय करताय! ह्यावर स्वप्ना "गुहा ओली आहे कसे राहणार तिकडे? आपण इकडेच बाहेर झोपूया." आता ही काय नवी भानगड मरणाच्या थंडीत त्यात पांघरायला काही नाही आणि असे उघड्यावर राहायचे. चल बघूया म्हणून सगळे गुहेत आलो. नुकताच पावसाळा संपला होता मध्य भागी थोडा ओलावा होता. पण बाहेरच्या मानाने थंडी मात्र कमी होती. सगळ्यांना प्रश्न होता इथे झोपता नाही येणार हा. इतक्यात भावड्या (कल्पेश) म्हणाला चाल तू माझ्या बरोबर आजूबाजूचे सुकलेले गवत आणूया कापून आणि खाली अंथरूया. त्याने लढवलेली शक्कल नाही ठरली. आम्ही दोघे मगाशी जिकडे बसलो होतो तिकडेच पुन्हा गेलो आणि गवताची एक मोठी मोळी बनवून घेऊन आलो. सगळीकडे गवताचा तो गालीचा पसरवला प्रत्येकाला त्याच्या हिश्याचे १ सफरचंद मिळाले. मी आधीच ठरवले होते जो पर्यंत पोटाला कळ लागत नाही तो पर्यंत ते तसेच ठेवायचे. आता थंडी आणि थकव्याने हळू हळू आम्हाला अगोशात घेतले आणि आम्ही त्या मऊशार गालीच्यावर सुखद आठवणींना उश्याशी घेऊन कधी झोपी गेलो हे आमचे आम्हालाच समजलेच नाही. नक्की वेळ नाही सांगता यायची पण साधारण ११.३० किंवा १२ चा सुमार असावा पोटाला भूक लागली म्हणून जग आली माझ्या हिश्याच्या सफरचंदावर मी यथेच्ह ताव मारला आणि पाणी प्यायलो. बाजूला पाहिले सगळे गाढ झोपले होते. आकाशात नक्षत्रांची सुंदर रांगोळी पसरली होती. मनातील "हा खेळ सावल्यांचा" चित्रपटातील गाणे नकळत ओठावर आले.

रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा,
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा,
हा चंद्र ना स्वयंभू रवीतेज वाहतो हा,
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा,
प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्यांचा


रात्र जशी जशी सरत होती चांदणे अजून खुलत होते. थंडी तर होतीच पण आता वारा आपल्या रौद्र रुपात येऊ पाहत होता. गुहा वाऱ्याच्या प्रवाहात येत नसल्याने  वारा थेट गुहेत शिरत नव्हता पण त्याने थंडी थोडेच कमी होणार होती. कल्पेश उठला होता आणि त्याचे शेकोटी पेटवायचे अथक प्रयत्न चालू होते. साधारण २ वाजले असतील थंडीमुळे सगळेच जागे झाले होते. अजून तांबड फुटायला अवकाश होता. गडावर कोणीतरी आहे ह्याची खबर रात्रीच खाली गावकऱ्याना लागली होती. काल आम्ही अंधारात उतरत असताना कोणीतरी दूरवरून टॉर्च घेऊन पाहणी करताना आम्ही पहिले होते. अर्थातच आम्हालाही त्याच्या हातातील विजेरीचा प्रकाशझोताच काय तो दिसला होता. तेव्हा सुधीर म्हणाला होता एवढी मेहनत आणि जोखीम घेतो आहोत आता कोणी रेस्क्यूला आले नाही म्हणजे मिळवले नाही तर सगळी मेहनत वाया जाईल. पण आम्ही लिंगाण्यावर होतो इतक्या वेळात एक चिटपाखरू देखील आम्हाला दिसले नव्हते. एक गिधाडाचे जोडपे काय ते पहिले ते सुद्धा समोरच्या रायलिंग पठाराच्या नैसर्गिक गुहेत.


उगाच नाही महाराजांनी हा गड कैद्यांना डांबून ठेवायला स्वराज्यात सामील केला. रायगड डोंगर रांगेतील हा उत्तुंग सुळकानुमा गड ह्या कामा करिता अत्यंत उपयुक्त होता हे हेरून राज्यांनी रायगडा बरोबर ह्याच्या डागडुजीचे काम करवून घेतले. माझ्या पाहणीतला हा पहिला गड ज्याच्या माथ्यावर अथवा इतर कुठेही आम्हाला देव नाही दिसला. पण तरी गडाला सोमजाई आणि श्रीजननी हे देव आहेत बाजूच्या मोहरी गावात वर त्याचे टेकडीवर मंदिर आहेत. आता शेकोटी पेटवायला आमचा मखमली गालिचाच सरपण म्हणून कमी येत होता. मग गप्पा आणि मस्ती सुरु झाली त्या वेळे पासूनच स्वप्नाच्या अंगात संचारू लागले तिची अथक बडबड आणि मस्ती चालू झाली त्यात जोडीला दिपक होताच पण ह्या मस्करीच्या आणि बडबडीच्या जोरावर आम्ही ती रात्र आणि दुसरा पूर्ण दिवस तग धरून राहिलो.


वेळे अभावी सध्या एवढेच लिहितो आहे पुढचा भाग लवकरच लिहून पूर्ण करीन.....