गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

"बाप'' हमाल

"बाप'' हमाल
ठिकाण: -           मुंबई लोकल
जागा: -               विंडोसीट
दिवाळीच्या धामधुमीत तशी गर्दी जरा कमीच होती, हातातला गिफ्ट बॉक्स सांभाळतचं माझ्या समोरच्या आसनावर तो बसला. पण विन्डोसीट मिळण्याच्या आनंदापेक्षा त्याच्या हातात जे काही होत, त्याची ख़ुशी मात्र त्याला प्रचंड असावी (डोळ्यातलं तेज ते स्पष्ट पणे सांगत होते) राहून राहून त्याची नजर माझ्या कपड्यांकडे जात होती, आधी मला थोडा अवघडल्या सारखा झाला म्हणजे ऑफीस ला जाताना घालतो तसेच शर्ट - पॅन्ट - बूट असाच नॉर्मल सगळं असताना  . . . . . . .. . . . . साधारण २ - ३ स्टेशन गेले असतील आणि तो म्हणाला तुमच्या कडचं पेन मिळेल का??? आता माझ्या लक्षात आला तो माझ्याकडे का पाहत होता. मी पुढे केलेलं पेन त्याने हातात घेतला आणि तो अडखळयाचं जाणवलं, एव्हाना बोलायची तयारी झालीच असावी म्हणून त्याने चटकन सांगितलं "तुम्हीच लिहून देता का"?? "मला लिहता नाही येत!!!!" मी पेन परत घेतलं आणि त्याने पुढे केलेला बॉक्स देखील, आता बॉक्स माझ्या मांडीवर ज्याला मी एका हाताने धरलं होत आणि दुसऱ्या हातात लिहायला पेन होत. तरी सुद्धा बॉक्स चुकून पडला तर, म्हणून त्याने हाताचा सपोर्ट देऊन बॉक्स धरला. नकळत माझ्या चेहऱ्यावर स्मित झळकले
मी: - काय लिहायचं आहे!!
तो: - माझ्या मुलाचं नाव.
मी:-  नाव काय आहे त्याच.
तो: - अक्षय (थोडा थांबून) इंग्लिश मध्ये लिहाल का?  त्यांच्या शाळेत इंग्रजी शिकवतात आणि त्यो पण काही बाही बोलत असतो (व्हॉट नेम? आणि काय ना काय) मला काही समजत नाही पण ऐकायला खूप भारी वाटत!
एका दमात सगळं सांगून टाकला त्याने.
(दुपारीच कंदील बनवायचं सामान घेतलं होत.) मी बॅग उघडली त्यातून एक रंगीत कागद काढला, फेविकॉल लावून कागद बॉक्स वर चिटकवला. त्यावर कॅपिटलमध्ये
FROM FATHER
TO HIS
LOVING SON AKSHAY
एवढंच लिहिलं आणि बॉक्स त्यांच्या हातात परत दिला, काय लिहिलं असं त्यांनी देखील नाही विचारलं आणि मी देखील नाही सांगितलं. नकळतच झालेली हि कृती नंतर माझ्या लक्षात आली (असो त्याच्या पोराने वाचून दाखवलेच असेल कदाचित अर्थ देखील समजावला असेल) खिडकी बाहेर पाहणाऱ्या चर्येकडे माझी नजर एकसारखी जात होती, आणि त्याच नजरेने मी त्याला न्याहाळ, अगदीच जुना नाही पण वापरलेला शर्ट, खाली पायजमा आणि पायात चप्पल, केसं विंचरुन देखील उभेच राहतील एवढे जाड खुर्दाडलेली दाढी आणि थोडी वाढलेली मिशी असाच काहीसा साज होता.
न राहून मीच विचारलं "काय आहे त्यात"??
कदाचित ते मी किंवा कोणीही ते विचारावा असंच त्याला वाटत असावं.
तो: - रिमोट वाली गाडी!!
मी: - अरे वाः
तो: - पाचवी पास झाल्या पासून मागे लागला होता, पण फाटक्या खिशामुळे मला देणं कधी जमलंच नाही, आता तो आठवीत गेला आहे आणि गेल्याच महिन्यात त्याचा वाढदिवस देखील झाला, आता हट्ट करीत नाही तो.  मोठा झाला ना!!! देव जाणे आवडते आहे का त्याला? का त्याची आवड बदलली..... ..... .  पण घेतली खरी!!
अक्षयला वाढदिवसाच्या शुभेच्या द्या माझ्या तर्फे, खिशातलं पेन काढून त्यांना देत मी म्हणालो……. त्यांनी देखील खिशात ठेवत एक स्मित हास्य केला.
तो: - हो हो नक्कीच देईन, त्याला पण शिकवून मोठा साहेब बनवायचं आहे मला म्हणजे माझ्या सारखी हमाली करावी नाही लागणार, ट्रेनचा प्रवास रोजचाच माझा पण आज कदाचित पहिल्यांदाच असं खिडकीत बसून प्रवास करतोय, नाहीतर नेहमी आपलं सामानाच्या डब्ब्यात खालीच बसून येणं - जाणं. 
ट्रॅकवर धावणाऱ्या ट्रेनचा तेवढा आवाज येत राहिला बाकी सगळं शांत होत. आमच्या संभाषणाचे जास्त साक्षीदार देखील नव्हते म्हणा.
बाप बाप असतो!!!!!!!!!!!!!
पोराने मागणी बंद केली (वयो - मानाने तो समजुदार झाला असेलचं) पण त्याला हवी असलेली वस्तू देता येत नाही ह्याच शल्य मात्र त्या बापाला एवढे दिवस टोचत राहील आणि आज ती वस्तू घेतल्यावर त्याला झालेला आनंद, का स्वतःचा वाटणारा अभिमान, ह्यातला काहीच नसावं पण पोराची मागणी पूर्ण करण्याचं समाधान पुरेपूर दिसत होत.
काय दिले मुंबई ने मला असं कोणी विचारलं तर उत्तर खूप सोपे आहे "अनुभव"
(टीप: - अरे - तुरे करताना शब्द लवकर सापडतात म्हणून लिखाणात तसं आलाय आणि कंदील बनला नाही त्याची कथा वेगळीच)