शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०१४

मी पाहिलेला रायगड



काय सांगतो आहे सह्यसखा,
सूर्य तेज प्रमाणे शोभतो माझा राजा,
ह्या गडांवर उमटल्या तेजस्वी पाऊलखुणा,
सांगतो आहे इतिहास त्यांच्या कर्तृत्वाचा.
खेळ खेळला स्वराज्याचा धाडसी मावळ्यांनी,
सांडलेल्या रक्ताची गाथा सांगती भगव्या कमानी,
गनिम ठेचला, छत्र अर्पिले, स्वराज्य निर्मिती जाहली,
धन्य झाली या महाराष्ट्राची यशोगाथा.

तसा प्रत्यक्षात गड ३ ते ४ वेळा पहिला आहे. त्याचे ते भव्यदिव्य रूप पाहून मंत्रमुग्ध होणारा मी एकटाच नसणार!! त्या महाद्वारातून आत येताना देवळाच्या गाभाऱ्यात आल्यासारखे वाटणे साहजिकच आहे. काय काय पहिले असेल नाही ह्या दुर्ग्दुर्गेश्वाराने किती सोसले आहे. गाभाऱ्यात देव असतो पण देवळाच्या चारही भिंतीना केवढे महत्व देतो आपण, पण म्हणून भिंती स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायला नाही ना सरसावत. 

ह्याच्या अजोड कातळाला हिरोजी इंदुलकरांनी एका अभेद्य अश्या गडकोटाचे जे रूप दिले त्याला तोडच नाही. स्वराज्याचे ह्याने पाहिलेले उतारचढाव, जगदीश्वराच्या आशीर्वादानेच ह्याच्या प्रत्येक दिवसाची होणारी ह्याची सुरवात, दूरवर चालणारे अत्याचार पाहून त्याचा ही राग उफाळून आलाच असेल! पण त्याचा त्याच्या राजावर तितकाच विश्वास होता. एखादा गड किंवा लढाई जिंकून आल्याची वर्दी गडावर येताच महाराजांन इतकीच त्यालाही एखाद्या अद्वितीय ताकदीची अनुभूती जाणवली असावी. पुरंदरच्या तहात देखील हा महाराजांचा आणि स्वराज्याचा पाठीराखाच राहिला. गडावर कुजबुजत झालेल्या मसलती, तानाजी/बाजी सारख्या साथीदारांचे जाणे ह्याच्याही मनाला लागुनच गेले असेल नाही! राज्याभिषेकाच्या वेळी काय अप्रूप आनंदी स्वरूप असेल त्याचे, सगळीकडे चालणारी धावपळ, विधिवत चालणारे होम-हवन, आईच्या डोळ्यात माया/चिंता/अभिमान सारे एकदाच पहिले असेल ह्याने. सोन्याने मढवलेले सिंहासन आणि त्यावर विराजमान झालेल्या स्वराज्याच्या पहिल्यावहिल्या छत्रपतीला पाहून गर्वाने छाती फुलली असेल त्याची. ३ एप्रिल १६८० त्या काळ्या दिवसाला तो कसा समोर गेला असेल त्या दिवसाच्या नुसत्या विचाराने आज ३०० वर्षानंतर जन्माला आलेलो मी सुद्धा स्तभ्ध होऊन जातो, त्याने तर तो दिवस जगला आहे. पण हा इतिहास आहे, तो मी नाही जगू शकत, नको तो मला जगायचा देखील नाही इतके धैर्य माझ्यात (आहे/नाही) कोणास ठाऊक.

तापून लालबुंद झालेला रवि देखील त्याच्या मागे लपू पाहत होता. सूर्याचे ते पुसट होणारे तेज पण त्याच्या प्रचंड रुपाला नाही झाकू शकले. हे सगळे विचार काही क्षणातच माझ्या मनाला शिवून गेले. मी मात्र रायगडाला नुसता पाहत होतो त्याच्या पासून बराच लांब लिंगाण्यावरून त्या ३००० फुट उंचावरून देखील मला मी किती लहान आहे ह्याचे भान आले नकळत मी नतमस्तक झालो.  
 एकदाच त्या तिघांना नमस्कार केला. रायगडला/जगदिश्वराला/महाराजांच्या समाधीला.  








२ टिप्पण्या: