गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

गंभीरगड


        इंटरनेट सर्फ करता करता गडाचे नाव समोर आले "गंभीरगड" नाव पहिल्यांदाच ऐकले होते, नावातच एक वेगळेच कुतूहल वाटले! नवल म्हणजे म्हणजे गड पालघरलाच आहे म्हंटले आता तर बस झाले एवढ्या जवळ असून नाव सुद्धा माहित नव्हते कल्पेशला विचारले येतोस काय? उत्तर अपेक्षित होते "कधी बोल तू मी येतो." रूट साठी मग जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी मिळवली आणि ठरले २०१३ वर्षाचा शेवटचा ट्रेक हाच करायचा.

           पहाटे ५. १५ ची डहाणू लोकल दादर वरून त्याला पकडायला सांगितली, मी वसईला तीच गाडी पकडणार होतो. ६. ०५ ला वसई वरून मी गाडीत चढलो साधारण ७ वाजता गाडीने आम्हाला पालघरला सोडले. आधी जाऊन गाडी बघूया म्हणून एस. टि. डेपो कडे वळालो. "कासा" कडे जाणारी बस पकडायची होती मास्तर म्हणाले ती अहमदनगर लागली आहे वाहकाला सांगा तो उतरवेल, भावड्या (कल्पेश) म्हणाला सोड नाश्ता नंतर करूया आधी कासा गाठूया. साधारण ४५ मिनिटांनी कासा नाक्यावर आलो आता इथून पुढे "सायवनला" जायचे होते पण ट्रान्सपोर्टची बरीच साधने उपलब्ध असल्याने आधी नाश्ता केला. तिकडून बस पकडून पुढे सायवनला जायला निघालो. सायवन हून पुन्हा पुढे रायपूर ला जायचे होते, सायवन च्या पोलिस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक लिहून ठेवला आणि रिक्षावाल्यांना विचारले रायपुर चालणार काय? तुम्हाला नक्की कुठे जाणार? म्हंटले "गंभीरगड" त्यावर तो म्हणाला,  "मग रायपुर पर्यंत कशाला जाताय मध्ये एक रस्ता आहे तिकडून जवळ पडेल तिकडेच सोडतो." त्याने सोडले तिकडून उंचावर दगडी सुळके दिसत होते. मग त्याचा हिशोब चुकता करून आम्ही दाखवलेल्या मार्गाला लागलो.

 गडाची पहिली झलक 

अळी सारखा किडा 
          जरा विसावलो अगदी ५ मिनिटेच आणि मग ट्रेक सुरु केला रस्त्याच्या बाजूने गडावर जाणारी पायवाट दिसते कुंपणाच्या बाजूने वर एका टेकडीवार आल्यावर डाव्या बाजूला वळायचे तिकडूनच उंचावर सुळका दिसतो. १० मिनिटे चाल्यावर उजव्या बाजूला वळायचे समोर उंच चढ दिसतो.

निसरडी माती असल्याने  हा मार्ग टाळावा 

        जास्ती हौस असल्याने आम्ही सरळ चढत गेलो पण तो संपूर्ण चढावर निसटती माती आहे काहीसे वर गेलो पण जमत नाही म्हणून पुन्हा कसे बसे खाली आलो मग चढाच्या बाजूने उजवीकडे एक लहानशी पायवाट दिसली त्याच वाटेने पुढे जाऊया असे ठरवले. ऊन भयंकर होते साधारण ३० मिनिटे चालल्यावर एक प्लाटू आला ती गडाची माची असावी कारण तिकडून गड समोरच दिसतो. माचीवरून पुढे थोडा जंगलाचा भाग त्यात मार्गक्रमण करत पुढे गेलो. प्रचंड कातळ समोर दिसत होते त्यावर पसरलेल्या झाडांच्या पारंब्या काही वेगळ्याच वाटत होत्या.

 लोकांची वर्दळ कमी असल्याने स्वच्छंद णे  वाढलेली झाडे 

काही क्षणाचा विसावा 

      सावली मिळाली तसे पाणी पिण्यासाठी जरा विसावलो. आणि पुन्हा गडावर जायला निघालो. आता गडाच्या टोकावर एक भगवा फडकताना दिसत होता बाजूच्या गावातील लोकांनी लावला असण्याची शक्यता जास्त. माची वर येताना काहीशी तटबंदी दिसते तेवढेच काय ते गडाचे अस्तित्व सांगणारे अवशेष. 

 
तटबंदीचे उरलेसुरलेले अवशेष 


          पुढे आलो आणि समोर दूरवर नजर जायेल तिथपर्यंत ओसाड आणि अधेमधे झाडे असे दृश्य होते. फोटो काढूया रे म्हणून थांबलो काही क्लिक केले. 

फोटोशूट 

          आता पुढे निघालो आणि गाडाच्या मथ्यावार आलो. सगळ्या जगावर नाव कोरणाऱ्या काही महाभागांनी इथे सुद्धा आपले हस्तशिल्प कोरून ठेवले होतेच (@#$@#@%@)^^@) अश्या बऱ्याच भावना मनात आल्या. आता आम्ही गडाच्या टोकावर आलो भगवा अभिमानाने झळकत होता . 


 रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा

पुन्हा फोटो शूट करून आम्ही खाली यायला लागलो.



असे फोटो काढतो म्हणून आई ने माझी चांगलीच कानउघाडणी केली होती


गडाच्या खालच्या बाजूला पाण्याचे टाके आहे पाणी बाराही महिने उपलब्ध असते फक्त ते वर आण्यासाठी दोरी आणि भांडे वापरावे लागते. 

स्वछ आणि निर्मळ पाणी 

          मी आणलेली शिदोरी तिकडेच उघडली मस्त गटगटे बोंबील फ्राय करून आणले होते त्याचा फडश्या पडला आणि पुन्हा मार्गस्थ झालो खाली यायला जास्त वेळ नाही लागला. खाली आल्यावर रस्त्याच्या बाजूला रिक्षा येण्याची वाट पहिली हा रस्ता पुढे जाऊन गुजरात हायवेला मिळतो, गड पण महाराष्ट आणि गुजरातच्या सीमेवरच आहे. समुद्रसपाटी पासून साधारण २२५२ फुट उंची असावी.  छोटा पण वनडेसाठी मस्त असा ट्रेक आहे.



जाण्याच्या वाटा आणि तयारी: -
डहाणू-कासा-सायवन- असलोन-पाटीलवाडी असा प्रवास करावा. डहाणू ते कासा बस सेवा आहे. इथून पुढे रिक्षाने जाता येते.


एकटे-दुकटे जाणार असाल तर सायवनला पोलिस ठाणे आहे त्याचा नंबर जवळ ठेवा अथवा त्यांना सांगून
गेलात तरी चालेल गडावर जास्त वर्दळ नसल्याने काळजी घेतलेली बरी. 

1)      टाक्याच्या वर मधमाश्यांची पोळी आहेत थोडी खबरदारी घ्यावी.
2)      गावातील कोणीही गाईड म्हणून येते, खास करून शाळेतील मुल पैसे जास्त घेत नाहीत पण त्यांना थोडा रोजगार मिळतो.
3)      गडावर स्वच्छता राखावी कुठेही आपल्या नावाची स्वाक्षरी नोंदवू नये.
4)      पाणी मुबलक प्रमाणात गडावार आहे तरी स्वतः सोबत न्यावे. टाक्यातून काढण्यास दोरीचा वापर करावा लागतो.
5)      जेवणाची आणि राहण्याची सोय नाही. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा