शुक्रवार, २५ मार्च, २०१६

जेजुरी आणि मल्हारगड


खिडकीतून येणाऱ्या गार वाराच्या स्पर्शाने आता थंडी जाणवायला लागली आणि मी शाल ओढून घेतली, गाडी कुठे तरी वाशीच्या पुढे असावी तेव्हा झोपेने वेळ साधली. जाग आली ती वाहकाच्या "सासवड" ह्या आवाजामुळे पण साखरझोप अजून दहा मिनिटांन नंतरच पूर्ण होते, प्रणव म्हणाला "जेजुरी" यायला थोडा वेळ आहे म्हणून पुन्हा डोळे मिटले, "चल रे आले!" प्रणवचा आवाज आला तसा बॅग सावरत मी त्याच्या मागोमाग खाली उतरलो. पहाटेचे ३.४० झाले होते, खांद्यावरची बॅग व्यवस्थित घेईपर्यंत लाल डब्बा पंढरपूर मार्गी लागला सुद्धा. आम्हा दोघांन व्यतिरिक्त अजून दोन प्रवासी उतरले होते पण ते लगेच डोळ्याआड झाले, सामसूम रस्त्यावर आता गडाकडे जाणारी वाट कोणती ते पाहत पुढे निघालो. समोरच्या टेकाडावर दिव्यांच्या रोषणाईत "जेजुरीगड" स्पष्ट दिसत होता. सरळ वरतीच जाऊया असे ठरले रस्ता मिळायला काही कठीण नाही, मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूच्या गल्लीत थोडे चालल्यावर मुख्यद्वार लागले इथूनच पायऱ्या चालू होतात. सुरवातीलाच "नंदी" चे दर्शन झाले. (खंडोबा शंकराचाच अवतार मग नंदी हवाच कि).
नंदी आणि बाजूला हत्ती हे रक्षक मानले जातात
ट्रेक ला येण्या आधी कोणी तरी विचारला होता. तू चक्क देव दर्शनाला चाललास? सिरिअल पाहून भारावलास वाटत?  तर अस काही नाही आहे!
महाराष्ट्रात "खंडोबा", कर्नाटकात "मैंलार", तर आंध्र मध्ये "मल्लांना" अश्या नावांनी ह्या देवाला आपण ओळखतो. जाती-धर्म, भाषा-प्रदेश ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भक्तांना आपल्यात सामावून घेणारा हा देव. शिवरायांनी आपल्या तलवारीला शत्रूच्या रक्ताचा अभिषेक करवला तो ह्याच परिसरात, मल्हारराव होळकरांची भरभराट ह्या खंडेरायाच्या श्रद्धेच्या बळावरच झाली असे म्हणतात, उमाजी नाईक यांनी इंग्रजी सत्ते विरुद्ध स्वातंत्र्यासाठीचे पहिले बंड उभारले ते ह्याच विभागातच, पुरंदरावर पिवळे निशाण फडकवायचा त्यांचा कौल मात्र राहिला. दक्षिणेत मणी आणि मल्ल ह्या असुरांचा पराभव केल्यानंतर सह्याद्रीतल्या ह्या डोंगरात आपली राजधानी स्थापली तीच हि "जयाद्री" कालांतराने नावाचे विटंबन होऊन "जेजुरी" असे प्रचलित झाले. ह्या "मल्हारीमार्तांडा"ला हळद प्रिय आहे म्हणून इथे भक्तगण हळद उधळतात उत्सवात तर संपूर्ण गडच सुवर्णमे होतो म्हणूनच ह्याला "सुवर्णनगरी" सुद्धा म्हणतात. नंदीचे दर्शन घेत महाद्वारातून वर चढायला सुरवात केली तेव्हा डोक्यावर मोठाली घंटा दिसली. थोडेवर आलो आणि चालताना मधेच देवडी लागते म्हणजे लहानशी खोली पण दार नसलेली ह्यात दगडात कोरलेली एक प्रतिमा आहे. क्षेत्रापाल श्रेणीतला हा देव शंकराचाच अवतार, मल्ल सेनापती सुरेंद्रवर्धन आणि देत्यशेल ह्यांची चक्रव्हुव रचना ज्यांनी भेदली तेच हे "वीरभद्र". 
वीरभद्र
अजून पुढे आलो तसा वेशीच्या मधोमध एका हातात भाला आणि एका हातात कुऱ्हाड घेऊन उभ्या योद्ध्याची प्रतिमा पाहायला मिळाली ती "उमाजी नाईक" यांची आहे. (आता ह्यांना देखील हळदीचा अभिषेक करायची गरज आहे का?) तरी बर झाला सकाळची वेळ होती जास्त कोणीच नव्हते नाही तर आम्हा दोघांना पण पिवळे केले असतेच. १८३० साली स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकत उमजीने इंग्रजांनी बेजार जरून सोडले पण त्यांचा हा प्रतिकार इंग्रजांनी मोडीत काढला आणि १८३२ साली त्यांना फाशीची शिक्षा झाली. 
उमाजी नाईक
पुढे चालत असताना उजव्या बाजूला लक्ष वेधले गेले ते "शिवरायां" च्या आणि "शहाजी" राजांच्या भेटीच्या मूर्तिमंत देखाव्याने त्यांच्यातल्या ह्याठिकाणच्या भेटीचे पुरावे इतिहासात देखील आहेत परंतु दार बंद होते त्यामुळे आत जाता नाही आले.  
पिता पुत्रांच्या भेटीचा देखावा   
पुन्हा डाव्याबाजूनेच वर आलो तेव्हा उजव्या बाजूला कोपऱ्यात एक मंदिर लागते ते "बाणाई" देवीचे मंदिर. पार्वतीने आपली दासी "जया" हिला शंकराच्या पुढच्या जन्मी त्यांची पत्नी होशील असे वचन दिले तीच हि बाणाई, काही लोक म्हणतात धनगरांनी सांभाळ केलेली हि बाणासुराची मुलगी. (सिरिअल पाहणाऱ्या मंडळीना जास्त माहिती असेल) दुसऱ्या विवाहामुळे म्हाळसा आणि बाणाई मधल्या वादामुमुळे खंडेरायांनी बाणाईला गडाच्या खाली पहिल्या दर्शनाचा मान दिला. 
बाणाई मंदिर 
पायऱ्या चढू लागलो तेव्हा "हेगडी प्रधान" हे मंदिर लागले खंडेरायाच्या अवताराचे वेळी साक्षात विष्णूच प्रधानच्या रुपात युद्धात सामील झाले होते. "हेगडी" ह्या शब्दाचा कन्नड मध्ये प्रधान असाच अर्थ होतो. म्हणतात बाणाईच्या रक्षणा करिता खंडेरायांनी त्यांना इथे राहायला सांगितले. 
हेगडी प्रधान
पुढची वेस ओलांडली कि मंदिराचे मुख्यद्वार दिसू लागते. पण ते बंद होते वेळ पहिली तर पहाटे ५.०० वाजता मुख्य दरवाजा उघडणार हे समजले आता काय वाट पहायची सगळीकडे हळद दिसत होती बाजूला एक चपलांचा स्टॅण्ड दिसला बसायला २ मोठे बाक देखील होते दोघांनी आपला बस्तान तिकडेच मांडला झोपलो तर मग उठायला त्रास होणार म्हणून गप्पा चालू झाल्या, अजूनही सगळा परिरस झोपेतच होता कृत्रिम दिव्यांची मोहक रोषणाई मनमोहक वाटत होती. मनात विचार आला सगळ्या दीपमाळांन मध्ये दीप लावले असता गडाचे किती प्रज्वलित रूप पाहायला मिळत असेल नाही. गडावर चढताना साधारण ४०० च्या आसपास पायऱ्या आणि साधारण ३०० पेक्षा जास्त दीपमाळ पहावयास मिळाल्या. येरझाऱ्या घालताना मुख्यद्वारावर मोठी घंटा दिसली तश्याच प्रकारच्या ५ घंटा नंदीच्या मागे (चपलेच्या स्टॅण्डच्या अगदी बाजूला देखील आहेत) 
स्टॅण्ड जवळील घंटा
     परंतु खालच्या महाद्वारावरील घंटा आणि मंदिराच्या मुख्यद्वारावरील घंटा पोर्तुगीज बनावटीच्या आहेत ह्या घंटा जेजुरीगडला वसई मोहिमेच्या विजय चिन्हाच्या स्वरुपात चिमाजी अप्पा आणि मल्हारराव होळकरांनी भेट दिल्या आहेत. वरती जायच्या पायऱ्यांच्या उजव्या बाजूला एक मूर्ती पाहायला मिळते मंदिर बनत नव्हते म्हणून कोणी आत्मबलिदान केले होते त्या "यशवंतराव" ची प्रतिमा म्हणून. पहाटे ५ च्या टोल्या बरोबर मंदिराचे दार उघडले आणि आम्ही दोघे आत गेलो प्रशस्थ अश्या अष्टकोनी आकाराचा कोट हळदीच्या अभिषेकामुळे सोनेरीच वाटत होता, मुख्य मंदिराच्या अगदी समोर ४ मोठ्या दीपमाला पाहायला मिळतात आणि समोरच नंदी आता रांगेच्या सोई साठी रेलिंग लावल्या आहेत म्हणून नाही तर नंदीच्या डोक्यावरून थेट खंडेरायाचे दर्शन होते. 
मुख्य मंदिरा समोरील नंदी आणि मागे बगाड
ह्या नंदीच्या बरोबर मागे बगाड आहे पाठीच्या मांसल भागात गळ टोचून भक्त बगाडाला लटकत आणि मग त्यांना गोल फिरवले जायचे पण हि प्रथा इंग्रजांनी १८५६ साली बंद करवली. 
१४ खांब असलेले बागाड आणि वरच्या लाकडाला बांधून भक्तांना गोल फिरवले जायचे
बागडा समोरच मल्लासुराची उभी प्रतिमा पाहायला मिळते युद्धातले कौशल्य पाहून प्रभावित झालेल्या खंडेरायांनकडे मल्लासुराने वर मागितला म्हणून ह्याला सुद्धा दैवत्व प्राप्त झाले. मुख्यमंदिर आणि नंदी ह्यांच्या मध्ये २० फुट व्यासाचे कासव आहे. 
तांब्याच्या पत्र्याचे कासव
मंदिराला परिक्रमा मारताना मागच्या भिंतीवर मणि-मल्लाच्या युद्धात "खादगंदृष्ट " ह्या असुराचा वध करणाऱ्या "कार्तिकस्वामींचे" चित्र पाहायला मिळते, 
कार्तिकस्वामीं
चतुर्भुज तुळजाभावानी
ह्याच्याच अगदी मागे चतुर्भुज (चार हात असलेली) तुळजाभावानीचे मंदिर आहे इथले दर्शन घेऊन आम्ही पुढे डाव्या बाजूला निघालो तिथे पंचलिंगी मंदिर आहे "नीलाद्री", "कशी", "मातापूर", "हरिद्वार" व "जयाद्री" अश्या पाचही ठिकाणच्या दर्शनाचे पुण्य इथे एकाच ठिकाणी मिळते असे म्हणतात. 
पंचलिंगी मंदिर
मागेच भुलेश्वराचे मंदिर लागते हे नाव का? ह्या मागची कथा जरा वेगळीच आहे. (बाणाईच्या दर्शनाने भुललेले खंडोबा गुप्तपणे तिच्या शोधत निघाले म्हणून हा भुलेश्वर.) इथल्या ओवारीमध्ये साक्षविनायकाचे स्थान आहे. (पार्वतीने आपली दासी "जया" हिला शंकराच्या पुढील अवतारात पत्नीत्वाचा भाग देण्याचे वचन गंगा आणि शंकराच्या उपस्थितीत दिले त्याला गणपती साक्षीदार राहिला. पुढे बाणाईच्या रूपातील जयेस खंडोबाने वरले असता पार्वती अवतारातील म्हाळसा मात्र क्रोधीत झाली आणि साक्ष देण्यास आलेल्या गणपतीच्या साक्षीला देखील नकार दिला. तो हा "साक्षविनायक"). झारोक्याच्या मागे काडेपठाराचे दर्शन होते तर समोरच द्विलिंग आहे ज्याला काशीविश्वेश्वर देखील मानतात. आता आम्ही दोघे मुख्य मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला होतो आधीच मिळालेल्या माहिती मुळे प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहता येत होती ती देखील सविस्तर माहिती सह, इथे एक प्रचंड शीला आहे तिला "धृतमारी" असे म्हणतात. (मणी-मल्लाच्या अत्याचारांच्या कथा ऐकून क्रोधीत शंकराने आपली जटा व त्यातून भयानक महामारी प्रकट झाली युद्धाच्या वेळेस राक्षसांच्या रक्तातून नवीन राक्षस निर्माण होऊ लागले होते त्यांचे भक्षण ह्या महामारीने केले. तिला ऋषीमुनींनी तुपाच्या अभिषेकाने शांत केले ती हि धृतमारी.) 
ह्याच शिळेला धृतमारी असे म्हणतात
विष्णुपाद
हनुमान
दिव्यांच्या रोषणाई मध्ये सजलेली जेजुरी तर उरलेल्या रात्रीला सूर्याच्या विविध रंगांचा होत असलेला अभिषेक विलोभनीय होता. नगारखाना वगैरे पाहून झाला पण तलवार पहायचे राहून गेले. पुन्हा खाली उतरायला सुरवात केली. (चढताना आणि उतरताना वेगळे वेगळे मार्ग आहेत आपण नेहमी डाव्या बाजूने चालतो लिहलेल्या दिशांत डाव्या किंव्या उजव्या बाजूचा उल्लेख वर चढते वेळी आहे.)  




पूर्वेला सूर्यनारायण आपल्या दिवसाचा कारभार सांभाळायच्या तयारीत असताना आम्ही खाली उतरू लागलो. पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो आणि सासवडला जाणारी बस पकडून सासवडला आलो. चौकशी खिडकी जवळ जाऊन "सोनोरी" ला जाणाऱ्या बसची विचारणा केली तसे समजले सकाळी ६.४५ ची सोनोरी बस गेली होती हि बस आहे हे आम्हाला माहीतच नव्हते  १० / २ / ५ ह्या बसच्या ह्या वेळा माहित होत्या. मग सकाळच्या न्याहारीच्या शोधत समोरच्या हॉटेल्स मध्ये  प्रणवला त्याच्या आवडीचे पोहे मिळाले तर मी मिसळ वर येथेछ ताव मारला. नाश्ता वगैरे झाला तरी अजून तास दीड तास बाकी होता. कोणी माहिती पुरवली पुढच्या गल्लीवर थांबा तिकडूनच सोनोरीला जाणारी बस जाते त्या आधी जर एखादे वाहन आले तर लवकर जाऊ शकाल. म्हणून आम्ही दोघे त्या वळणावर आलो साधारण अर्धा तास वाट पाहिली पण एक दोन दुचाकी वाहने काय ती दिसली. बस करिता बराच अवकाश होता म्हणून दोघांनी चालतच जायचा निर्णय घेतला चालताना वाहनाचा आवाज आला कि मागे वळून पहायचो, थोडा वेळच चालायला लागले असेल, इतक्यात एका चारचाकी वाहनाचा आवाज आला हात दाखवला तर ते काका थांबले देखील "सोनोरीला जायचे आहे!" त्यांचा होकार मिळताच आम्ही दोघे त्याच्या बाजूला पुढेच बसलो. कोण म्हणेल सकाळी कोवळ ऊन असते म्हणून गर्मीचा कहर सुरु झाला होता, गावच्या वेशीला वळसा मारत आमची प्रशस्थ गाडी थांबली तसे पारावर बसलेली मंडळी आमच्याकडे टुकुरटुकुर पाहू लागली. काळे काकांनी पुढच्या प्रवासाचा मार्ग दाखवला पण पैसे घेण्यास नकार दिला कारण देखील छान होते. "तुम्ही पाहुणे म्हणून आला आहात" वर चहा ची विचारणा देखील केली, त्यांचा निरोप घेऊन आम्ही मार्गी लागणार तेवढ्यात गावातले हे मंदिराजवळ पाहवले थांबली.
लाकडाच्या आधारस्तंभांवर उभे असलेल्या मंदिराच्या दोन्ही बाजूना भिंतींची तटबंदी नाही त्यामुळे मोकळेच वाटणारे मंदिर शांतच वाटले, वर टांगलेली पालखी आणि त्यावर माऊलींचा फोटो लक्ष वेधून घेतात, असणाऱ्या गाभारा मात्र दगडी बांधकाम केलेला होता थोडी रंगरंगोटी केली होती पण सुरेख वाटत होता.

.
गावातील मंदिर, पालखी आणि माऊलीचा फोटो
गाभारा
दाराच्या बाजूला शेंदूर फसलेली विरगळ आहे त्याचा खालचा भाग कदाचित बांधकामाच्या ओघात जमिनीत दाबला गेला आहे. 
युद्धात वीरमरण आलेल्या योध्याच्या स्मरणार्थ "विरगळ" असते. 
खालच्या चौकटीत त्या योद्ध्याला वाजत गाजत घेऊन जात आहेत तर वरच्या चौकटीत शंकराच्या पिंडीचा अभिषेक चालला आहे त्याने मोक्ष मिळतो असे म्हणतात. तर चंद्राची कोर देखील पाहायला मिळते सुर्य ची प्रतिमा नाही दिसत आहे. ह्याच्या अर्थ असा कि जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत तोवर त्याची कीर्ती राहील. वर कळसाचा भाग दिसतो आहे.   


म्हल्हारगडाच्या दिशेने निघालो तेव्हा प्रणवला गाईचे नवजात पाडस दिसले म्हणून तो त्या दिशेने वळला, पण त्या घराजवळील सुरेख बांधकाम केलेली विहीर पाहायला मिळाली, दगडाच्या बांधकामात खाली जायला पायऱ्या, मध्ये उभ राहायला चौथरा बनवला आहे. 
गायीचे पाडस
    विहीरीच्या चौथऱ्याला दगडात कोरलेले खांब
  गडा व्यतिरिक्त गावातली मंदिर आणि पानसेंचा वाडा देखील पाहण्यासारखा आहे. दोन भक्कम बुरुजांच्या मधला मार्ग थेट वाड्याच्या दिशेनेच जातो काळाच्या ओघात बरीच पडझड झाली आहे पण तरी सुद्धा बरेचसे बांधकाम शिल्लक असल्याचे दिसून येते. थोडे पुढे अजून एक मंदिर लागले मंदिराला वळसा घालून गाभाऱ्याच्या जवळ आलो तसा अगरबत्तीचा मंद सुवास कोणाच्या तरी अस्तित्वाची चाहूल देऊन गेला. हे मंदिर देखील बंदच होते म्हणून बाहेर आलो तर समोर उभ्या आज्जीनंशी नजरा नजर झाली “हे लक्ष्मी - नारायणाचे मंदिर आहे त्या म्हणाल्या” आम्ही इथे का आलो ह्याची थोडक्यात माहिती प्रणवने त्यांना पुरवली तसं त्यांनी वाडा आतून पहायचे निमंत्रण दिले आमची देखील पावल त्यांच्या मागोमाग वाड्यात शिरली चौफेर तटबंदीने वेढलेला वाडा, लाकडाच्या नक्षीदार कमानीवर बऱ्याच पावसाळ्यानं पासून आपले अस्तित्व टिकवून आहे.
लक्ष्मी - नारायण मंदिर



लाकडाच्या भक्कम खांबांवर नक्षीदार कारागिरी

वाड्यातल्या देवघरात आलो तेव्हा आज्जींचा आवाज थोडा नरमला होता जुन्या आठवणीत कदाचित, चांदीची कृष्णमूर्ती असल्याचे त्या म्हणाल्या जन्माष्टमीचा उत्सव अजूनही थाटात साजरा करतो आम्ही. आज्जी सांगत होत्या पोर शिकली आणि शहरात स्थायिक झालीत तिकडेच कामाचा व्याप पाहतात माझी हयात इकडेच गेली मग इकडून पाय निघत नाही.



देवघर


इथे घोड्यांची पाग होती, तिकडे गणपतीचे मंदिर बघा, काहीच दिवसांन पूर्वी इकडे चित्रपटाचे शुटींग झाले आहे …….. त्यांच्या बोलण्यातून एकटेपणा चांगलाच जाणवला. त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडताना आमच्या दोघांच्या हि मनात त्या आज्जींच्या परिस्थितीवर थोडी द्द्विधा मनस्थिती झाली होती. कच्च्या पायवाटेने गावाच्या वेशी बाहेर आलो तसा सलग तटबंदी असलेला "मल्हारगड" दुरूनच नजरेत भरला. दिवे घाटावरच्या ह्या रक्षकाचे बांधकाम मराठ्यांच्या कारकिर्दीतले शेवटचे बांधकाम मानले जाते.
मल्हारगडाचे पाहिले दर्शन
 गडाच्या दिशेने वाटचाल करताना मागून गाडीचा आवाज आला म्हणून दोघे बाजूला झालो, आम्हाला पाहताच त्यांनी गाडी थांबवली आमच्या सारखे भटकेच होते, पुण्याहून गड पाहायला आले होते. "चला आमच्या बरोबर पायथ्या पर्यंत!" त्यांनी विचारणा केली पण आता पर्यंतचा प्रवास तसा सुखकरचं झाला होता म्हणून प्रणव म्हणाला "चालतच जाऊ थोडेच तर आहे" अगदी १५-२० मिनटांच्या चढाईत आम्ही गडाच्या बुलंद बुरुजा जवळ पोहोचलो. 
अगदी अलीकडच्या बांधकामाची छटा दिसून येते
 छान वारा सुटला होता म्हणून बुरुजाच्याच सावलीत थोडावेळ विसावलो. सासवड - पुणे हा मार्ग सुरक्षित करण्यासाठी पेशव्यांच्या तोफखान्याचे सरदार “पानसे” ह्यांनी ह्या गडाचे बांधकाम १७५७ ते १७६० ह्या कालावधीत पूर्ण करवून घेतले, खंडोबाच्याच नावावरून ह्या गडाचे नामकरण “मल्हारगड” असे करण्यात आले तर "सोनोरीचा किल्ला" हे पायथ्याशी असणाऱ्या गावामुळे मिळालेले नाव. दोन मजबूत बुरुजांच्या मधून गडाच्या प्रवेशद्वाराचे अस्तित्व लांबून नजरेस देखील पडत नाही. दोन्ही बुरुजांवर तोफा आणि बंदुका डागण्यास जंग्या बनवण्यात आल्या आहेत. मुख्य दरवाज्याने आम्ही आत प्रवेश करताच समोर पहारेकऱ्यांच्या राहायची जागा "देवडी" दिसली. 
तोफा आणि बंदुका साठी बनवण्यात आलेल्या जंग्या आणि समोर देवडी दिसते आहे

निमुळत्या दारातून पुढे आल्यावर कोणे एके काळी अस्तित्वात असणाऱ्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात तिथेच एक विहीर देखील आहे पण त्यात पाणी नव्हते. तटबंदीला लागुनच डाव्या बाजूने चालत राहिलो तेव्हा पुढे गडावर पाण्याच्या सोयीकरिता एक तळे बांधण्यात आल्याचे दिसले त्यात खाली उतरायला पायऱ्यांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. वापरात नसल्याने तलावात पिण्यायोग्य पाणी नव्हतेच. 

पाण्यासाठी करण्यात आलेले सुनियोजन
आता पार गडाच्या शेवटच्या टोकाला आलो होतो तिथे पण एक विहीर पाहायला मिळते, तर बुरूजाला खाली एक दरवाजा. ह्या गडाचे बांधकाम सह्याद्रीतल्या इतर किल्ल्यांनप्रमाणे कातळाचे नाही हे आपल्या लक्षात येते बरेच बांधकाम ठिसूळ आणि पडक्या अवस्थेत दिसून आले. इथून थोडे पुढे आलो कि किल्याचा चोर दरवाजा नजरेस पडतो झेंडेवाडीतून आल्यावर ह्याच दाराचा उपयोग करून आत येता येते. आमच्या नवीन मित्रांशी फोटो काढताना पुन्हा गाठभेट झाली. गप्पा रंगल्या तसे आमच्या सासवड पर्यंत परतीच्या जाण्याची व्यवस्था त्याच्या गाडीत झाली.
विहीरीतील पाणी देखील आटले होते
 चोर दरवाजा आतील बाजूने
 चोर दरवाजा बाहेरील बाजूने
ढासळलेले बुरुज काळाची साक्ष सांगत आहेत.
  पुन्हा आत आलो आणि तटबंदी लागत चालू लागलो तसे एवढा वेळ नजरेत नसलेला बालेकिल्ला समोर आला.मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुन्हा मुख्य दाराजवळ आलो आणि जवळ असलेली शिदोरी उघडली पोटोबा होत होता तेव्हा पुणेकर मंडळी देखील आलीच मग एकत्रच खाली आलो. त्याच्या चार चाकी वाहनात आमच्या दोघांना आरामात जागा झाली. सासवडला उतरून त्यांचा निरोप घेतला आणि मुंबई करीत बस पकडायला वळलो. तिकडे येऊन समजले बसला अवकाश आहे अजून म्हणून मग सासवड ते पुणे आणि मग पुणे ते मुंबई असा प्रवास केला. नेहमी प्रमाणे वेस्टर्न साईडला राहणारा मे लेट घरी पोहोचलो.  
 संपूर्णपणे शाबूत असलेली तटबंदी
  
 महादेवाचे मंदिर
  
आमच्या परतीची स्वारी

   
1)      गडकिल्ले आपली संप्पती आहेत असे समजून त्यांचे जतन कसे करता येईल हे पहा. 

2)      कोणत्याही प्रकारचा कचरा मग ती फळांची सालं जरी असतील इस्ततः टाकू नका (स्थानिक प्राण्यांच्या आहारात फरक पडतो उदा. माथेरान आणि एलिफंटा येथील माकड) प्लास्टिक आणि अन्य कचरा गावात न टाकता शहरातल्या कचरा कुंडीत टाकण्याचा प्रयत्न करा. 

3)      गडमाथ्यावर शौच करण्याची कोणतीही सोय नसते अश्यावेळी साधारण अर्धा फूट खड्डा खाणून विधी पूर्ण झाल्यावर पुन्हा मातीने झाकून टाकावे. 

4)      जाण्याआधी परिसराची संपूर्ण माहिती आपल्या जवळ असणे गरजेचे आणि आपण कुठे जात आहोत ह्या बद्दल कमीत कमीत अश्या एका व्यक्तीला तुम्ही कुठे जात आहात ते सांगा जी तुमच्या बरोबर ट्रेकला नाही पण तुमच्या परिचयाची असेल.



फोटोचे क्रेडिट पूर्ण पणे प्रणव मयेकरला जाते कॅम पण त्याचाच होता.  




   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा