खर तर बोलायला शब्दच नसतात ………………… दोन
दिवस Waterfall Rappelling
इवेन्टसाठी थंडगार पाण्यात गेल्या नंतर घरी यायला मला रात्रीचे साडेअकरा-बारा
वाजले. लवकर निघून सुद्धा ठाण्यावरून बसने आरामात येण्याचा निर्णय चुकीचा ठरला आणि
तासा भरात होणारा प्रवास सव्वादोन तास लांबला. त्यातच दुपारी चमचमीत जेवण पुढ्यात
असूनसुद्धा आंबले म्हणून टाकून द्यावे लागले होते. काही सटर-फटर खाल्ले होते पण
साधारण पूर्ण दिवस उपवासच घडला होता. अश्यातच खांद्यावर पुढे-मागे, एके-एक आणि
हातात एक अश्या तीन बॅग उचलून साधारण तास-दीड तास चालत स्टेशनला येउन ट्रेन पकडली.
सगळ्या बॅग डोंबिवलीला ठेवायला जायचे होते पण तू नको उतरू असे आनंदा म्हणाला
"आम्ही पाहतो काय ते तू जा घरी, लेट होईल तुला." पडत्या फळाची आज्ञा
समजून मी होकार दिला होता. कधी एकदा घरी जातो आणि झोपतोय असे झाले होते. भूक तर
तडकून लागली होती पण कुठे थांबून खायची इच्छा नव्हती. म्हंटले घरी जाऊन आरामात
जेवण करीन.
घरी आल्यावर "आई मला खूप
भूक लागली आहे." फक्त एवढेच म्हणालो. झोपेतून उठली आणि म्हणाली “जेवण ठेवले
नाही तुला आम्ही.” "वरण आहे पण भात संपला आहे. "तू काही म्हणाला नाहीस,
थांब मी लगेच कुकर लावते." "तू फ्रेश हो मी वाढते." (असे पूर्व
सूचना न देत मी बऱ्याचदा उपाशी घरी आलो आहे. फार उशीर झाला तर शक्यतो बाहेर जेवून
येणार हे ती गृहीत धरते) जेवण नाही म्हणून माझ्या मनाची क्षणभर चिडचिड झाली, पण
तिला झोपेतून उठून पुन्हा बनवायला लागणार होते, तरी तिच्या तोंडून एकही रागाचा
शब्द आला नाही. अंघोळ करून फ्रेश व्हायला साधारण २० मिनीटे गेली असतील. पुन्हा
एकदा “आई”……… एवढेच उद्गार तोंडून आले. "तू बस तर खाली जेवायला वाढते मी,
“केस तरी नीट पूस सर्दी होईल २ दिवस असे पण भिजलाच असणार तू." ते काम मग
तिनेच पूर्ण केले. खाली बसलो आणि पुढ्यात आलेले ताट न्याहाळले गरम गरम वाफाळलेला
भात आणि वरण, पापड, लोणचे आणि गोड म्हणून मोदक असा बेत समोर मांडला होता आणि
पिझ्झा वर Extra चीज घ्यावे तसे तिने वरण
भातावर तूप वाढले. पोटाची तृप्ती झाली तरी जिभेची लालसा काही केल्या संपली नाही.
त्या अवघ्या २० मिनिटात भात बनून माझ्या पुढ्यात होता. किती तरी वेळा हॉटेलमध्ये
खमंग जेवण जेवलो आहे त्याचे बक्कळ पैसे देखील दिले आहेत. पण रात्रीअपरात्री ह्या
माउलीने बनवून वाढलेल्या साध्या वरण-भाताची चव कितीही पैसा खर्च केला तरी नाही
मिळायची.
जेवल्यावर कधी नव्हे ते तिला Thanks म्हणालो. मातेने लगेच बॅकफूट वर जाऊन माझ्याच
बॉलींगवर एक उत्तुंग असा षटकार मारला. "बघूया बघूया ती आली कि तुला असे
बनवून देते आहे का ते!!!!!" (इथे "ती" म्हणजे मी जेव्हा
केव्हा लग्न करीन तेव्हा होणारी बायको) न खेळताच मॅच हरलो होतो. पुढे कोणताही
युक्तिवाद न साधता पुन्हा एकदा ह्या विषयाला बगल देऊन सरळ झोपायची तयारी केली.
थकवा आणि थंडीने लगेच असर केला होता. सकाळी कोणी तरी उठवत होते "काय रे
कामाला नाही का जायचे!" डोळे उघडले आणि "किती वाजले" विचारले,
"साडेपाच होऊन गेले." माझा डब्बा बनवायला तिची तयारी सुरु झाली
होती…………….. माझ्या आधीच तिचा दिवस सुरु झालेला असतो.
रात्री आल्यावर
तसाच झोपलो होतो मोबाईल चार्ज करायचे राहिले होते म्हणून इंटरनेट बंद केले होते. सकाळी
पाऊस जोरात होता म्हणून लक्ष न देता मी तसाच बॅग मध्ये ठेवला आणि कामाला निघालो होतो.
त्यात हेड ऑफिसला न येता भिवंडी ऑफिसला जावे लागणार होते तिकडून पुन्हा ऑफिसला येई
पर्यंत पावसाच्या जोराने पूर्ण भिजलो होतो. त्यामुळे बॅग मध्ये असलेला मोबाईल वाजून
वाजून शांत होत होता. ह्या सगळ्याचा परिणाम तो काय पण काल पासून माझा थांगपत्ता नाही.
म्हणून काळजी स्वरूपी थेट ऑफिसच्या लँडलाईनवर एक कॉल आला. कारण समजताच माझी चांगलीच
कान उघडणी पण झाली. "Friends Forever"
Pritam,
उत्तर द्याहटवाKhoop Chaan lihilas
Pritam beautiful piece of writing!! Shabdanchya palikade!
उत्तर द्याहटवाKeep it up.